२४ वार करीत गळा चिरुन वाळू व्यावसायिकाची हत्या

वर्चस्वासह पुर्ववैमन्यस्यातून खून झाल्याचा संशय ; मारेकर्‍यांच्या शोधार्थ पथके रवाना
२४ वार करीत गळा चिरुन वाळू व्यावसायिकाची हत्या

जळगाव । Jalgaon । प्रतिनिधी

वाळू व्यवसायातील वर्चस्वाच्या वादातून तरुणाला घरातून बोलावून घेत घरापासून अवघ्या शंभर मीटर अंतरावरच भावेश उर्फ गोलू उत्तम पाटील (वय-३२, मूळ रा. आव्हाणे ता. जळगाव, ह.मु. निवृत्तीनगर) या वाळू व्यवसायीकावर चॉपरसारख्या धारदार शस्त्राने तब्बल २४ वार केले. त्यानंतर तरुणाचा गळा चिरुन त्याची निर्घृण हत्या केल्याची घटना मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास एसएमआयटी महाविद्यालयाजवळील मुक्ताईनगरात घडली. याप्रकरणी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस संशयितांचा कसून शोध घेत आहे.

जळगाव तालुक्यातील आव्हाणे येथील भावेश पाटील हा तरुण पत्नी व मुलीसह दोन वर्षांपासून निवृत्तीनगरात वास्तव्यास आहे. वाळूचा व्यवसाय करुन तो कुटुंबाचा उदनिर्वाह करीत होता. संशयित मनिष नरेंद्र पाटील (वय-२२, रा. आव्हाणे ता. जळगाव) व भुषण रघुनाथ सपकाळे (वय-३२, रा. खेडी खुर्द ता.जळगाव) हे दोघ भावेशसोबतच वाळू व्यवसाय करीत होते. परंतू वाळूच्या व्यवसायात सुरु असलेल्या वर्चस्वातून त्यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वाद सुरु होता.

याच कारणावरुन मनिष व भूषण यांनी भावेशला मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास निवृत्ती नगरातील बंधन बँकेजवळ बोलावून घेतले. भावेश हा याठिकाणी येताच मनिष व भूषण यांनी भावेशवर चॉपरसारख्या धारदार शस्त्राने तब्बल २४ वार करीत त्याची निर्घृण हत्या केली. यात भावेशचा मृत्यू झाल्याचे समजताच दोघ संशयितांनी घटनास्थळाहून पसार झाले. याप्रकरणी भावेशचा चुलत भाऊ कैलास पाटील याच्या फिर्यादीवरुन दोन जणांविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुचाकीसह चॉपरचे कव्हर हस्तगत

मारेकर्‍यांनी भावेशवर वार करण्यासाठी आणलेले चॉपरचे कव्हर आणि दुचाकी घटनास्थळावर पोलिसांना मिळून आली. पोलिसांनी हा मुद्देमाल हस्तगत केला. तसेच भावेशच्या घरापासून अवघ्या शंभर मिटर अंतरावर त्याचा निर्घृण खून झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मारेकर्‍यांच्या शोधार्थ पथके रवाना

जिल्हापेठ पोलिसात संशयित मनिष नरेंद्र पाटील (वय-२२) रा. आव्हाणे आणि भुषण रघुनाथ सपकाळे (वय-३२) रा. खेडी खुर्द ता.जि.जळगाव यांच्याविरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेसह गुन्हे शोध पथक मारेकर्‍यांच्या शोधार्थ रवाना झाले असून त्यांचा कसून शोध सुरु आहे.

टीप देत असल्याचा संशयावरुन सुरु होता वाद

मनिष व भावेश हा एकाच गावातील असल्याने ते सोबत व्यवसाय करीत होते. परंतु कालांतरणाने ते स्वतंत्र व्यवसाय करु लागले. भावेश हा पोलिसांना आपली टीप देतो, त्यामुळेच आपल्या वाहने पकडली जात असल्याच्या संशयावरुन त्यांच्यात काही दिवसांपासून वाद सुरु होते. याच वाळू व्यवसायातील वर्चस्वाच्या वादातून भावेशची हत्या करण्यात आली असल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे. तसेच मारेकरी दोन पेक्षा अधिक असल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविली जात आहे.

रक्ताच्या थारोळ्यात दोन तास मृतदेह रस्त्यावरच

मध्यरात्री सुमारे बारा सव्वाबारा वाजेच्या सुमारास खुनाची घटना घडल्यानंतर काही मिनीटातच पोलिसांना घटनेची माहिती मिळाली. खूनाची माहिती मिळताच अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, सहायक पोलीस अधिक्षक कुमार चिंथा, पोलीस निरिक्षक अरूण धनवडे, सहाय्यक पोलीस निरिक्षक गणेश देशमुख, किशोर पवार यांच्यासह गुन्हे शोध पथकातील कर्मचार्‍यांनी घटनास्थळी भेट धाव घेतली. सुमारे दोन तास मृतदेह रक्ताच्या थोराळ्यात रस्त्यावर पडून होता.

सोमवारीच साजरा केला पत्नी अन् मुलीचा वाढदिवस

सोमवारी भावेशची पत्नी शितल व तीन वर्षाची मुलगी यांचा एकाच दिवशी वाढदिवस होता. भावेशने त्या दोघांचा वाढदिवस मोठ्या आनंदाने साजरा केला. आणि दुसर्‍याच दिवशी भावेशची निर्घृण हत्या केल्याने त्याच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. भावेशच्या पश्चात आई, पत्नी, भाऊ, मुलगी व दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे.

भेटायला जाण्यापुर्वीच रस्त्यातच केला गेम...

मारेकरी भूषण व मनिष हे भावेशला मारण्यापुर्वी त्याला बोलाविण्यासाठी त्याच्या घरी गेले होते. यावेळी त्यांनी भावेशच्या घराचा ठोठावला देखील परंतु भावेशने वाळू व्यवसायातीलच त्याच्या मित्राला फोन करुन या प्रकाराबाबत सांगितले. त्याच्या मित्राने मी बघतो असे सांगत फोन कट केला. थोड्यावेळानंतर भावेशला मारेकर्‍यांचा फोन आला आणि भावेश दुचाकीवरुन त्यांना भेटण्यासाठी गेला. मारेकर्‍यांनी भावेशला त्याच्या घराजवळ गाठत त्याच्यावर सपासप वार करीत त्याची हत्या केली. त्यानंतर त्याच्या मित्राने भावेशला फोन केला परंतु भावेश त्याला प्रतिसाद देत नसल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com