
जळगाव - jalgaon
ग्रामीण भागातील रुग्णांना त्वरीत रुग्णालयांपर्यंत नेण्यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील (Guardian Minister Gulabrao Patil) यांनी जिल्ह्यातील ११ रुग्णवाहिकांसाठी (Ambulance) डीपीडीसी मधून २ कोटी निधी उपलब्ध करून दिल्यामुळे ११ रुग्ण वाहिकांना प्रशासकीय मान्यता दिलेली असून निविदा प्रक्रिया सुरु आहे. त्यामुळे लवकरच ११ रुग्णवाहिका लवकरच रुग्णांच्या सेवेसाठी दाखल होणार आहे. शासन व जिल्हा प्रशासन जनतेच्या व रुग्णांच्या सेवेसाठी कटिबद्ध असल्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.
जिल्ह्यातील ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या ७७ प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच त्यांच्या अखत्यारीत असलेल्या उपकेंद्राच्या माध्यमातून आरोग्य सेवा पुरविण्यात येते. मात्र काही प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये असलेल्या रुग्णवाहिका नादुरुस्त होत्या. त्यातच सध्या कोरोना सदृश्य विषाणू प्रादुर्भाव वाढत आहे. ग्रामीण भागातील रुग्णांना रुग्णालयात ये - जा करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी १० -१५ रुग्णवाहिका मिळाव्यात अशी मागणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी पालकमंत्र्यांकडे केली होती. त्यानुसार पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी याबाबत दखल घेऊन २ कोटी निधीची DPDC मार्फत तरतूद केली होती. यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांना दिलासा मिळणार आहे.