क्रेडीट कार्ड बंद करण्याच्या बहाण्याने कामगाराला ९० हजारांचा गंडा

गोड गोड बोलत थँक्यू म्हणत केली फसवणूक ; महिनाभरानंतर कामगाराला पैसे काढल्याचे समजले
क्रेडीट कार्ड बंद करण्याच्या बहाण्याने कामगाराला ९० हजारांचा गंडा

जळगाव - jalgaon

क्रेडीट कार्ड बंद करण्याच्या बहाण्याने अनिल कुमार इंद्रदत्त त्रिपाठी वय ५२ रा. एमआयडीसी, जळगाव या प्रौढाची ९० हजार ७८० रुपयांत ऑनलाईन फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. तब्बल महिनाभरानंतर त्रिपाठी यांनी ३ नोव्हेंबर रोजी बँकेत जावून व्यवहार तपासले असता, त्यांना त्यांच्या खात्यातून ९० हजार ७८० रुपये काढण्यात आल्याचे समोर आले. त्यानंतर त्यांनी पोलिसात तक्रार दिल्याने गुन्हा दाखल झाला आहे.

अनिल कुमार त्रिपाठी हे एमआयडीसीतील खान्देश फ्लोअर मिलमध्ये खासगी नोकरी करतात. व याचठिकाणी कुटुंबासह वास्तव्यास आहेत.३० ऑक्टोंबर रोजी ते खान्देश मिल येथे कंपनीत कामावर जात असतांना , त्यांना ९३७१७७७५५४ या क्रमांकावरुन अनोळखी व्यक्तीचा फोन आला. त्याने त्रिपाठी यांना त्यांनी क्रेडीट कार्डच्या आधारावर केलेल सर्व व्यवहाराचे तपशील सांगत त्रिपाठी यांचा विश्‍वास संपादन केला.

अतिरिक्त चार्ज लागत असल्याने त्रिपाठी यांनी संबंधितांना मला क्रेडीट कार्ड नकोय ते बंद करा असे सांगितले. के्रडीट कार्ड बंद करण्याच्या बहाण्याने संबंधितांनी त्रिपाठी यांच्या मोबाईलवर आलेला ओटीपी विचारला. ओटीप सांगताच त्रिपाठी यांच्या बँकेच्या खात्यातून ९० हजार ७८० संबंधितांनी काढून घेतले. त्यानंतर संबंधित फोनवर बोलणार्‍या व्यक्तीने त्रिपाठी यांना थॅक्यू म्हणून फोन कट केला.

तसेच पुढील दोन दिवसात कुणाचेही फोन उचलू नका अन्यथा क्रेडीट कार्ड पुन्हा सुरु होईल अशी बतावणी केली. ३ नोव्हेंबर रोजी त्रिपाठी त्यांचे खाते असलेल्या स्टेट बँकेत गेले असता त्यांना त्यांच्या खात्यावरुन ९० हजार ७८० रुपये काढून घेतल्याचे दिसून आले. ३० ऑक्टोंबर रोजी क्रेडीट कार्ड बंद करण्याच्या बहाण्याने फोनवर बोलणार्‍या अनोळखी व्यक्तीने आपली फसवणूक केल्याची खात्री झाल्यावर त्रिपाठी यांनी गुरुवारी एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली. त्यावरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक रविंद्र गिरासे करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com