उमवित कला, वाणिज्य, विज्ञान शाखेत शिकणार्या विद्यार्थ्यांसाठी ही बातमी आहे खास...
जळगाव jalgaon प्रतिनिधी
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ (Poet Bahinabai Chaudhary North Maharashtra University) आणि राष्ट्रीय व्यापारी महासंघ (कॅट) (National Federation of Traders (CAT)) यांच्यात सामंजस्य करारावर (Memorandum of Understanding) दोन्ही बाजूंनी स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. नवीन शैक्षणिक धोरणाला अनुसरून विद्यार्थीभिमुख करार करणारे कबचौ उमवि हे पहिले विद्यापीठ ठरले आहे.
विद्यापीठाच्या सिनेट सभागृहात या करारानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी हे होते. कॅटचे राष्ट्रीय अध्यक्ष सीए. बी.सी. भारतीया, उद्योजक पुखराज पगारिया यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलतांना भारतीय महासंघाचे अध्यक्ष बी.सी. भारतीया यांनी हा सामंजस्य करार देशात पहिल्यादांच होत असून वाढत्या बेरोजगारीकडे गांभिर्याने बघण्याची गरज असून या करारामुळे विद्यार्थ्यांना व्यापाराची अनुभूती प्रत्यक्ष घेता येईल. तरूणांनी व्यापार आणि उद्योगाकडे अधिक संख्येनी वळण्याची गरज आहे. शिक्षण घे, नाही तर नोकरी मिळणार नाही अशा प्रकारचे पालकांकडून वारंवार सांगितले जाते ही मानसिकता बदलण्याची गरज आहे. महिलांनी देखील व्यापाराच्या मुख्य प्रवाहात यावे असे आवाहन त्यांनी केले.
विद्यापीठातील संशोधनातून काही व्यवासायिक अॅक्टीव्हिटी करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. श्री पगारिया आपल्या भाषणात म्हणाले की, व्यापारी हे रोजगार निर्माण करीत असतात. यापुढच्या काळात व्यापारांनी सामाजिक बांधिलकी जोपासण्याची गरज आहे. योग्य माणसे कामासाठी मिळत नाही ही व्यापाऱ्यांची समस्या असल्याचे ते म्हणाले.
कॅटचे महाराष्ट्राचे अध्यक्ष सचिन निवांगुणे म्हणाले की, या करारामुळे विद्यार्थी आणि व्यापारी या दोघांनाही भरपूर काही शिकायला मिळेल. विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक ज्ञान मिळेल तर व्यापाऱ्यांना मुलांकडून नवे तंत्रज्ञान शिकायला मिळेल यातून नवा महाराष्ट्र घडणार आहे.
अध्यक्षीय भाषणात कुलगुरू प्रा. माहेश्वरी म्हणाले की उद्योजक / व्यापारी आणि विद्यापीठ यांच्यातील अपेक्षांची दरी कमी करण्याचा प्रयत्न या करारामुळे होणार असून अशा प्रकारचा देशातील हा पहिला करार आहे. नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात व्यावसायिक मार्गदर्शन विद्यार्थ्यांना वर्ग खोली बाहेर मिळावे असे अभिप्रेत आहे. ते आता विद्यार्थ्यांना मिळेल. व्यापारी महासंघासोबत विद्यापीठ हे ज्ञानाचे भागीदार म्हणून काम करू इच्छित आहे असे ते म्हणाले.
औरंगाबाद येथील व्यापारी महासंघाचे पदाधिकारी अजय शहा यांनी विद्यार्थ्यांना या करारामुळे प्रशिक्षण मिळेल असे मत व्यक्त केले. नवउपक्रम, नव संशोधन सहचर्य मंडळाचे संचालक डॉ. राजेश जवळेकर यांनी प्रास्ताविक केले. महासंघाच्या वतीने बी.सी. भारतीया आणि विद्यापीठाच्या वतीने कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या. यावेळी मंचावर प्र-कुलगुरू प्रा. एस.टी. इंगळे, अधिष्ठाता प्रा. अनिल डोंगरे, व्यापारी महासंघाचे पुरूषोत्तम टावरी, प्रवीण पगारिया, दिलीप गांधी, नितीन बंग, संजय शहा, विनय श्रॉफ, राजेश गिंदोडीया, संगीता पाटील यांची उपस्थिती होती. प्रा. रमेश सरदार यांनी आभार मानले.
या करारामुळे कला, वाणिज्य व विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना शिक्षण घेत असतांना इंटर्नशिप करता येईल. व्यावसायिक, खाजगी व्यापारी प्रतिष्ठान यामध्ये खान्देशातील दहा ते पंधरा हजाार विद्यार्थ्यांना इंटर्नशिप प्राप्त होईल. कॅट कडून इंटर्नशिप पूर्ण झाल्यानंतर प्रमाणपत्र दिले जाईल.