भीती कोरोनाची ; विद्यार्थ्यांचे शालेय भवितव्य टांगणीला

अनेक विद्यार्थी ऑनलाईन अभ्यासापासून वंचीत, पालकांमध्ये चिंता
भीती कोरोनाची ; विद्यार्थ्यांचे शालेय भवितव्य टांगणीला
ऑनलाईन शिक्षण

शिंदी, ता.भुसावळ । वार्ताहर Bhusawal

गेल्या दीड वर्षापासून कोरोना विषाणू (Corona virus) जन्य परिस्थितीमुळे प्राथमिक व माध्यमिक शाळा (Primary and secondary schools) ग्रामीण व शहरी दोन्ही भागात बंद असून ग्रामीण भागात मात्र ज्या ठिकाणी मागील एक महिन्याच्या कालावधीत (Corona patient) कोरोना रुग्ण आढळलेला नाही अशा ठिकाणी आठवी ते दहावी चे वर्ग सुरू आहेत. मात्र त्या ठिकाणीसुद्धा आजूबाजूच्या गावांवरून येणार्‍या विद्यार्थ्यांना येण्या-जाण्यासाठी सोयी-सुविधा नसल्याने असे विद्यार्थी घरीच दिसून येतात. त्यामुळे ग्रामीण (Student) विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्याबाबत पालक वर्गात चिंता व्यक्त होत आहे.

ग्रामीण भागातील बालवाडी किंवा केजी टू या वर्गातील ज्या विद्यार्थ्यांनी वार्षिक परीक्षा दिली नाही असे विद्यार्थी यावर्षी इयत्ता दुसरी किंवा सेमी दुसरी या वर्गात पोहोचून गेलेले आहेत. मात्र त्यांच्यासाठी शाळेचे दरवाजे कोरोना जन्य परिस्थितीमुळे बंद असल्याने अशा विद्यार्थ्यांना आपण नेमके कोणत्या इयत्तेत आहोत हे सुद्धा ग्रामीण भागात समजणे आज कठीण होऊन बसले आहे.

ऑनलाइनद्वारे (Study online) अभ्यास सुरू असला तरी पालक वर्ग घराबाहेर जाताना मोबाईल सोबत नेत असल्याने कुटुंबातील विद्यार्थ्यांना तो वेळेवर उपलब्ध होऊ शकत नाही बर्‍याचदा नेटवर्क नसणे, बॅलन्स अभावी मोबाईल बंद राहणे किंवा अँड्रॉइड मोबाइल नसणे ही कारणे असली तरी ऑनलाईन शिक्षण हे गोरगरीब सामान्य कुटुंबांच्या आवाक्याबाहेरची गोष्ट आहे.

प्रत्यक्ष शाळा सुरू असताना विद्यार्थी करीत असलेला अभ्यास व आता शाळा बंद असताना ऑनलाइनद्वारे अभ्यास करणारा विद्यार्थी यामध्ये मोठी तफावत निर्माण होत असल्याच्या प्रतिक्रिया पालकांनी व्यक्त केल्या. मात्र कोरोनामुळे सर्वच जण हतबल झाल्याचेही बोलले गेले. ऑनलाइन द्वारे विद्यार्थ्यांच्या सर्व संकल्पना स्पष्ट होत नसल्याने केवळ दुधाची तहान ताकावर भागवण्यासाठी हा प्रकार असल्याच्या प्रतिक्रिया पालक वर्गातून व्यक्त करण्यात आल्या.

सुमारे एक ते दीड महिन्यापासून ग्रामीण भागातील बहुतेक ठिकाणी इयत्ता आठवी ते दहावीच्या शाळा नियमित सुरू आहेत. येणार्‍या विद्यार्थ्यांचे कोणत्याही प्रकारे लसीकरण करण्यात आलेले नाही. गावातील तसेच आजूबाजूच्या गावातील ज्या विद्यार्थ्यांना वैयक्तिक सोयी-सुविधा उपलब्ध आहेत असे विद्यार्थी पालकाच्या हमीपत्रावर शाळेत येत आहेत.

मग अशा विद्यार्थ्यांना लसीकरणाची गरज नाही काय असा प्रश्न निर्माण होतो. ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांना बालवाडी किंवा केजी वन, केजी टू हा प्रकार नसल्याने अंगणवाडीतील विद्यार्थी इयत्ता पहिली मध्ये दरवर्षी येत असतो. कोरोनाविषाणू परिस्थितीमुळे अंगणवाडीतील विद्यार्थी सरळ इयत्ता दुसरी किंवा सेमी दुसरीच्या वर्गात पोहोचून गेलेले आहेत. अक्षर ओळख, अंक ओळख केवळ ऑनलाईनच्या भरवशावर असून अशा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य काय? प्रत्येक भाषा महत्त्वाची असून ती प्रत्यक्ष शिकल्याशिवाय येत नाही गणित, इंग्रजी, विज्ञान हे काठिण्यपातळीचे विषय असून मराठी सुद्धा ऑनलाइनच्या भरवशावर शिकणे पाहिजे तेवढे सोपे नाही. त्यामुळे पुढे काय असा प्रश्न विद्यार्थ्यांपेक्षा पालकांसमोर उभा आहे. परंतु कोरोनामुळे प्रत्येक जण चिंताग्रस्त असून नाईलाजाने येणार्‍या परिस्थितीला पालकवर्ग तोंड देण्याची मानसिकता करतांना दिसून येत आहे.

ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागातील विद्यार्थ्यांना ऑनलाइन शैक्षणिक सोयी सुविधा सहज उपलब्ध होत असल्याने काही फारसा परिणाम होत नसल्याचे चित्र असले तरी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी, सर्व शैक्षणिक संकल्पना स्पष्ट होण्यासाठी, मराठी, हिंदी, इंग्रजी यासह व्याकरण तसेच गणित, विज्ञान, इतिहास, भूगोल यातील सर्व बाबी समजून घेण्यासाठी प्रत्यक्ष शाळेत अध्ययन अध्यापन प्रक्रिया होणे गरजेचे आहे मात्र कोरोनाच्या भितीमुळे कोरोनाचा धोका टळल्याशिवाय शाळा सुरू करता येणार नाही हेही तेवढेच खरे आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com