महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित 61 व्या महाराष्ट्र हौशी मराठी नाट्य महोत्सवाअंतर्गत जळगाव केंद्रावरील प्राथमिक फेरी सध्या उत्तरार्धाकडे वाटचाल करीत असून, दि. 4 डिसेंबरच्या सकाळी 11 वाजता स्थगित झालेले अजुनही चांदरात आहे हे दोन अंकी मराठी नाटक सुबोध बहुउद्देशिय संस्थेच सादर झाले
. मुख्य भूमिकेतील कलावंतांच्या आजारपणामुळे प्रस्तुत नाट्य प्रयोग स्थगित करण्यात आला होता. परंतू, संस्थेच्या जिगरबाज रंकर्मींनी मुख्य भूमिकेतल कलावंत बदलून हा नाट्यप्रयोग आत्मविश्वासपूर्वक आणि मुख्य म्हणजे तालमीसाठी कमी कालावधी मिळाला असतांनाही इरफान मुजावर लिखित आणि हरहुन्नरी दिग्दर्शक भावेश सोनार दिग्दर्शित हा नाट्य प्रयोग नाट्य रसिकांच्या चर्चेचा आणि कौतुकाचा विषय ठरला. समरसुन रंगकर्मी, तंत्रज्ञांचे मनापासून कौतुक. करिअरच्या मागे घावता धावता माणूस आपल्या नात्यांकडे हवे तसे लक्ष देत नाही. परंतू, त्यातही काही नाती अशी असतात की, कोणत्याही कठीण प्रसंगी आपली वीण सुटू देत नाही.
उलटपक्षी वीण घट्ट होवून एकमेकांच्या विश्वासावर आयुष्य जगण्याचा प्रयत्न काही यती माणस करीत असतात. जीवनातील आपली काही लहान-मोठी स्वप्ने हरवून जगायला शिकतात आणि जगायला लागतात. अशाच स्वप्नांची ओंजळ भरुन आयुष्याकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहणार्या दोन जीवांची प्रेमळ कहाणी म्हणजे अजुनही चांदरात आहे.
कलारंगची निर्मिती असलेल्या या नाटकात लेखकाने अत्यंत नाजूक विषय घेवून पती मिहीर (भूषण निकम), पत्नी मधुरा (प्रतिक्षा झांबरे) यांच्या नात्यातील संबंधांचा अलगद उलगडा केलेला असून सुख दुःखाच्या लंपडावात दोघांनी आपला तोल सांभाळावा हा गोड संदेश लेखकाने दिला आहे. अडचणी असंख्य असतात परंतू त्यांच्यावर मात करणे अशक्य नसते. अशी संहितेची मांडणी असून दिग्दर्शक या नात्याने भावेश सोनार यांनी अडचणींवर मात करीत प्रयोग सादर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे.
अभिनय कौशल्याच्या बाबतीत या नाटकाची संहिता दोन पात्रांवरच आधारीत असल्यामुळे भूषण निकम (मिहीर), आणि प्रतीक्षा झांबरे (मधुरा) या दोन हौशी रंगकर्मींवरील जबाबदारी निश्चितच जास्त होती असे असतांनाही परिश्रमपूर्वक ही जबाबदारी त्यांनी पार पाडली म्हणून नाट्यप्रयोग सुविहीतपणे पार पडू शकला.
तांत्रिक बाबतीत रुपाली गुंगे (प्रकाश योजना), सुमित निकम (नेपत्थ), लोकेश सोनार (पार्श्वसंगित), भाग्यश्री अमृतकर (रंगभूषा), गायत्री सोनार, लोकेश भांडाकर, जय सोनार, श्वेता रील, उर्वशी शिंदे यांनी सहाय्य केले. तर दीपक सुरळकर, प्रा.राजगुंगे, निलेश रायपूरकर, दर्शना रायपूरकर, चिंतामण पाटील, मयुर परदेशी, डॉ.गुलाब तडवी, यश अहिरराव, भूषण भोई, योगेश शुक्ल यांचे सहकार्य लाभले.
थोडक्यात काही अपरिहार्य कारणांमुळे स्थगित झालेले नाट्य प्रयोग चक्क रद्द होत असतांना सुबोध बहुउद्देशिय संस्थेच्या जिगरबाज रंगकर्मीनी अजुनही चांदरात आहे. सादर करुन प्रेक्षकांची मने जिंकली.