
जळगाव । प्रतिनिधी jalgaon
महामार्गावर पोलिसांनी अचानक ट्रक थांबविल्याने मागून दुचाकीवरुन घरी परतणार्या तरुणाची दुचाकी ट्रकवर आदळली. ही घटना सोमवारी सकाळी 7.30 वाजच्या समारास महामार्गावरील पाळधी दूरक्षेत्र पोलिस चौकीजवळ घडली. यामध्ये दुचाकीस्वार संदीप गोरख देसले (वय-35, रा. कुसुंबा ता.जि.जळगाव) हा तरुण जागीच ठार झाला.
याबाबत नातेवाईकांकडून मिळालेली माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथे संदीप देसले हा तरुण पत्नी व दोन मुलांसह वास्तव्याला होता. खासगी लक्झरीवर चालक म्हणून तो कामाला होता. नेहमीप्रमाणे त्याने सुरत ते कासोदा येथून लक्झरीची ट्रिप आणून सकाळी 6 वाजता कासोदा येथे प्रवाशांना सोडले. त्यानंतर कासोदा येथून जळगावकडे येण्यासाठी संदीप दुचाकीने सोमवारी 19 जून रोजी सकाळी निघाला. दरम्यान सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास जळगाव शहराजवळील पाळधी गावाजवळ राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक पोलिसांनी धरणगांकडून जळगावकडे येणार्या ट्रकला थांबविले. चालकाने बे्रक दाबताच महामार्गावर अचानक ट्रक थांबला आणि मागून येणारा संदीप हा ट्रकवर आदळल्यामुळे तो गंभीर जखमी झाला.
उपचारापुर्वीच मालवली प्राणज्योत
अचानक थांबलेल्या ट्रकवर दुचाकीस्वार तरुण आदळल्याने तो गंभीर जखमी झाल्याची घटना महामार्ग पोलिसांना कळताच, त्यांनी जखमी संदीपला तात्काळ शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल केले. परंतु त्यापुर्वी त्याची प्राणज्योत मालवली होती. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.