मकरसंक्रांतीला जळगावकरांना गोड बातमी

स्वातंत्र्य चौक ते नेरी नाका रस्त्याचे डांबरीकरण सुरू : महापौर सौ.महाजनांकडून पाहणी
मकरसंक्रांतीला जळगावकरांना गोड बातमी

जळगाव, jalgaon

गेल्या अनेक दिवसांपासून जळगावकर नागरिकांसह वाहनचालकांची रस्त्यांसंदर्भात होणारी गैरसोय आता टप्प्या-टप्प्याने दूर होणार आहे. त्याचाच भाग म्हणून आज गुरुवार, दि.13 जानेवारी 2022 रोजी दुपारी मकरसंक्रांतीच्या (Makar Sankranti) पूर्वसंध्येलाच महापालिकेतर्फे (Municipal Corporation) शहरातील मुख्य रस्त्यांच्या डांबरीकरणाचा (Asphalting of main roads) निर्णय घेत जळगाव महापौर जयश्री सुनिल महाजन (Mayor Jayashree Sunil Mahajan) यांनी जळगावकरांना गोड बातमी देत स्वातंत्र्य चौक ते नेरी नाकापर्यंतच्या रस्त्याच्या डांबरीकरणाला सुरूवात केली. त्यामुळे आता सुरूवातीला सर्वच मुख्य रस्त्यांचे डांबरीकरण (Asphalting of roads) होईल व त्यानंतर शहरातील इतर ठिकाणच्या रस्त्यांचीही टप्प्या-टप्प्याने कामे होतील. त्यामुळे जळगाव शहराचा आता खर्‍या अर्थाने चेहरामोहरा बदलणार आहे.

शहरातील रस्ते काही काळानंतर तयारच झालेले नव्हते. ठराविक प्रभागांतील रस्ते सोडले तर मुख्य रस्ते आणि इतर रस्त्यांची आजवर केवळ डागडुजीच झालेली होती. त्यातच भूमिगत गटार आणि अमृत योजनेच्या कामांमुळे रस्त्यांची पार वाट लागली होती. त्यामुळे जळगावकर नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत होता. त्यात अनेकवेळा डागडुजी केलेल्या रस्त्यांसंदर्भातही नागरिकांमध्ये चीड निर्माण झालेली होती. त्याच अनुषंगाने गेल्या महासभेत विकासकामांचे प्रस्ताव मंजूर झाले आणि आज नवीन रस्त्यांतर्गत स्वातंत्र्य चौक ते नेरी नाकापर्यंतच्या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम सुरू झाले.

या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम सुरू होताच जळगाव शहराच्या प्रथम नागरिक अर्थात महापौर व जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका जयश्री सुनिल महाजन यांनी प्रत्यक्ष रस्त्याचे डांबरीकरण सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी, शहर अभियंता व्ही.ओ. सोनवणी तसेच या रस्त्याच्या कामाचे ठेकेदार प्रतिनिधी अभिषेक पाटील यावेळी उपस्थित होते.

महापौर व जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका जयश्री सुनिल महाजन व महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी यावेळी कामाची पाहणी करताना ठेकेदार प्रतिनिधी अभिषेक पाटील यांच्याशी रस्त्याच्या डांबरीकरणाची प्रक्रिया नेमकी कशी होणार आहे यासह विविध विषयांवर चर्चा केली. तसेच कामातील गुणवत्तेचा दर्जा अतिशय दर्जेदार ठेवला जावा, अशी मौलिक सूचनाही केली.

या रस्त्याच्या डांबरीकरणानंतर शहरातील सर्वच मुख्य रस्त्यांच्या डांबरीकरणाची कामे प्राधान्याने सुरू होऊन ती लवकरात लवकर पूर्णत्वास येतील. त्यानंतर शहरातील इतर ठिकाणच्या रस्त्यांची कामेही सुरू होतील, असे महापौर जयश्री सुनिल महाजन व महापालिका आयुक्त .सतीश कुलकर्णी यांच्याकडून यावेळी सांगण्यात आले.

या रस्त्यांची कामे सर्वप्रथम होणार

शहरातील स्वातंत्र्य चौक ते नेरी नाका, टॉवर चौक ते ममुराबाद नाका, टॉवर चौक ते स्वातंत्र्य चौक, काव्यरत्नावली चौक ते स्वातंत्र्य चौक, बेंडाळे चौक, पांडे डेअरी चौक ते सिंधी कॉलनी चौक, दूध फेडरेशन ते निमखेडी रोड या रस्त्यांची कामे सर्वप्रथम होणार आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com