पैशांशिवाय आनंद शोधतो तो जगातील श्रीमंत व्यक्ती

अंतर्नाद प्रतिष्ठानतर्फे आयोजित ऑनलाइन पुष्पांजली प्रबोधनमालेत मनोज गोविंदवार यांचे प्रतिपादन
पैशांशिवाय आनंद शोधतो तो जगातील श्रीमंत व्यक्ती

भुसावळ Bhusaval । प्रतिनिधी

आयुष्यात बँकेचा बॅलन्स महत्त्वाचा आहे. पण त्याहून जास्त महत्त्वाचा आहे, मनाचा बॅलेन्स (Balance of mind) मनाचा आणि विचारांचा बॅलन्स (Balance of thoughts) नसेल तर आयुष्याचा बॅलन्स (balance of life) बिघडतो. ज्याला पैशांशिवाय आनंद शोधता येतो तो जगातील श्रीमंत व्यक्ती, असे प्रतिपादन व्याख्याते मनोज गोविंदवार (Lecturer Manoj Govindwar) यांनी केले.

येथील अंतर्नाद प्रतिष्ठानतर्फे स्व.पुष्पा वसंतराव पाटील यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पुष्पांजली या ऑनलाइन प्रबोधनमालेचे पहिले पुष्प दि. 27 रोजी गुंफण्यात आले. यावेळी ‘आयुष्याचे बॅलन्सशीट’ या विषयावर महाराष्ट्रातील शेकडो तरुणांचे मेंटॉर, लेखक आणि व्याख्याते मनोज गोविंदवार यांनी संवाद साधला. यावर्षी पुष्पांजली प्रबोधनमालेचे चौथे वर्ष आहे. प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक युवराज लोणारी यांची उपस्थिती होती. व्याख्यानातून मुलांवर संस्कार होतात, असे मनोगत प्रकल्पप्रमुख ज्ञानेश्वर घुले यांनी प्रास्ताविकात केले. समाजातील गरजा लक्षात घेऊन अंतर्नाद विविध उपक्रम राबवित असते. या कार्यक्रमामध्ये सहभागी होतांना आनंद व्यक्त होत असल्याची भावना माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक युवराज लोणारी यांनी व्यक्त केली. समाजाला नवी दिशा देणारे उपक्रम गरजेचे असल्याचे मत अमोल जावळे यांनी व्यक्त केले. समाजात सकारात्मक विचार रुजण्याच्या उद्देशाने पुष्पांजली प्रबोधनमाला सुरु केल्याचे अंतर्नाद प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप पाटील यांनी नमुद केले.

असे तयार होते आयुष्याचे बॅलन्सशीट - आयुष्याचे बॅलन्सशीट कसे तयार होते. यावर बोलताना गोविंदवार म्हणतात की, आपल्या अवतीभोवती असे अनेक माणसे असतात जे सतत विचारांच्या गोंधळात असतात, पैशाचे बॅलन्स शीट तयार करण्याच्या धावपळीत जगणंच हरवून जातात. आयुष्याचे बॅलन्सशीट हे आई-वडिलांच्या संस्काराशी, आपल्या भावनांशी, देशाच्या हिताशी, मैत्रीच्या नात्याशी, मुलाच्या संगोपनाशी आणि जगण्यावरच्या प्रेमाशी आपली बांधिलकी किती त्यातून तयार होते.

यशस्वी माणसाची परिभाषा - यशस्वी माणूस कोण असतो हे सांगताना गोविंदवार म्हणाले की, बिल गेट्स आणि वॉरन बुफे या जगातील सर्वात श्रीमंत माणसांना यशस्वी माणूस कोण असतो हा प्रश्न विचारला असता त्यांनी एकच उत्तर दिले की, ज्या माणसासोबत राहणारी माणसे त्याच्यामुळे खूश असतात तो जगातील यशस्वी माणूस.

उपक्रमाला जळगावचे विघ्नहर्ता कंस्ट्रक्शनचे संचालक अजय बढे यांचे सहकार्य लाभले तर दीपस्तंभ फाउंडेशनचे संस्थापक यजुर्वेंद्र महाजन आणि अमोल हरीभाऊ जावळे यांचे मार्गदर्शन लाभले.कार्यक्रमाच्या शेवटी सांख्यिकी अन्वेषक, राज्य कुटुंब कल्याण कार्यालय, पुणे येथील जयश्री शेलार, जैन इरिगेशनचे जनसंपर्क प्रमुख किशोर कुलकर्णी यांनी प्रेक्षक मनोगत व्यक्त केले. यशस्वीतेसाठी प्रकल्प प्रमुख ज्ञानेश्वर घुले, समन्वयक डॉ.संजय भटकर, सहसमन्वयक देव सरकटे, राजू वारके यांनी सहकार्य केले. सूत्रसंचालन जीवन महाजन यांनी तर आभार देव सरकटे यांनी मानले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com