हुडहुडीऽऽ

जळगाव 10.7, धुळे 11 तर नंदुरबार @ 12
हुडहुडीऽऽ

जळगाव - Jalgaon :

राज्यात दोन दिवसांपासून थंडीला चांगलीच सुरुवात झाली आहे. पहाटे पहाटे हवेत गारवा जाणवत आहे. गेले दोन दिवस तापमानात घट होताना दिसून येत आहे.

आज दुसर्‍या दिवशी तापमानात लक्षणीय घट झालेली दिसून येत आहे. पुणे आणि नाशिक, जळगावात तापमान सर्वाधिक कमी असल्याची नोंद करण्यात आली आहे.

राज्यात काही ठिकाणी किमान तापमान 10 अंशाच्या आसपास राहिले आहे. त्यामुळे राज्यात थंडीची चाहूल दिसून येत आहे.

अनेक ठिकाणी हवेत झोंबणारा गारवा जाणवत आहे. राज्यात सलग दुसर्‍या दिवशी तापमान मोठी घट झाली असून पुण्यात 9.8 तापमानाची नोंद झाली आहे.

नाशिकमध्ये 10.4 तर जळगावात 10.7 अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले आहे.मुंबई, नवी मुंबई, ठाणे या शहरातही तापमानात घट झाली आहे.

सांताक्रुझ येथे 19.8 अंश सेल्सिअस, डहाणू 18.8 अंश, बारामती 11.9 अंश, औरंगाबाद 12.8, परभणी 13 अंश सेल्सिअ, चंद्रपूरमध्ये 11.2 अंश तर यवतमाळ येथे 11.5 आणि नागपूर येथे 18.3 अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले आहे.

धुळे, नंदुरबारमध्ये कडाका

धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यामध्ये थंडीचा कडाका वाढताच गरम कपड्यांची मागणी प्रचंड वाढली आहे. स्वेटर्स, मफलर्स, कानटोप्या आणि लहान मुलांसाठी गरम कपड्यांना विशेष मागणी बाजारपेठेत दिसून येत आहे. थंडी वाढल्या बरोबर विक्रेत्यांनीही गरम कपड्यांच्या किमतींमध्ये वाढ केल्याचे दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून धुळे आण नंदुरबार जिल्ह्यात 10 ते 12 अंश सेल्सिअसपर्यंत तापमानाची नोंद झालेली आहे.

रब्बी पिकांना होणार फायदा !

वाढत्या थंडीचा रब्बी पिकांना चांगलाच फायदा होणार आहे. खान्देशात गहू, हरभर्‍याची मोठ्या प्रमाणात लागवड होते. त्यासाठी सध्या मशागतीची कामे सुरू असून पुढील आठवड्यापासून पेरणीला प्रारंभ होईल.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com