
जळगाव । Jalgaon
कामासाठी जळगावात स्थायिक झालेल्या तरुणाचे अपहरण झाल्याची घटना उघडकीस आली होती. तरुणाच्या पत्नीने पतीच्या दोन मित्रांवर अपहरण केल्याचे आरोप केल्यानंतर दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता, त्यांनी त्या तरुणाचा मृत्यू झाल्याचे सांगितले. दरम्यान, पोलिस त्या दिशेने तपास करीत असून मतयचा मृतदेह मिळाल्यानंतर या प्रकरणाचा खुलासा होणार आहे. याप्रकरणी दोघांविरुद्ध एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मध्यप्रदेशातील बर्हाणपुर येथील भूषण तळेले हा तरुण पत्नी व दोन मुलींसह जळगावातील रायपूर येथे कामासाठी स्थायिक झाला होता. दि. 17 रोजी भूषण हे भुसावळ येथे काम पाहुण येतो असे सांगून त्यांच्या (एमपी 12 एमझेट 0326) क्रमांकाच्या दुचाकीने निघाले. परंतु रात्री उशिरापर्यंत घरी न परतल्याने त्यांच्या पत्नीने कॉल केला परंतु तो त्यांचा मोबाईल बंदच होता. त्यानंतर तळेले यांच्या शालक दीपक सपकाळे याने परिसरात शोध घेतला असता, त्यांची दुचाकी रायपूर फाटा येथे पडलेली असल्याची माहिती रात्री 11 वाजता भूषण तळेले यांचा मित्र भिकन शामसिंग परदेशी यांनी दिली. याठिकाणी तळेले यांनी धाव घेवून पाहणी केली असता, त्या दुचाकीच्या डिक्कीत त्यांच्या पतीचा मोबाईल मिळून आला होता. दरम्यान, तळेले यांच्या कुटुबियांनी भूषण यांचा चोपडा, तालुर, भुसावळ येथे शोध घेतला मात्र तो मिळून न आल्याने याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात हरविल्याची नोंद करण्यात आली आहे.
भूषणच्या पत्नीला दिली होती आत्महत्येची धमकी
काही दिवसानंतर भिकन परदेशी हा भूषण याच्या पत्नीला भेटला. यावेळी त्याने तू येथेच रहा, तुझ्या पतीला आणून देण्याची जबाबदारी माझी आहे. मी कोठुनही त्याला शोधून आनेल. परंतु तू जर माझे ऐकले नाही व तुझ्या सासरी निघून गेली तर मी फाशी घेवून आत्महत्या करेल, आणि चिठ्ठीत तुमच्या त्रासामुळे आत्महत्या करीत आहे असे लिहून ठेवले अशी धमकी दिली होती.
तुझा पती आठ दिवसात येणार असल्याची दिली माहिती
काही दिवसानंतर एका अनोळखी क्रमांकावरुन भूषणची पत्नीला फोन आला. यावेळी त्याने तुझा पती आठ ते दहा दिवसात येणार असून तु येथेच रहा असे सांगतले. तसेच त्यानंतर पुन्हा एका क्रमांकावरुन त्यांना मिस कॉल आला होता. त्यावर त्यांनी कॉल केला असता, त्यावरील व्यक्तीने सांगितले की, तुमचे पती भूषण हे मला पुणे स्टेशनवर भेटले होते. त्यांनी माझा मोबाईल मागून पत्नीला फोन करु द्या असे सांगितले. परंतु तुम्ही फोन उचलला नसल्याने ते कुठेतरी निघून गेले असे सांगितले. दरम्यान त्या महिलेने ते माझेच पती होते हे कशावरुन म्हणता. त्यावेळी त्या इसमाने तुमच्या पतीच्या उजव्या हाताची बोटे नव्हती असे सांगितल्याने त्या महिलेने त्या व्यक्तीवर विश्वास ठेवला.
सोबत पिले होते दारु
ठेकेदार बन्सी पाटील याने भूषणाच्या पत्नीला सांगितले की, दि. 17 एप्रिल रोजी सकाळी 11.30 वाजता विठ्ठल प्रेमसिंग परदेशी याच्यासोबत तुझ्या पतीला मी मोटारसायकलवर पाहिले होते. त्यावरुन त्याला जाब विचारला असता, त्याने तुमचा पती व मी सोबत दारु पिलो होतो. त्यानंतर ते कुठे निघुन गेले मला माहित नाही. तसेच भिकन परदेशी याने उषा विजय बराटे हीला देखील आत्महत्या करुन तुम्हाला फसवेल अशी धमकी दिली होती.
संशयाची सुई घातपाच्या दिशेने
भिकन शामसिंग परदेशी, विठ्ठल प्रेमसिंग परदेशी यांच्याविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल होताच त्यांना पोलिसांनी अटक केली. त्यांनी भूषणसोबत घातपात केल्याचा संशय असून पोलिस त्या दिशेने तपास करीत आहे. दोघ संशयितांना आज न्यायालयात हजर केले असता, दोधांना दि. 11 रोजी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.