Video युरियाची टंचाई ; शासन दोनच दिवसात युरिया उपलब्ध करेल-कृषीमंत्री दादाजी भुसे

चाळीसगाव : देवळी येथे कृषी औजार सेवा केंद्राचे दादाजी भुसे यांच्या हस्ते उद्घाटन, कृषीमंत्र्यांनी जमिनीवर बसून साधला शेतकर्‍यांशी संवाद, युरियाचा दिड लाख टन बफर स्टॉक
Video युरियाची टंचाई ; शासन दोनच दिवसात युरिया उपलब्ध करेल-कृषीमंत्री दादाजी भुसे

चाळीसगाव Chalisgaon प्रतिनिधी

युरिया खताबाबत शेतकर्‍यांनी निश्चिंत राहावे अशी ग्वाही दिली शासनाच्या कृषी विभागाने यावर्षी युरियाचा दिड लाख टन बफर स्टॉक केलेला आहे राज्यात कुठेही युरिया खताची टंचाई जाणवल्यास केवळ दोनच दिवसात त्याठिकाणी शासन युरिया उपलब्ध करून देईल, त्याच बरोबर शेतकर्‍यांना कुठेही कृषी केंद्र चालकांकडून अडवणूक किंवा लुबाडणूक करण्यात येत असल्यास तत्काळ तक्रार करण्याचे व आपणास कळवण्याची सूचना राज्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी केले.

तालुक्यातील देवळी येथे कृषी औजार सेवा केंद्राचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते शनिवारी रात्री ९ वाजेच्या दरम्यान उद्घाटन यावेळी ते बोलत होते. यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी नयनवाड साहेब, पंचायत समिती सभापती अजय पाटील, उपसभापती भाऊसाहेब पाटील, बीडीओ नंदकुमार वायेकर, तालुका कृषी अधिकारी चंद्रशेखर साठे, पंचायत समितीचे कृषी अधिकारी एम एस भालेराव, पल्लवी हिरवे, मंडळ कृषी अधिकारी संजय पगारे, कृषी सहाय्यक आत्माचे तालूका तंत्रज्ञान व्यवस्थापक ज्ञानेश्वर पवार यांच्यासह देवळी दडपिंप्री आडगाव पिंप्री चिंचखेडे डोणपिंप्री भोरस आदी गावातील शेतकरी उपस्थित होते.

पुढे शेतकर्‍यांशी संवाद साधतांना ना.दादाजी भुसे म्हणाले की, सरकार आर्थिक अडचणीत असतानाही कमीत कमी वेळात जास्तीत जास्त शेतकर्‍यांना म्हणजेच ३१ लाख शेतकर्‍यांना वीस हजार कोटी रुपयांची कर्जमाफी दिली. तसेच उर्वरित वंचित शेतकर्‍यांनाही करोना संकटानंतर राज्याची आर्थिक स्थिती सुधारल्या बरोबर कर्जमाफीचा लाभ देण्यात येईल.

याप्रसंगी शेतकर्‍यांना बीज प्रक्रिया विषयी व समतोल खत व्यवस्थापनाबाबत कृषी सहाय्यक अनिल महाजन यांच्याकडून मार्गदर्शन करण्यात आले तसेच बीबीएफ यंत्राद्वारे पेरणी करून उत्पादनासोबतच मृदा व जलसंधारणेत होणार्‍या वाढीबाबत जागरुकता निर्माण करण्यात आली पिंप्रीखुर्द येथिल नाना पाटील आडगावचे जयदीप पाटील देवळीचे तुकाराम पाटील पिंप्रीचे भाऊसाहेब पाटील डोणचे गोरख पारधी आदींनी शेतकर्‍यांच्या अडचणी व लाभ घेतलेल्या शासकिय योजनांबाबत माहिती दिली.

आत्मा अंतर्गत स्थापित क्रांतिवीर रेशीम उत्पादक गटाच्या वतीने स्थापन करण्यात आलेल्या ट्रॅक्टर व ट्रॅक्टर चलीत अवजारांच्या अवजार बँके ही क्रांतिवीर रेशीम गटाच्या सदस्यांनी एकत्र येऊन नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना पोकरा अंतर्गत कमी अंतराच्या पिकांत व फळबागेत आंतरमशागतीस येणार्‍या अडचणी लक्षात घेऊन स्थापन करण्यात आली आहे. यात लहान ट्रॅक्टर व त्यासोबत अवजारे स्वनिधीतून खरेदी केले व त्यासाठी शेड सुद्धा स्वनिधीतून बांधण्यात आले व एकूण १८ लाख बावीस हजार रुपयांचे कृषी अवजार सेवा केंद्राची स्थापना केली गटाचे अध्यक्ष विवेक रणदिवे यांनी मंत्री महोदयांना अवजारांची पाहणी करतांना सदर सेवा केंद्राचा उद्देश शेतकर्‍यांना प्रचलित दरापेक्षा कमी व किफायतशीर दरात शेतीच्या मशागतीस औजारे उपलब्ध करून देणे व गटाला आर्थिक स्थैर्य प्राप्त करून देणे आहे असे सांगितले, याबाबत मंत्रीमहोदयांनी गटाचे कौतूकही केले सदर कृषी अवजार सेवा केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी माननीय कृषिमंत्र्यांनी खुर्चीवर न बसता शेतकर्‍यांमध्ये जमिनीवर बसून शेतकर्‍यांसोबत संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. शेवटी गटाचे अध्यक्ष विवेक रणदिवे यांनी आभार मानले.

Related Stories

No stories found.