
61 व्या हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या जळगाव केंद्रावरील प्राथमिक फेरी अंतर्गत रात्री छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात रात्री समर्थ बहुउद्देशिय संस्थेने अर्यमा उवाच हे दोन अंकी नाटक सादर केले. स्पर्धेच्या दुसर्या दिवशी सादर झालेल्या या नाट्यप्रयोगाने राज्य नाट्य स्पर्धेत पौराणिक कथेवर आधारीत नाटक सादर करण्याची परंपरा यंदाही जपली.
रामायणातील पौराणिक कथेतील भिडणारी प्रेमकहाणी सोमनाथ नाईक या प्रयोगशील लेखकाने आपल्या नाट्यसंहितेत बंदीस्त केली असून सर्जनशिल, सृजनशिल नाट्यकर्मी, विशाल जाधव यांनी अनुभवाच्या जोरावर आपले दिग्दर्शकीय कौशल्य दाखवत कलावंत आणि तंत्रज्ञांकडून चोख कामगिरी करवून घेतल्याचे दिसून आले.
खरंतर सोमनाथ नाईक यांनी संवेदनशिलपणे रयामिनी म्हणजेच रामायणातील शुर्पनखेचे एकवचनी एक पत्नी मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामावरील निस्सीम परंतू एकतर्फी प्रेम अव्हेरल्यानंतर तिच्या मनाची होणारी घुसमट तिची मानसिक आंदोलने आपल्या नाट्यसंहितेत बंदीस्त करीत तिची ती एकतर्फी प्रेमकहाणी स्त्री सुलभ असुया तिचाच मित्र असलेल्या ऋषीकुमार अर्थात अर्यमाच्या तोंडून वदवली आहे. थोडक्यात रामायणातील तिची शुर्पनखेची जीवनगाथा प्रेमकहाणी तिचे भावविश्व व्यस्था या दोन अंकी नाटकातून मांडण्याचा प्रयत्न संवेदनशीलपणे केलेला दिसून येतो.
आता सादरीकरणाचा एकूण परिणाम लक्षात घेता, अनुभवी दिग्दर्शक विशाल जाधव यांनी संहितेची जातकुळ ओळखून तसेच पौराणिक संदर्भ लक्षात घेवून कुठेही सादरीकरणाचा तोल न जावू देता तितकाच संवेदनशिलपणे आणि सर्जनशिलतेने हा नाजूक विषय हाताळला असून, प्रयोग प्रवाहीआणि प्रभावी करण्यात ते यशस्वी झाले आहेत. अर्थात अपेक्षित उंची गाठण्यात समस्त रंगकर्मी आणि तंत्रज्ञ यांचे सहाय्यही निश्चितच वाखाण्याजोगे आहे.
भूमिका आणि कलावंतांचा विचार करता, मध्यवर्ती भूमिकेतील श्यामिनी म्हणजे रामायणातील शुर्पनखा मोक्षदा लोखंडे या गुणी कलावतीने आपल्या समर्थ अभिनयाने अक्षरशः जगली तिचा तिलकीच समर्थ साथ अर्यमाच्या भूमिकेत शुभम सपकाळे यांनी दिली. सर्वश्री संकेत राऊत (राघव), भावेश पाटील (सौमित्र), तृप्ती बाक्रे (जानकी), रवीकुमार परदेशी (संताली), योगेश लांबोळे (कारभारी) यांच्याही भूमिका लक्ष्यवेधी परंतू खरी दाद मिळवली ती पुर्वा जाधव या चिमुरडीने तिने धीटपणे साकारलेली बारकूची भूमिका टाळ्या वसूल करुन गेली. सहभूमिकांमध्ये मयूर भंगाळे (खरराय), सागर सदावर्ते (सेनानायक), पायस सावळे (हेरा), श्वेतांबरी पाटील (तारा), समर्थ जाधव (कोका), भूषण तेलंग (आद्यकवी), महेश कोळी, सात्विक जोशी, कमलेश भोळे, रवींद्र चौधरी, श्रीकृष्ण बारी, अक्षय पाटील, श्यामकांत चौधरी यांच्या भूमिका स्कोपच्या मानाने व्यवस्थित दुसर्या अंकाच्या सादरीकरणाच्या अखरेच्या टप्प्यात विद्युत पुरवठा खंडीत झाल्यामुळे प्रयोग काही वेळ थांबवावा लागला परंतू असे असतांनाही रंगमंचावरील कलावंतांनी अजिबात विचलीत न होता सादरीकरणाचा टेम्पो बिघडू दिला नाही. त्याबद्दल विशेष कौतुक !
तंत्रज्ञाच्या बाबतीत प्रकाश योजनेवर तेजस कोठावदे यांची कामगिरी निश्चितच सरस, विशाल सदावर्ते (पार्श्वसंगित), रवीकुमार परदेशी (नेपथ्य), योगेश लांबोळे (रंग व वेषभूषा), याही तंत्रज्ञानी सादरीकरणाची लय व गती कायम ठेवली.
थोडक्यात पहिल्या अंकात लय काहीशी संथ होती परंतू पौराणिक कथेवर आधारीत नाटक सादर करणे तसे आव्हानकारकच असल्यामुळे संवाद फेकीतील वैविध्य जाणीवपूर्वक ठेवल्यामुळे देव आणि दानव यांच्यातील अनादी अनंत काळापासून सुरु असलेला संघर्ष रंगमंचावर अधिक तीव्र झाला आणि निर्मितीप्रमुख अमोल जाधवांनी निर्मित असलेल अर्यमा उवाच हे नाटक निश्चितचं प्रभावी व प्रवाही झाले. हे निश्चितच!
आजचे नाटक मडवॉक मुळजी जेठा महाविद्यालय, जळगाव