मृतांच्या कुटुंबियांचे पालकमंत्र्यांनी केले सांत्वन

अपघातात मयत झालेल्या मजुरांचे प्रेतं बघून सर्वच झाले सुन्न
मृतांच्या कुटुंबियांचे पालकमंत्र्यांनी केले सांत्वन

जळगाव - Jalgaon

जिल्ह्यातील किनगाव, ता.यावल येथे पपई घेऊन जाणाऱा आयशर टेम्पो पलटी होऊन त्यात रावेर तालुक्यातील १५ मजूर मृत्यूमुखी पडले आहेत.

या मजुरांच्या कुटुंबियांना प्रत्येकी २ लाख रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून देण्यात येणार असून अपघातात गंभीर आणि किरकोळ जखमी झालेल्या मजुरांवर शासकीय खर्चाने उपचार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत, अशी माहिती राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांनी मृतांच्या कुटुंबियांच्या भेटीप्रसंगी दिली.

आज दि.१५ फेब्रुवारी रोजी पहाटे किनगाव (ता.यावल) येथे आयशर टेम्पो पलटी होवून झालेल्या अपघातात रावेर शहरातील २, केऱ्हाळे व विवरे येथील प्रत्येकी १, तर अभोडे येथील ११ असा एकूण 15 व्यक्तींचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या अपघाताबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेसह पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले.

घटनेची माहिती मिळताच पालकमंत्री श्री.पाटील यांनी आज दुपारी रावेर, अभोडे व विवरे येथील मृत कुटुंबियांच्या घरी जाऊन नातेवाईकांची आस्थेवाईकपणे चौकशी करून त्यांचे सांत्वन केले.

तसेच स्मशानभूमीत उपस्थित राहून मृतांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी आ.शिरीष चौधरी, प्रल्हाद महाजन, योगीराज पाटील, पो.नि.रामदास वाकोडे, नायब तहसीलदार चंदू पवार, आनंद बाविस्कर, प्रदीप सपकाळे, भुसावळचे माजी नगराध्यक्ष अनिल चौधरी तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी व मृतांचे नातेवाईक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com