
रावेर|प्रतिनिधी Raver
अहिरवाडी (ता.रावेर) येथील धाडसी चोरी (Theft) झाल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. याबाबत रावेर (police) पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला आहे. येथील मोहगण रस्त्यावरील बाहेरपुरा भागातील रमेश शामराव महाजन यांच्या घरातून १५ लाखाची चोरी झाल्याचे सोमवारी सकाळी उघडकीस आले.
घराच्या मागे शेताचे तार कम्पाउंड तोडून,घराच्या मागील भिंतीचे सिमेंट खिडकीचे ग्रील तोडून घरातील दोन कपाटातून सोन्या चांदीच्या दागिन्यासह दीड लाखाच्या रोकडसह १५ लाखाचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला आहे. ज्यांच्या घरात चोरी झाले ते रमेश महाजन,त्यांची पत्नी,आई समोरच्या खोलीत झोपलेले होते.
घरातील कुलर खराब झाल्याने मुलगा बाहेर झोपला होता.या संधीचा फायदा घेत चोरट्यांनी रमेश महाजन यांच्या घरातून १५ लाखाचा ऐवज चोरून नेल्याचे दिसत आहे. तर बाजूला त्यांचे चुलत भाऊ सुरेश फकीर महाजन यांच्या घरात देखील प्रयत्न केला,घरातील सामानांची फेकाफेक करून फ्रीज मधील आंब्याचा रस रिचवून ७०० रुपये चोरून नेले आहे. याबाबत रावेर पोलिसांना माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल होवून कार्यवाही करत आहे.घटना स्थळी श्वान पथक व ठसे तज्ज्ञांचे पाचारण झाले आहे.