श्री गजानन महाराज मंदिर भक्तांसाठी खुले ; प्रशासनातर्फे उत्कृष्ट व्यवस्था

श्री गजानन महाराज मंदिर भक्तांसाठी खुले ; प्रशासनातर्फे उत्कृष्ट व्यवस्था

शेगाव - दिपक सुरोसे Shegaon

राज्य शासनाने (State government) मंदिरे खुली करण्याचे आदेश दिल्यानंतर गुरुवार 7ऑक्टोंबर रोजी येथील जगप्रसिद्ध (Shri Gajanan Maharaj Temple) श्री गजानन महाराज मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले. आज पहिल्या दिवशी सुमारे 9 हजार भाविकांनी श्रींच्या दर्शनाचा लाभ घेतला. विशेष म्हणजे मंदिर संस्थानने दर्शनासाठी केलेल्या उत्तम व्यवस्थेमुळे भाविक भारावून गेले होते.

पहाटे 5 पासून मंदिर दर्शनासाठी खुले केले व रात्री 8 पर्यंत दर्शन सुरू होते. सात महिन्यांच्या कालावधीनंतर येथील श्री गजाननाच्या दर्शनासाठी प्रथमच मंदिर खुले करण्यात आले. त्यामुळे भाविकांचा आनंद गगनात मावेनासा झाल्याचे दिसून आले. श्री संत गजानन महाराज मंदिरात श्रींचे दर्शन घेण्यासाठी 7 ऑक्टोंबर

रोजी अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने व सर्व नियमांचे काटेकोर पालन करीत रांगा लागल्या होत्या.  भाविकांनी भावपूर्ण वातावरणात श्रींच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतले. विदर्भातील प्रतिपंढरी म्हणून वि‘यात व कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या या मंदिरात आज भाविकांनी हजेरी लावली व संस्थानद्वारे जारी केलेल्या संकेतस्थळावर जाऊन भाविकांनी तत्काळ दर्शन पास बनवून घेतल्या.

गुरुवार 7 ऑक्टोंबर रोजी पहाटे पाचपासून दर तासाला 600 याप्रमाणे रात्री आठ वाजेपर्यंत एकूण नऊहजार भाविकांनी श्रींचे दर्शन घेतले. विशेष म्हणजे मंदिर प्रशासनाने सांगितल्याप्रमाणे भाविकांनीही भौतिक दूरतेचे पालन केले.

 संस्थानतर्फे मंदिरात सर्वत्र निर्जंतुकीकरण करण्यात आले. भाविकांनी श्रींच्या समाधीस्थळाचे व राम मंदिराचे दर्शन घेतले. दर्शनासाठी येणार्‍या भाविकांना सुलभ रीत्या श्रींचे दर्शन घेता यावे, याकरिता अतिशय उत्कृष्ट अशी व्यवस्था संस्थानने केली होती. प्रत्येक भाविकामध्ये सहा फुटांचे अंतर ठेवण्यात आले होते. एकाच ठिकाणी भाविकांची गर्दी होणार नाही, याबाबत दक्षता बाळगण्यात आली. निर्जंतुकीकरण, स्वच्छता, मुखाच्छादनआणि दोन भक्तांमध्ये सुरक्षित अंतर यासह शांतता, भक्तिभाव, आदरातिथ्य करून भक्तांची श्रींच्या दर्शनाची कित्येक महिन्यांची मनोकामना पूर्ण झाली.

 ई-पास घेऊनच भक्त दिलेल्या वेळेवर दर्शन

आज पुणे, मुंबईतील भक्त पहिल्याच दिवशी ई-पास घेऊन दर्शनासाठी आले होते. सर्व भक्तांच्या चेहर्‍यावर एक आत्मिक समाधान होते. जुन्या दत्त मंदिरासमोरून भाविकांना दर्शनासाठी प्रवेश देण्यात येत आहे. आजपासून तीन दिवसांच्या ई-पास वितरित झाल्या आहेत. भाविकांनी गर्दी न करता ई-पास घेऊन दर्शनाला यावे. सोबत आधारकार्ड असणे आवश्यक असल्याचे संस्थानतर्फे कळविण्यात आले आहे. कोरोनामुळे श्रींच्या दर्शनासाठी यावेळी प्रथमच हार, फुले, प्रसाद घेऊन जाण्यास मनाई करण्यात आली होती. बाहेर गावावरून आलेल्या व ज्या भाविकांनी ई-दर्शन पास काढलेली आहे, अशांना श्री गजानन महाराज संस्थानद्वारा संचालित बाळापूर मार्गावरील विसावा, विहार व भक्तनिवास संकुल आदी ठिकाणी थांबण्यासाठी खोल्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहे.

Related Stories

No stories found.