
भुसावळ Bhusaval । प्रतिनिधी
अमरावती जिल्ह्यातील वझर येथील प्रसिध्द शंकरबाबा पापळकर (Shankar Baba Papalkar) यांच्या कन्येसाठी बुलडाण्यातील एका युवकाने मागणी (Demand by the youth) घातली आहे. शंकरबाबाने मुलाची पडताळणी करुन लग्नाला देखील होकार दिला आहे. 5 जुलै रोजी सायंकाळी 6 वाजता यांचा विवाह सोहळा (Wedding ceremony) वधू मंडपी सहकार विद्या मंदिराच्या सांस्कृतिक भवनात पार पाडला जाणार आहे. बाबाच्या या मानसकन्येचे कन्यादान वडीलाची भूमिका स्वीकाणारे जिल्हाधिकारी (Collector) एस.राममूर्ती हे दांपत्य करणार आहे तर मुलीचे मामा पोलिस अधिक्षक (Superintendent of Police) अरविंद चावरिया हे देखील उपस्थित राहणार आहे.
शंकरबाबा पापळकर यांची 25वी मानसकन्या दिपाली ही मुकबधीर आहे. बुलडाणा येथील आशिष बिहारीलाल जांगिड यांनी दिपालीला पसंत केले. आशिष हे मागील अनेक वर्षापासून धन्वंतरी हॉस्पीटल परिसरात असलेल्या वरद अपार्टमेंट मध्ये राहतात. आशिष देखील मुक बधीर असल्याने त्यांनी शंकरबाबा यांच्या आश्रमाला भेट दिली.
आपला जोडीदार आपल्या सारखाच असावा, आपले सुख-दुःख समजून घेणारा असावा व तिचे देखील दुःख समजावे या हेतूने आशिष जांगिड यांनी हा निर्णय घेतला. खरे तर हा विवाह आश्रमातच पार पाडला जाणार होता. मात्र शंकरबाबा पापळकर व बुलडाणा अर्बन परिवाराचे संस्थापक अध्यक्ष राध्येश्याम चांडक यांचा घरोबा अनेक वर्षापासून आहे. आपल्या मुलीला बुलडाण्यातून मागणी आल्याने शंकरबाबांनी ही गोष्ट भाईजींच्या कानावर टाकली, आणि भाईजींनी एकाच क्षणात शंकरबाबा दिपाली ही जसी तुमची मुलगी आहे, तसीच माझी मुलगी आहे, तिचा विवाह , विवाह नाही तर राष्ट्रीय महोत्सवा सारखाच वधू मंडपीच पार पाडणार असल्याचे सांगितले व जबाबदारी घेतली.
अनेक वर्षापासून स्नेहाचे संबंध असल्याने शंकरबाबांनी देखील त्यांना विरोध केला नाही. या महोत्सवाच्या तयारीला अख्ये बुलडाणा अर्बन परिवार लागले आहे. अप्रत्यक्षरित्या दिपाली ही भाईजी यांची देखील मानसकन्या असल्याने हा सोहळा दिमाखदार पध्दतीनेच होणार असल्याने जिल्ह्यातील सर्वच नागरिकांचे लक्ष्य या विवाह महोत्सवाकडे लागले आहे.
जिल्हाधिकारी, पोलिस अधिक्षक यांची उपस्थित -
या विवाह सोहळ्यात जिल्हाधिकारी एस.राममूर्ती दांपत्यांनी वडील म्हणून दिपालीचा कन्यादान करण्याचा निर्णय घेतला आहे. तर मुलीचे मामा म्हणून जिल्हा पोलिस अधिक्षक अरविंद चावरिया उपस्थित राहणार आहे. दुसरीकडे मुलीचा परिवार हा अथांग समुद्रासारखा बुलडाणा अर्बन सारखा जिल्ह्याभरात पसरला आहे. त्यामुळे या सोहळ्यात वेगळेच हुरुप आले आहे.
अनाथांचा संसार उभा करणारा अवलिया- शंकरबाबा पापळकर
मुलगी म्हणजे लग्नाचा प्रचंड खर्च असा समज आज देखील समाजात आहे. त्यामुळे अनेकजण घरात जन्मलेल्या मुलीला कचर्याच्या पेटीत टाकून पळ काढतात. मुलमुली अपंग जन्माला आली म्हणून त्यांना टाकून देणारे देखील खूप आहेत. अशा सर्वांचा वाली म्हणजे शंकरबाबा पापळकर.
पांढरे शुभ्र कपडे, दाढी वाढलेली अतिशय साधी राहणीमान असलेले एक महान व्यक्तमत्व असे शंकरबाबा. अमरावती जिल्ह्यातील वझर येथील स्व.अंबादास पंत वैद्य मतिमंद बेवारस बालगृह मागील अनेक वर्षापासून शंकर बाबा पापळकर चालवतात. त्यांच्या आश्रमात, अनाथ, मतिमंद, कर्णबधीर, अशी अनेक मुलेमुली आहेत.
त्यांनी आजपर्यत 130 मुलांचे आजीवन पुनर्वसन केले आहे. त्यांनी आतापर्यत एकूण 24 मुलींच्या लग्न लावून दिले. लवकरच त्यांची 25वी मानसकन्या दिपालीचा विवाह होणार असल्याने बाबा आनंदात आहेत.
या विवाह सोहळ्यात प्रामुख्याने बुलडाणा अर्बन परिवाराचे डॉ. सुकेश झंवर, सौ.कोमल झंवर यांच्यासह अमरावती येथील हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे अध्यक्ष पद्मश्री पुरस्कार प्राप्त प्रभाकरराव वैद्य यांची विवाह सोहळ्यास आवर्जून उपस्थित राहणार आहे
या लग्नाची वैशिष्ट्ये
मुलींचे लग्न दाक्षिणात्य पध्दतीने करणार असे जिल्हाधिकारी एस.रामामुर्ती यांनी सांगितले. संध्याकाळी राजस्थानी पध्दतीने लग्न सोहळा पार पडेल तसेच वैदिक पध्दतीने मंगलाष्टके होईल. राजस्थान मधून 100 जण येणार आहे. यावेळी नवरीची हळद जिल्हाधिकारी यांच्या पत्नी सौ.राजेश्वरी एस.राममुर्ती या करणार आहे. कन्यादान जिल्हाधिकारी एस.राममुर्ती व सौ.राजेश्वरी एस.राममुर्ती तर पोलीस अधीक्षक अरविंद चावरीया हे मामाचे कर्तव्य पार पाडणार आहे.