वरणगावात वाळूची चोरटी वाहतूक

वरणगावात वाळूची चोरटी वाहतूक

वरणगाव Varangaon । प्रतिनिधी

गेल्या अनेक दिवसापासून वरणगावसह परिसरात अवैध वाळूची (sand) चोरटी (Smuggling) वाहतूक (Transportation) सुरू आहे. मात्र याकडे महसुल विभाग प्रशासनाचे (Revenue Department Administration) दुर्लक्ष (negligence) होत असून शासनाचा महसूल बुडत आहे शहरात महसूल विभागाच्या दोन महिला कर्मचारी असल्याने अवैध वाळू वाहतूक जोमाने सुरू आहेत. तालुक्याच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी लक्ष देण्याची गरज आहे.

शहरासह परिसरातील विविध भागात सरकारी व खाजगी बांधकामे मोठयाप्रमाणात सुरू आहेत. त्या अनुषंगाने गेल्या अनेक दिवसांपासुन शहरात रात्रीच्या वेळेस मोठ्या प्रमाणात ट्रक, डंम्पर, ट्रॅक्टरच्या माध्यमातून अवैध वाळू वाहतूक होत आहे. सदर वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रमाणात वाळूचा भार वाहून आणत असल्याने शहरातील रस्ते देखील खराब झाले आहेत.

परीणामी शासनाचा कोट्टयावधी रूपयांचा महसुल देखील बुडवला जात आहे. वाळूने भरलेल्या भरधाव वाहनांमुळे लहान-मोठया वाहनांना देखील अपघातांची भीती आहे. त्याचबरोबर सर्वसामान्य नागरीकांना रात्रीचा प्रवास करतांना कठीण झाले आहे. अवैध वाळू वाहतूकदार जळगावकडून गिरणा, वाघुर तर वरणगाव परिसरातील तापी, पूर्णा नदी पात्रातून उत्खनन करून बिनधास्तपणे वाळूची वाहतूक करीत आहे.

शहरात मंडळ अधिकारी व तलाठी या दोन्ही पदांवर महिला कर्मचारी असल्याने रात्रीची होणारी अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई करण्यास त्यांना अडचणी येत असल्याने वाळू माफियांना चागंलेच फावले आहे. काही दिवसांपूर्वी कोरोना कार्यकाळात वरणगाव पोलिस स्टेशनचे तत्कालीन एपीआय संदीप कुमार बोरसे यांनी पोलिसांना अवैध गौण खनिज वाहतूक संबधी विशेष अधिकारांतर्गत कारवाईचा बडगा उगारून शहरात होणारी अवैध गौण खनिजाची चोरटी वाहतूकीवर नियंत्रण मिळवले होते.

मात्र त्यानंतर काही दिवसांतच वाळू माफियांचे पोलिसांतीलच काही अधिकार्‍यांसह पोलिस कर्मचार्‍यांसोबत मधुर संबध निर्माण झाले होते. त्यातून आर्थिक देवाण, घेवाण देखील सुरु केली होती. तेव्हा पोलिस उपनिरीक्षकासोबत एका हवालदारावर लाचलुचपत प्रतिबंध विभागाने कारवाई करून दोघांना जेरबंद देखील केले होते.

अवैध वाळू वाहतूकदारांची रात्रीची नेहमी वर्दळ महामार्गावरून असते आणि वरणगाव पोलिस स्टेशन सुध्दा शहरात महामार्गच्या कडेला असुन पोलिसांची रात्रभर पोलिस वाहनामधुन गस्त देखील असते परंतु सद्या पोलिसांनी वाळू तस्करांवर एक हि कारवाई केल्याचे दिसुन आलेले नाही. यासंबधी पोलिस कारवाई का? करीत नाही असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.

नद्यांमध्ये वाळूचे ठेक्यांचा शासकीय नियमांनुसार एकही लिलाव झालेला नाही. मात्र झालाच तर प्रचंड महाग असतो ठेकेदारांना ठेके परवडत नाहीत त्यामुळे ठेकेदार तेथे पैसा वाया घालवण्यापेक्षा त्याच पैशांतून महसुल आणि पोलिसांना मॅनेज करण्यात गुंतले असल्याचे बोलले जात आहे.

मात्र यातून पर्यावरणाचा र्‍हास तर होतोच शासनाचे करोडो रूपयांचा महसुल बुडून नुकसान देखील होत आहे. या सर्व प्रकरणाची दखल घेऊन जिल्हा अधिकार्‍यांनी गांभिर्याने लक्ष घालुन वरणगावात होणारी रात्रीची अवैध वाळू तस्करीला आळा घालून ताबडतोब थांबवावी अशी गावकर्‍यांकडून मागणी होत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com