धान्यावर डल्ला मारणाऱ्या रेशन दुकानदारांचे परवाने अखेर रद्द

जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी केली मोठी कारवाई
धान्यावर डल्ला मारणाऱ्या रेशन दुकानदारांचे परवाने अखेर रद्द

अमळनेर Amalner प्रतिनिधी

  गरीबांच्या धान्यावर डल्ला मारणाऱ्या तीन दुकानांचे (Three shops) परवाने (licenses) जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी (District Supply Officers) अखेर रद्द (canceled) केले आहे. त्यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. यात भिलाली, एकलहरे आणि भरवस येथील रेशन दुकानांचा समावेश आहे. या दुकानावर करण्यात आलेली कारवाई म्हणजे अमळनेर तालुक्यात रेशन मालाचा भ्रष्टाचार सुरू असल्याचा मोठा पुरावा आहे. यामुळे याला पाठींबा देणारे तत्कालिन तहसीलदार मिलिंद वाघ आणि गोडाऊन व्यवस्थापक अनिल पाटील यांच्यावर ही कारवाई होणे अटळ आहे.

 याबाबत अधिक माहिती अशी की, अमळनेर तालुक्यातील एकलहरे, भरवस आणि भिलाली येथील रेशन दुकानदारांनी गरीबांच्या धान्याचे वाटप न करता सर्व माल हडप करण्यासाठी त्याचा साठा करून ठेवला होता. याबाबत प्रांताधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यानंतर त्यांनी तहसीलदार आणि पुरवठा निरीक्षक यांना या दुकानांची तपासणी करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर लगेच या दोन्ही अधिकाऱ्यांनी त्या, त्या गावात जाऊन दुकानांची तपासणी केली होती. त्यात भिलाली येथील सुनील भास्कर पाटील यांच्या दुकान क्रमांक ८४ येथे ४.६१ क्विंटल गहू व २१.७९ क्विंटल तांदूळ, एकलहरे येथील रत्नाबाई सयाजीराव पाटील यांच्या दुकान क्रमांक ८२  येथे १०.१७ क्विंटल गहू आणि १.८७ क्विंटल तांदूळ,भरवस येथील अशोक विनायक पाटील यांच्या  दुकान क्रमांक ६९ मध्ये १५.८८ क्विंटल गहू आणि ३१.७ क्विंटल तांदूळ जास्तीचा आढळून आला होता. 

 या दुकानांचा रितसर पंचनामा करण्यात आला. यात दुकानादारांनी साठावून ठेवलेला हा माल त्यांनी लाभार्थ्यांना वाटप न करता तो काळाबाजारात विक्रीसाठी साठवण्याचे उघड झाले. याबाबातच अहवाल जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे पाठवण्यात आला होता. त्यानुसार या तिन्ही दुकानदारांची जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी जळगाव येथे सुनावणी (हेरींग)घेतली. त्यात त्यांना समाधानकारक उत्तरे देता आली नाही. त्यामुळे अखेर जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी या तिन्ही दुकानांचे परवाने रद्द केल्याचे आदेश महाराष्ट्र अनुसूचित वस्तू वितरणाचे विनियमन आदेश, १९७५ मधील खंड ३(४) नुसार काढले आहेत. 

तालुक्यात रेशनचा भ्रष्टाचार असल्याचे सिद्ध  अमळनेर तालुक्यातील रेशन दुकानांचे परवाने रद्द करण्यात आल्याने यात मोठा भ्रष्ट्राचार होत असल्याचे सिद्ध झाले आहे. याबाबत तक्रार केल्याने हा भ्रष्टचार उघडकीस आला. जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनीही याची दखल घेऊन थेट कारवाई केली आहे. आता तहसीलदार वाघ आणि गोडाऊन व्यवस्थापक यांच्यावरही कारवाईसाठी लढा सुरु रहाणार आहे. त्यांच्यावर ही लवकरच कारवाई होईल.

 -जितेंद्र ठाकूर, तक्रारदार, अमळनेर

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com