Encounter ... : सांग ‘एकनाथा’ कोणता झेंडा घेऊ हाती?

बदलत्या राजकिय घडामोडींमुळे कार्यकर्त्यांसमोर प्रश्न
Encounter ... : सांग ‘एकनाथा’ कोणता झेंडा घेऊ हाती?

जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात आ.एकनाथ खडसे यांचा बर्‍यापैंकी दबदबा आहे. त्यात आ.खडसे यांचे भुसावळवर विशेष प्रेम आहे. या एकनाथाच्या जोडिला मुख्यमंत्र्यांच्या रूपाने आणखी एकाची नामदार एकनाथाची भर पडली आहे. आ.खडसे यांनी भाजप सोडला तर ना.शिंदे यांनी शिवसेना फोडली. या दोघांच्या या भुमिकेमुळे भुसावळच्या राजकारणावरही त्यांचे पडसाद उमटले असुन केवळ कार्यकर्तेच नव्हे तर पदाधिकार्‍यांनाही प्रश्न पडला आहे की, सांग ‘एकनाथा’कोणता झेंडा घेऊ हाती?

आ.खडसे यांनी चाळीस वर्ष ज्या भाजपाची साथ संगत केली तो भाजप पक्ष त्यांना सोडावा लागला. श्री.खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खा.शरद पवार यांनी श्री.खडसे यांना विधानपरिषदेवर घेवून त्यांना आमदार करून पुनर्वसनही केले. आ.खडसे म्हणजे राजकिय चुंबक असल्याने भल्याभल्यांनी भाजप सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला. भुसावळ भाजपात सहज मोजता येईल इतकेच नगरसेवक शिल्लक राहिले.

आ.खडसे याच्ंया राष्ट्रवादी प्रवेशामुळे भुसावळमध्ये आ.खडसे समर्थक व माजी आ.संतोष चौधरी समर्थक असे सरळसरळ दोन गट निर्माण झाले असून पक्षाच्या कार्यक्रमातून वेळोवेळी ते दिसुन आले आहे. भुसावळ नगरपरिषद निवडणुकीत हे चित्र स्पष्ट होईल. एकूणच आ.खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे भुसावळ भाजपला खिंडार पडले तर स्वपक्षात (राष्ट्रवादी) दोन गट निर्माण झाल्याने येथील पदाधिकारी व कार्यकर्त्यांसमोर मोठा प्रश्न उभा राहिलेला आहे.

दुसरीकडे भुसावळची शिवसेना आधीच व्हेंटीलेटरवर आहे. या शिवसेनेला जिवंत ठेवण्यासाठी तत्कालीन पालकमंत्री हे वेळोवेळी ऑक्सिजन पुरवठा करित असल्याने ती कशीबशी उभी आहे. शिवसेनेच्या नाममात्र एक नगरसेवक मुकेश गुंजाळ हे एकतर्फी खिंड लढवित असतात तर शिवसेनेचे संपर्क नेते विलास पारकर, जिल्हा प्रमुख समाधान महाजन हे कार्यकर्ते सांभळण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करित असतात.

शिवसेनेचा मुख्यमंत्री असुनही सेनेची हवी तशी ताकद दिसत नव्हती, असे असतांना अचानक सेनेतही बंड उफाळले व भाजपच्या साथीने एकनाथ शिंदे एका तासात आमदाराचे नामदार झाले. शिंदे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान व्हायच्या आधी म्हणजे बंड केल्यानंतर ‘डॅमेज कंट्रोल’साठी शिवसेनेने भुसावळ येथे ब्राह्मण संघात सेनेचा तालुका मेळावा घेवून आम्ही पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंसोबतच आहोत हे सिध्द करून दाखविले या मेळाव्याला सेनेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

अगदी गुलाबराव पाटील यांचे खंदे समर्थक दिपक धांडे व अन्य देखील उपस्थित होते. श्री.शिंदे यांच्या बंडखोर गटात जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील हे देखील सहभागी झाले आहेत व पाटील यांच्या ‘ऑक्सिजन’वर भुसावळची शिवसेना तग धरून असतांना येणार्‍या काळात गुलाबराव पाटील सोबत अर्थात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोबत कोण राहतं व उध्दव ठाकरेंच्या सेनेत कोण उरत हे दिसून येणार आहे.

एकंदरीतच भुसावळच्या राजकारणात या दोन एकनाथांच्या ‘एन्ट्री’मुळे सामान्य कार्यकर्त्यांसह पदाधिकार्‍यांनाही प्रश्न पडला आहे. सांग ‘एकनाथा’ कोणता झेंडा घेऊ हाती?

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com