
जळगाव jalgaon
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात (Poet Bahinabai Choudhary North Maharashtra University) दिनांक १९ ते २८ डिसेंबर २०२२ या कालावधीत “राज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबीर (Disaster Management Training Camp) – आव्हान २०२२” आयोजित करण्यात आले आहे.राज्यपाल तथा कुलपती कार्यालयाकडून या शिबिराचे आयोजन केले जाते. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात प्रथमच हे आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबीर होत आहे. अशी माहिती कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी (Vice Chancellor Prof. V.L. Maheshwari) यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
या शिबिरात २३ विद्यापीठामधील ९६८ रासेयो स्वंयसेवक सहभागी होत असून यात ५६३ विद्यार्थी व ४०५ विद्यार्थिनी आहेत. या शिवाय ३९ पुरूष संघ व्यवस्थापक व २६ महिला व्यवस्थापक सहभागी होणार आहेत.
या शिबिराचे उदघाटन सोमवार १९ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी ११ वाजता महाराष्ट्राचे राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे (एनडीआरएफ) चे कमांडर एस. बी. सिंग हे प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित राहतील. यावेळी कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी, व प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे यांची प्रमुख उपस्थिती राहील.
बुधवार दिनांक २८ डिसेंबर २०२२ रोजी या प्रशिक्षण शिबिराचा समारोप होणार असून राज्यपालाचे प्रधान सचिव संतोषकुमार हे प्रमुख पाहूणे असतील तर तंत्रशिक्षण संचालक डॉ. अभय वाघ यांची प्रमुख उपस्थिती असेल याशिवाय रासेयोचे राज्य संपर्क अधिकारी डॉ. प्रशांतकुमार वानंजे , रासेयोचे प्रादेशिक संचालक डी.कार्तिकेयन यांची उपस्थिती असेल कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी अध्यक्षस्थानी असतील.
दहा दिवस होणा-या या शिबिराची तयारी पुर्ण झाली असून शिबिराच्या यशस्वीतेसाठी २२ समित्या स्थापन करण्यात आल्या असून त्यामध्ये २१० सदस्यांचा समावेश आहे. या शिबिरात पुर, सर्पदंश, अपघात, ह्रदयविकार, आग, भुकंप आदी आपत्तीच्यावेळी कोणत्या प्रकारची काळजी घेवून जिवीत व वित्तहानी टाळता येईल याबाबतचे शास्त्रशुध्द प्रशिक्षण दिले जाणार आहे
रोज सकाळी ६ ते ८ या वेळेत कवायत/योगा/मेडिटेशन त्यानंतर सकाळी ९:३० ते दुपारी १२:३० या वेळेत आपत्ती व्यवस्थापनाचे वर्ग १२:३० ते २ भोजन आणि दुपारी २ ते ५:३० या वेळेत पुन्हा आपत्ती व्यवस्थापनाचे वर्ग असा दिवसभराचा कार्यक्रम राहणार आहे. दिनांक २१ ते २५ डिसेंबर २०२२ या पाच दिवसात सायंकाळी ६ ते ८ या कालावधीत विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीसमोर सांस्कृतिक कार्यक्रम होणार असून आपत्ती व्यवस्थापन हि थिम ठेवण्यात आली आहे.
प्रत्येक जिल्हयासाठी १० मिनिटाचा कालावधी सांस्कृतिक कार्यक्रमासाठी देण्यात आला आहे. आपत्ती व्यवस्थापनाचे वर्ग प्रशिक्षण सहा सभागृहांमध्ये होणार असून रासायनिक तंत्रज्ञान संस्था, सिनेट सभागृह, सामाजिकशास्त्रे प्रशाळेचे दोन सभागृह, गणितशास्त्र प्रशाळेचे दोन सभागृह अशा एकूण सहा सभागृहात ते वर्ग होतील. १८० ते २०० विद्यार्थ्यांचा एक गट असे पाच गट करण्यात आले असून या गटांना खान्देशातील तापी, पांझरा, वाघुर, बोरी आणि गिरणा या नदयांची नावे देण्यात आली आहेत. आपत्ती व्यवस्थापनाचे हे तंत्रशुध्द प्रशिक्षण राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे ५० तज्ज्ञ व्यक्ती देणार आहेत. वर्ग खोलीतील शिक्षणाशिवाय मेहरूण तलाव, विद्यापीठ जलतरण तलाव आणि विद्यापीठातील प्रशासकीय इमारत या ठिकाणी देखील रंगीत तालीम घेण्यात येईल.
आपत्ती व्यवस्थापनाचे विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणारे भारतातील महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे. २००७ पासून या प्रकारचे राज्यस्तरीय आव्हान शिबीर घेतले जात आहेत. दिनांक २६ डिसेंबर २०२२ रोजी विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशव्दारापासून प्रशासकीय इमारतीपर्यंत शोभायात्रा काढण्यात येणार आहे. यावेळेस प्रथमच रासेयोच्या ध्वजाचे रोहन होणार आहे.
या शिबिरात मुंबई विद्यापीठ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड, संत गाडगेबाबा विद्यापीठ, अमरावती, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर, गेांडवाना विद्यापीठ, गडचिरोली, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ, सोलापूर, एसएनडीटी महिला विद्यापीठ, मुंबई, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी, डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठ, अकोला, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ, लोणेरे, कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ, रामटेक, महात्मा गांधी हिंदी विद्यापीठ, वर्धा, होमी भाभा राज्य विद्यापीठ, मुंबई आणि हैदराबाद सिंध राष्ट्रीय महाविद्यालयीन मंडळाचे विद्यापीठ, मुंबई अशा एकूण २३ विद्यापीठांचा समावेश असेल.
या पत्रकार परिषदेला कुलसचिव डॉ. विनोद पाटील, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक प्रा. दीपक दलाल, रासेयो संचालक डॉ. सचिन नांद्रे, आव्हानचे समन्वयक प्रा. किशोर पवार हे उपस्थित होते.