महाराष्ट्र बंदला वरणगावात गालबोट

राष्ट्रवादी, भाजप कार्यकर्ते भिडले : माजी नगराध्यक्षासह दोघे मारहाणीत जखमी
महाराष्ट्र बंदला वरणगावात गालबोट
वरणगाव येथील बसस्थानक चौक

वरणगाव, ता. भुसावळ वार्ताहर) bhusawal

शेतकरी विरोधातील तीन कायदे रद्द करण्यासाठी शेतकर्‍यांना पाठिंबा म्हणून महा विकास आघाडीतर्फे दि. ११ रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. त्यानिमित्ताने वरणगाव येथे महाविकास आघाडीतर्फे व्यापार्‍यांना दुकाने बंदचे आव्हान करण्यात आले होते. तर दुसरीकडे भाजपने वरणगावात व्यापार्‍यांना दुकाने उघडण्याचे आव्हान केल्याने महा विकास आघाडी व भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा होऊन काही वेळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.

लखीपुर येथे भाजपचे केंद्रीय मंत्र्यांच्या मुलांच्या व कार्यकर्त्याच्या गाडीने चार शेतकर्‍यांना गाडीखाली चिरडून मारल्याने त्या घटनेचा निषेध म्हणून आज महाविकास आघाडीतर्फे शहरातील व्यापार्‍यांना बंद करण्याचे आव्हान करण्यात आले होते. शहरातील व्यापार्‍यांनी त्यांच्या प्रतिसाद देऊन दुकाने स्वतःहून बंद केलेली होती. महा विकास आघाडीतील घटक पक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस शिवसेना व राष्ट्रीय कॉंग्रेस या पक्षांचे कार्यकर्ते व्यापार्‍यांना आव्हान केल्यानंतर अकरा वाजेच्या दरम्यान बस स्टँड चौकात उभे असताना अचानक भाजपचे दहा-बारा कार्यकर्ते घोषणा देत व व्यापार्‍यांना दुकानदारांना आपली दुकाने उघडी करा असे आव्हान करत येत होते. या दहा-बारा कार्यकर्त्यांना बस स्टँड चौकात महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या समोर व्यापार्‍यांना दुकाने उघडण्याचे चिथावणीखोर आव्हान केल्याने महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी एपीआय आशिष अडसूळ यांना भाजपच्या कार्यकर्त्यांना थांबवण्याची विनंती केली. परंतु ते लोकशाहीच्या मार्गाने त्यांचे आंदोलन करीत असल्याने मी त्यांना थांबू शकत नाही असे सांगण्यात आले. व भाजपच्या कार्यकर्त्यांना व्यापार्‍यांना दुकाने उघडी करण्यासाठी जाऊ देण्यात आले त्याचा राग महा विकास आघाडीतील काही कार्यकर्त्यांना आला व त्यांनी आनंद सायकल मार्ट समोर रस्त्यावर बसून उपोषण सुरू केले. त्यानंतरही एपीआय आशिष अडसूळ यांनी कोणताही निर्णय न घेतल्याने पुन्हा महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी व्यापार्‍यांना बंदचे आवाहन करण्यासाठी तेही भाजपा कार्यकर्त्यांच्या मागून निघाले असता रेल्वेस्टेशनकडून भाजपचे कार्यकर्ते व बस स्टँडकडून महा विकास आघाडीचे कार्यकर्त जिजाऊ जनरल स्टोअर समोर दोघं कार्यकर्ते एकमेकांसमोर आले व दोघं कार्यकर्त्यांमध्ये हातापाई सुरू होऊन भाजपाचे सुनील काळे यांनी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दीपक मराठे यांची कंठी पकडल्याने वातावरणात तणाव निर्माण होऊन त्या ठिकाणी दोघांमध्ये झटापटी झाली.

त्यात सुनील काळे, शंकर पवार यांना जबर मार लागल्याने त्यांना ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले तसेच दीपक मराठे व महेश सोनवणे यांना ही जबर मार लागल्याने त्यांना भोईटे हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले होते. काही वेळाने मुक्ताईनगर येथून अतिरिक्त पोलिस कुमक तसेच जळगाव येथून दंगा पथक आल्याने बस स्टँड चौकात व शहरात शांतता निर्माण झाली. दरम्यान, कोणत्याही राजकीय पक्षाला आंदोलनाची परवानगी दिली नव्हती. तसेच वरणगाव पोलीसात कोणीही फिर्याद दिली नसल्याने कोणताही गुन्हा दाखल नसल्याचे एपीआय आशिष अडसूळ यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.