शिवसेनेची मुलुख मैदान तोफ गुलाबराव पाटीलही गुवाहाटीत दाखल

जिल्ह्यातील सेनेचे चारही आमदार आता मंत्री एकनाथ शिंदेंच्या गळाला
शिवसेनेची मुलुख मैदान तोफ गुलाबराव पाटीलही गुवाहाटीत दाखल
गुलाबराव पाटील

जळगाव । Jalgaon । प्रतिनिधी

जिल्ह्यात कट्टर शिवसैनिक, शिवसेनेचे ढाण्या वाघ आणि मुलुख मैदान तोफ असलेले पालकमंत्री गुलाबराव पाटील (Guardian Minister Gulabrao Patil) हे मंगळवारी मुंबई होते. मात्र रात्रीतुन अचानक ते ‘नॉट रिचेबल’ होऊन सुरतमार्गे गुवाहाटीत रात्री 9 वाजेच्या सुमारास दाखल झाले. दरम्यान, शिंदेंनी मांडलेल्या भूमिकेविषयी विचार व्हावा असे पक्षप्रमुखांना बैठकीत सांगण्यात आले. मात्र तसे न झाल्याने आपण शिंदेंसोबत असल्याची माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील (Guardian Minister Gulabrao Patil) यांनी दिली.

शिवसेना नेते तथा नगरविकास मंत्री एकनाथराव शिंदे (Urban Development Minister Eknathrao Shinde) यांनी बंड केल्यानंतर त्यांच्यासमवेत कोणते आमदार गेले आहेत? याविषयी जिल्हावासियांना कमालिची उत्सुकता लागली होती. मंगळवारी आ. चिमणराव पाटील, आ. किशोर पाटील आणि आ. लता सोनवणे हे शिंदेंसोबत कॅमेरात कैद झाले. जिल्ह्यात शिवसेनेचे चार आमदार आहेत. त्यापैकी तीन मंगळवारीच शिंदेंसोबत गेले.

बुधवारी मात्र शिवसेनेचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील (Guardian Minister Gulabrao Patil) हे देखिल ‘नॉट रिचेबल’ झाले. तसेच त्यांचे स्वीय्य सहायकही संपर्क क्षेत्राच्या बाहेर गेले. त्यामुळे त्यांच्यावरही शिवसेनेचा संशय बळावला. अखेर पालकमंत्री गुलाबराव पाटील (Guardian Minister Gulabrao Patil) हे देखिल शिंदेंच्या तंबूत दाखल होण्यासाठी रात्री सुरतमार्गे गुवाहाटीकडे रवाना झाले. त्यामुळे जळगाव जिल्ह्यातही शिवसेनेला खिंडार पडले असून चारही आमदार हे शिंदेंसोबत असल्याचे दिसून आले आहे. दरम्यान एकनाथराव शिंदे हे काय भूमिका घेतात? त्यावर या आमदारांचेही भवितव्य अवलंबून आहे.

मुक्ताईनगरचे चंद्रकांत पाटील गुवाहाटीत

शिवसेनेचे सहयोगी सदस्य तथा मुक्ताईनगरचे अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) हे देखील रात्री 9 वाजेच्या सुमारास गुवाहाटीत येथील रेडीसन ब्ल्यू या हॉटेलात दाखल झाले.

शिवसैनिक पेचात

जिल्ह्यातील शिवसेनेचे चारही आमदार फुटून शिंदेंसोबत गेल्याने शिवसैनिक आणि त्यांच्या समर्थकांना मोठा पेच पडला आहे. काही पदाधिकार्‍यांशी संपर्क साधला असता ‘आम्हाला काहीच कळत नाही, काय बोलावे’ असे सांगत हे शिवसैनिक निशब्द झाले असल्याचे दिसून आले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com