रावेर तालुक्यात निंभोरा सिम ते पिंप्रीनांदु दरम्यान उद्या संचारबंदी

फैजपूर उपविभागीय अधिकारी यांचे आदेश
Curfew
Curfew

जळगाव - jalgaon

रावेर तालुक्यातील‌ निंभोरा सिम ते पिंप्रीनांदु दरम्यानच्या दोघे फाट्यापासून ते तापी पुलापर्यंत २२ ऑक्टोंबर रोजी सकाळी ९ वाजेपासून ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत. फैजपूर उपविभागीय अधिकारी कैलास कडलग यांनी हे संचारबंदी आदेश जारी केले आहेत.

केळी पिक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली नसल्याने पिक विम्याची रक्कम त्वरीत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणेसाठी शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने सचिन रमेश पाटील (चोरवड, ता. रावेर) व योगेश ब्रिजलाल पाटील (रा. मुंजलवाडी, ता. रावेर) हे १८ ऑक्टोंबर पासून रावेर तहसील कार्यालया समोर आमरण उपोषणास बसले आहे. यातील उपोषणार्थी रमेश नागराज पाटील हे रविवार, २२ ऑक्टोंबर रोजी दुपारी १ वाजता निंभोरा सिम ते पिंप्रीनांदु दरम्यान असलेल्या तापी पुलावरुन उडी मार आंदोलन करणार आहेत. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून पिंप्रीनांदु ते निंभोरा सिम दरम्यान तापी नदीवरील पुलावर प्रवेश बंदी करण्यात आला आहे. या परिसराची कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी व जनजीवन सुरळीत रहावे. याकरीता फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ अन्वये संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

संचारबंदी आदेशातून अत्यावश्यक सेवा तसेच शासकीय दौरे, शासकीय कर्तव्यावर हजर अधिकारी, कर्मचारी, पोलीस, रुग्णसेवा, पाणीपुरवठा, सार्वजनिक वितरण व्यवस्था तसेच सरकारी, खाजगी बँक, पतसंस्था व अंत्यविधी यांना लागू राहणार नाहीत. असे या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com