गिरणा नदीपात्रात बुडालेल्या तरूणाचा मृतदेह आढळला

तरूणाला बघताच नातेवाईकांनी फोडला हंबरडा
गिरणा नदीपात्रात बुडालेल्या तरूणाचा मृतदेह आढळला

जळगाव - jalgaon

काल दि.११ रविवार रोजी सुटीचा दिवस असल्याने कांताई बंधाऱ्याजवळ (Kantai Dam) नागाई जोगाई मंदिर परिसरात गिरणा नदी (Girna River) पात्रात फिरायला गेलेल्या तरुणांपैकी एक तरुण रविवारी ११ सप्टेंबर रोजी बुडाल्यामुळे बेपत्ता झाला होता. तब्बल २४ तासानंतर त्याचा मृतदेह नदीच्या पात्रामधून बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आले आहे.

शिवाजीनगर (Shivajinagar) येथील दूध फेडरेशन जवळ असलेल्या मिथिला सोसायटी येथील १२ ते १४ तरुण हे सहलीसाठी कांताई बंधारा जवळ असलेल्या नागाई जोगाई मंदिर परिसरातील गिरणा नदीच्या पात्राजवळ रविवारी ११ रोजी गेले होते. या ठिकाणी दुपारी १२ वाजेच्या सुमारास फोटो काढण्यासाठी योगिता दामू पाटील (वय २०), सागर दामू पाटील (वय २४), समीक्षा विपिन शिरोडकर (वय १७), नयन योगेश निंबाळकर (वय १७) हे नदीच्या काठाजवळ गेले होते. त्या ठिकाणी फोटो काढत असताना त्यांचा पाय घसरला. ते पाण्यात पडले. ते पाहून उपस्थित इतर तरुणांनी त्यांना वाचविण्यासाठी धाव घेतली.

यावेळी योगिता, सागर आणि समीक्षा या तरुणांना बाहेर काढण्यात यश आले. मात्र नयन निंबाळकर हा वाहत्या पाण्यामध्ये वाहून गेला होता. त्याचा शोध घेता तो मिळून आला नव्हता. संध्याकाळी ५ वाजेपर्यंत प्रशासन त्याचा शोध घेत होते.

अखेर आज सोमवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास गिरणा नदीच्या पात्रातच नयन निंबाळकर यांचा मृतदेह आढळून आला. त्याला शासकीय वैद्यकीय विद्यालय व रुग्णालयात आणण्यात आले असता या ठिकाणी नातेवाईकांनी प्रचंड आक्रोश केला. तालुका पोलीस स्टेशनचे कर्मचारी पुढील कार्यवाही करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com