दहावी, बारावीसाठी मास्तरांची 100 टक्के हजेरी सक्तीची

विद्यार्थ्यांच्या पटनोंदणीसाठी 30 जूनपर्यंतचा अल्टिमेटम
दहावी, बारावीसाठी मास्तरांची 100 टक्के हजेरी सक्तीची

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

विद्यार्थ्यांची 15 जून रोजी ऑनलाईन शाळा सुरु झाली आहे. त्यातच विद्यार्थ्यांची पटनोंदणी करुन इयत्ता पहिली ते आठवीच्या मुलामुलींची पटसंख्या 30 जूनपर्यंत पूर्ण करुन 1 जुलै रोजी पटसंख्या नोंदणीचा अहवाल जि.प.प्रशासनाला सादर करण्याचा आदेश शिक्षण विभागाने दिला आहे.

दरम्यान, इयत्ता पहिली ते नववी आणि अकरावीचे पन्नास टक्के शिक्षक उपस्थिती तर इयत्ता 10 व 12 वीचे शंभरटक्के शिक्षक उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे.

करोनाची दुसरी लाट अजूनही पूर्णत: ओसरलेली नाही. मात्र, 15 जून रोजी नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या सत्राला सुरुवात झाली आहे. इयत्ता पहिली ते नववी व अकरावीचे पन्नास टक्के शिक्षकांची तर इयत्ता दहावी व बारावीचे शंभरटक्के शिक्षक उपस्थिती अनिवार्य करण्यात आलेली आहे. याबाबत शिक्षण उपसंचालक द.गो.जगताप यांनी पत्रक काढले आहे.\

शहरासह जिल्ह्यातील शाळांनी गुगल फॉर्मद्वारे प्रवेशप्रक्रिया राबविण्यासंदर्भात शिक्षण विभागाने सूचना दिलेल्या आहेत. मोफत पाठ्यपुस्तके अद्यापी प्राप्त झालेले नाहीत. त्यामुळे मागील वर्षी वाटप केलेली व चांगल्या स्थितीत असलेली पुस्तके विद्यार्थ्यांना जमा करुन वर्गनिहाय वाटप करण्याच्या सूचना गटशिक्षणाधिकार्‍यांना दिल्या आहेत.

तसेच गृहभेटी देवून विद्यार्थ्यांची शाळेत येण्याची मानसिकता तयार करण्याची जबाबदारी शिक्षकांवर सोपविण्यात आली आहे. तसेच पालकांच्या सभा घेवून आवश्यक सूचना करण्याचे शिक्षण विभागाने निर्देशित केले आहे.

करोनाच्या पार्श्वभूमीवर मागील वर्षापासून शाळा बंदच आहेत. नोव्हेंबर महिन्यात शाळांची दारे विद्यार्थ्यांसाठी उघडली गेली होती. मात्र, कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे दीड महिन्यानंतर पुन्हा शाळा लॉक कराव्या लागल्या होत्या.

आता 15 जूनपासून नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव अजूनही कायम असल्याने प्रत्यक्ष शाळा सुरु करणे शक्य नाही. त्यामुळे ऑनलाईन शाळांना परवानगी शासनाने दिली आहे.

तत्पूर्वी शिक्षण उपसंचालकांनी सूचनापत्रक काढून पहिली ते इयत्ता नववी व इयत्ता अकरावीचे पन्नास टक्के शिक्षक उपस्थिती अनिवार्य केली आहे. तर इयत्ता 10 व 12 वीचे शंभरटक्के शिक्षक उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com