
जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :
आरोग्य कर्मचार्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हा परिषदेचे लोकप्रतिनिधी यांनीदेखील वेळोवेळी आरोग्य समिती, स्थायी समितीमध्ये विषय मांडलेले आहे. परंतु आज अखेर देखील आरोग्य कर्मचार्यांच्या सेवाविषयक बाबी प्रलंबित असून आरोग्य कर्मचार्यांनी आजपर्यंत दिलेल्या अविरत आरोग्यसेवा लक्षात घेऊन ,
वर्षानुवर्षेपासून प्रलंबित असलेले आरोग्य कर्मचार्यांचे जिव्हाळ्याचे सेवाविषयक प्रश्न एकाच वेळी शिबिर घेऊन मार्गी लागावेत,अशी मागणी महाराष्ट्र राज्य कॉस्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ आरोग्य कर्मचारी संघटना व बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी संघटनेतर्फे जि.प.सीईओ डॉ. पंकज आशिया, जि.प. समाज कल्याण सभापती जयपाल बोदडे यांना निवेदन देण्यात आले.
महाराष्ट्र राज्य कॉस्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ आरोग्य कर्मचारी संघटना व बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी संघटनेतर्फे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे विभागीय अध्यक्ष अनिल सुरडकर, केंद्रीय सहसचिव आर.एस. अडकमोल, जिल्हाध्यक्ष संजय ठाकूर, उपाध्यक्ष सुनील निकम, उपाध्यक्ष जे.बी. नन्नवरे, प्रकाश पारधे, राजेंद्र वानखेडे, करुणा घोडेस्वार, शारदा राजपूत, विजया पाटील, आरोग्य कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष इंदिरा सोनवणे, युवराज सोनवणे,उपाध्यक्ष शिवाजी गुरगुडे, कैलास राठोड, धनराज सोनवणे, अरुण वारुळे, प्रमोद रगरे, विजय देशमुख आदी पदाधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यातील सर्व आरोग्य कर्मचार्यांनी त्यांचेकडे असलेले आधीचे सर्व आरोग्य विषयक कामकाज सांभाळून साधारणतः 15 मार्च 2020 पासून कोरोना साथउद्रेकात युद्धजन्य परिस्थितीचा सामना करत काहींनी तर स्वतःचा जीव देखील गमावलेला आहे. प्रशासन मात्र आरोग्य कर्मचार्यांना उपेक्षित ठेवून त्यांच्या हक्काच्या मागण्या (मासिक वेतन, पदोन्नती, कालबद्ध पदोन्नती, वैद्यकीय देयके, कायम पणाचे फायदे, हिंदी, मराठी भाषा सुट, आंतरजिल्हा बदली प्रस्ताव, भविष्य निर्वाह निधी प्रस्ताव, सेवा प्रवेशोत्तर परीक्षा सूट,) आदी सेवाविषयक बाबी प्रलंबित ठेवलेले आहे.