
जळगाव - jalgaon
भारतीय हवामान खाते (Department of Meteorology), कृषि हवामान प्रभाग, पुणे (pune) यांचेमार्फत राज्यात 14 ते 18 मार्च, 2023 या कालावधीत तुरळक ठिकाणी मेघगर्जना, वीजांचा कडकडाट, गारपिट व वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवली आहे.
14 ते 16 मार्च, 2023 दरम्यान जळगाव (jalgaon) जिल्ह्यात तुरळक ठिकाणी गारपिट होण्याची शक्यता असल्याने जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी या कालावधीत होणाऱ्या नैसर्गिक आपत्तीपासून पिकांचे संरक्षण व काळजी घेणेसाठी कृषि विभागाने मार्गदर्शक सुचना केल्या आहेत. हरभरा, गहु, ज्वारी, भाजीपाला आणि फळे जसे की, टरबुज, पपई व केळी यासारख्या परिपक्व पिकांची काढणी लवकरात लवकर करावी. काढणी केलेला माल सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात यावा. नवीन लागवड केलेली फळझाडे आणि भाजीपाला पिकांचे वाऱ्यापासुन संरक्षण करण्यासाठी बांबुच्या काड्या व पॉलीप्रॉपिलीनचा आधार द्यावा.
भाजीपाला व फळपिके झाकण्यासाठी हेलनेटचा वापर करावा. मेघगर्जना, वीजांचा कडकडाट, गारपिट व वादळी वारे या काळात जनावरांना सुरक्षित ठिकाण बांधावे. मळणी करणे शक्य नसल्यास कापणी केलेले पीक पॉलिथिन पेपर किंवा ताडपत्रीने झाकुन ठेवावे. आगंतुक स्वरुपात होणा-या नैसर्गिक आपत्तीपासुन पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेतकरी बांधवांनी या सुचनांचे पालन करावे. असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर (District Agriculture Officer Sambhaji Thakur) यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.