
जळगाव jalgaon । प्रतिनिधी
महाबळ परिसरात असलेल्या दुकानात गेलेल्या दाम्पत्याच्या घरात चारचाकीतून आलेल्या चोरट्यांनी (Thieves) डल्ला मारल्याची (Burglary) घटना शनिवारी सकाळी 10 वाजेच्या सुमाराास रायसोनी नगरातील निसर्गसुंदर अपार्टमेंटमध्ये घडली. याठिकाणाहून चोरट्यांनी 2 लाख 30 हजारांचा ऐवज लंपास केला असून याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील रायसोनी नगरातील निसर्गसुंदर अपार्टमेंटमध्ये हेमंत अनंतराव पाटील हे वास्तव्यास असून ते एस. टी. महामंडळात मॅकनिक म्हणून नोकरीस आहे. पाटील यांचे महाबळ परिसरात कटलरीचे दुकान असल्याने ते पत्नीसोबत दुकानावर गेले होते. दुपारी जेवणासाठी ते घरी आले असता, त्यांना घराच्या दरवाजाला लावलेले कुलूप दिसले नाही तर दरवाजाला केवळ कडीकोयंडा दिसून आला. त्यांनी घरात जावून बघितले असता, घरातील गोदरेजचे कपाट उघडे होते तर त्यातील सामान अस्ताव्यस्त पडलेला होता.
पोलिसांची घटनास्थळी पाहणी
हेमंत पाटील यांनी बेडरुमध्ये जावून बघितल्यानंतर त्यांना बेडरुमधी कपाटाचे लॉकर उघडे दिसले. त्यांना घरात चोरी झाल्याची खात्री झाल्यानंतर त्यांनी तात्काळ रामानंदनगर पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यानुसार पोलीस उपअधीक्षक संदीप गावित, रामानंद नगरचे पोलीस उपनिरीक्षक रोहीदास गभाले यांच्यासह कर्मचार्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.
सोन्याचे दागिने लंपास
चोरट्यांनी हेमंत पाटील यांच्या घरातून सोन्याची मंगलपोत, कानातले, चैन, अंगठी, सोन्याचा कॉईन यासह रोख रक्कम असा एकूण 2 लाख 30 हजारांचा मुद्देमाल लांबविला. याप्रकरणी हेमंत पाटील यांच्या तक्ररीवरुन रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नातेवाईक समजून केले दुर्लक्ष
चोरटे चारचाकी वाहनातून येत त्यांनी अपार्टमेंटमध्ये प्रवेश केला. चोरट्यांनी चांगले कपडे देखील परिधान केले असल्याने सुरक्षारक्षकाला ते अपार्टमेंटमधील कोणाचे नातेवाईक असावे असे वाटल्याने त्यांनी अधिक चौकशी केली नाही.