
जळगाव | प्रतिनिधी Jalgaon
शिव कॉलनी स्टॉपजवळील स्टेट बँकेच्या शाखेजवळील एटीएम फोडून १४ लाख ४१ हजार रुपये लंपास केल्याप्रकरणी उत्तरप्रदेश आणि हरियाणाच्या सीमेवर पोलिसांनी दोघांना अटक केली. तर तिसरा संशयित आरोपी पसार होण्यात यशस्वी झाला.
शिव कॉलनी स्टॉपजवळ स्टेट बँकेच्या शाखेजवळ एटीएम आणि डिपॉजिट मशीन आहे. येथील एटीएम चोरट्यांनी १२ जुलै रोजी पहाटे गॅस कटरच्या सहाय्याने फोडून १४ लाख ४१ हजार रुपये लांबवले आहेत. तर डिपॉजिट मशीन देखील फोडण्याचा प्रयत्न झालेला होता. ही घटना एटीएम मशीनच्या कॅबीनच्या जागा मालकाच्या सकाळी लक्षात आली होती. घटनास्थळी पोलिसांना ‘बबिता’ माचीस व लायटर आढळले होेते. ते त्यांनी गॅस कटरसाठी वापरले असावे. ही माचिस हरियाणामधील आहे. त्यामुळे चोरट्यांची गँग हरियाणामधीलच असावी, असा पोलिसांचा सुरुवातीपासूनच अंदाज होता.
एटीएम मशीनच्या कॅबीनमधील सीसीटीव्ह कॅमेर्यात १२ जुलै रोजी पहाटे १.५५ ते २.३३ वाजेदरम्यान रक्कम लांबवणारे तोंडाला रुमाल बांधलेले तीन जण कैद झाले आहेत. हे चोरटे रक्कम घेवून बाहेर रस्त्यावर लावण्यात आलेल्या कारमधून पसार झाले होते. याबाबत जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे. तसेच स्थानिक गुन्हे शाखेतर्फे देखील तपास सुरू होता.या घटनेतील संशयित आरोपी दोन आरोपींना उत्तरप्रदेश आणि हरियाणाच्या सीमेवर तेथील पोलिसांनी इतर गुन्ह्यात पकडले.
तिसरा संशयित आरोपी मात्र पसार झाला आहे. यातील निसार शफूर सैफी (वय ३८) आणि त्याचा लहान भाऊ इरफान शफूर सैफी (वय २९, दोघं रा. पलवल, हरीयाणा यांना पोलिसांनी अटक केली आहे. तिसरा संशयित मुख्य सूत्रधार कुरशीद मदारी सैफी (रा. अंघोला, ता.पलवल, हरियाणा) मात्र पसार झाला आहे. या दोन्ही आरोपींनी जळगावात एटीएम फोडल्याची कबुली पोलीस तपासात दली. यामुळे हरियाण येथील पोलिसांनी जळगावातील जिल्हापेठ पोलिसांशी संपर्क साधला.
यासंदर्भात जळगावातील पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली आणि संशयित दोघांनी एटीएम फोडल्याची पोलिसांची खात्री झाली. या दोघांना जिल्हापेठ पोलिसांच्या ताब्यामध्ये देण्यात आले आहे.