शिवाजीनगर उड्डाणपुलासाठी डिसेंबरपर्यंत अल्टीमेटम

विद्युत पोल स्थलांतराचे महिनाभरात करण्याची सूचना : जिल्हाधिकार्‍यांनी केली पाहणी
शिवाजीनगर उड्डाणपुलासाठी डिसेंबरपर्यंत अल्टीमेटम

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

शहरातील शिवाजीनगर उड्डाणपुल जीर्ण झाल्यामुळे नवीन उड्डाणपुलाचे काम हाती घेण्यात आले आहे.मात्र धिम्या गतीने काम सुरु असल्याने नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.

दरम्यान,जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी गुरुवारी पाहणी करुन डिसेंबरपर्यंत काम पूर्ण करण्यासाठी मक्तेदाराला अल्टीमेटम दिला आहे. तसेच विद्युत खांब स्थलांतराचे काम महिनाभरात पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकार्‍यांनी महावितरणला दिल्या आहेत.

शिवाजीनगर उड्डाणपुलाच्या बांधकामाची जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी पाहणी केली. यावेळी आयुक्त सतीश कुलकर्णी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता प्रशांत सोनवणे, माजी महापौर नितीन लढ्ढा, नगरसेवक नवनाथ दारकुंडे, सामाजिक कार्यकर्ते दीपक कुमार गुप्ता यांच्यासह महावितरण व महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते.

शिवाजीनगर आतापर्यंत पुलाचे काम 50 टक्के पूर्ण झाले असले तरी कामाची गती वाढवण्याबाबत जिल्हाधिकारी राऊत यांनी सूचना दिल्या.जिल्हा परिषद जवळून रेल्वे स्टेशन कडे जाणारा रस्ता मोटार सायकल व पायी जाणार्‍यांसाठी खुला करण्यात यावा अशा सूचना जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी ठेकेदाराला दिल्या आहेत. त्यासाठी ज्या ठिकाणी खोदकाम झाले आहे. त्या ठिकाणी भराव टाकण्याचीही सूचना जिल्हाधिकार्‍यांनी दिल्या आहेत.

शिवाजीनगर दक्षिणमुखी हनुमान मंदिराजवळ घेऊन गेलेली जुनी पाणीपुरवठ्याची पाईपलाईन काढून ही पाईपलाईन नव्या पाईप लाईन अशी जोडण्याचा सूचना देखील जिल्हाधिकार्‍यांनी दिल्या आहेत. पाईपलाईनचे काम जोपर्यंत रखर जाईल तोपर्यंत पुलाचे काम देखील सुरू होणार नाही. त्यामुळे महावितरण व महापालिका प्रशासनाने आपली उर्वरित कामे तत्काळ मार्गी लावण्याच्या सूचना जिल्हाधिकार्‍यांनी दिले आहेत.

विद्युत पोल स्थलांतराचे काम रखडले

शिवाजीनगर उड्डाणपुललगत विद्युत खांबामुळे काम रखडले होते. विद्युत खांब हटवण्याचे काम महावितरण की महापालिका करणार याबाबतचा निर्णय प्रलंबित होता.अखेर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी हे काम महावितरणचा माध्यमातून करण्याचे आदेश दिले.त्यामुळे निविदा प्रक्रिया राबविण्यात आली आहे.दरम्यान, महिनाभरात हे काम पूर्ण करण्याची सूचना जिल्हाधिकार्‍यांनी महावितरणला दिली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com