हॉटेलमध्ये दारुची चोरी करणारे दोघे जेरबंद

एमआयडीसी पोलिसांची कामगिरी
हॉटेलमध्ये दारुची चोरी करणारे दोघे जेरबंद

जळगाव । jalgaon प्रतिनिधी

जामनेर (Jamner) तालुक्यातील हॉटेलमधून 1 लाख 10 हजार रूपये किंमतीचा देशी-विदेशी दारुचा मुद्देमालाची चोरी करणार्‍या दोन संशयितांना एमआयडीसी (MIDC) पोलिसांनी अटक केली आहे. पुढील कारवाईसाठी दोघांना जामनेर (Jamner) पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

जामनेर तालुक्यातील गाडेगाव नेरी येथील शशिप्रभा हॉटेल (Shashiprabha Hotel) अज्ञात चोरट्यांनी दि. 19 एप्रिल रोजी मध्यरात्री फोडून दुकानातील 1 लाख 10 हजार 225 रुपये किमतीच्या देशी-विदेशी दारुचा मुद्देमाल चोरून नेला होता. याबाबत हॉटेलचा मॅनेजर शिवाजी दौलत पवार यांच्या फिर्यादीवरून जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान या गुन्ह्यातील गुन्हेगार जळगावात असल्याची माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांना मिळाली नुसार त्यांनी कारवाईच्या सूचना दिल्या. त्यानुसार एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक फौजदार अतुल वंजारी, पोलीस नाईक किशोर पाटील, चेतन सोनवणे, मुकेश पाटील, सचिन पाटील यांनी संशयित आरोपी दिनकर उर्फ पिण्या रोहिदास चव्हाण (वय-22) रा. मच्छीमार्केट सुप्रीम कॉलनी आणि सागर लक्ष्मण वाधवाणी (वय-20) रा. बाबानगर, सिंधी कॉलनी या दोघांना ताब्यात घेतले.

त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून एकुण मुद्देमालापैकी 54 हजार 567 रुपये किमतीचा मुद्देमाल काढून दिला. या गुन्ह्यात अजून तीन जण असून त्यांचा शोध सुरू आहे.

पिण्यावर 16 गंभीर गुन्हे दाखल

यातील संशयित आरोपी दिनकर उर्फ पिण्या हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्या विरोधात विविध ठिकाणी एकुण 16 गुन्हे दाखल आहेत. पुढील कारवाईसाठी दोन्ही संशयित आरोपींना जामनेर पोलीस ठाण्याचे पो.ना. अतुल पवार, राहुल पाटील यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.