साधू महात्मे हेच देशाला जोडू शकतात : समरसता महाकुंभाचा शुभ संकेत

हजारो भाविकांच्या उपस्थितीत मंत्रोपचाराच्या गजरात समरसता महाकुंभाचा शंख फुंकला
समरसता महाकुंभाचे उपस्थित संत महंत
समरसता महाकुंभाचे उपस्थित संत महंतसमरसता महाकुंभाचे उपस्थित संत महंत

संजयसिंग चव्हाण/अरूण होले

भुसावळ Bhusaval/ फैजपूर ।

गेल्या चार वर्षांआधी कोणालाच विश्वास बसणार नाही, अशा पद्धतीचे ग्रामीण भागातील अत्यंत महत्त्वपूर्ण कार्य महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांनी करून दाखवले आहे. अध्यात्माबरोबरच आरोग्याकडे लक्ष देऊन त्यांनी आपला दृढ संकल्प निष्कलंक धामच्या माध्यमातून पूर्ण केला आहे. त्यांच्या या कार्याकडे बघून असे वाटते की, साधू महात्मे (Sadhu Mahatma)हेच आपल्या देशाला (unite country) जोडू शकतात. अशा प्रकारचा शुभ संकेत हा समरसता महाकुंभातून मिळत असल्याचे प्रतिपादन समरसता महाकुंभाच्या (Samarasata Mahakumbha) शुभारंभ कार्यक्रमाचे अध्यक्ष परमपूज्य अनंत श्री विभूषित जगद्गुरु सतपंथाचार्य श्री ज्ञानेश्वर दासजी महाराज (तीर्थ धाम प्रेरणापीठ गुजरात) यांनी केले.

केळीच्या खांबापासून तयार करण्यात आलेल्या दीपस्तंभातील ज्योती पेटवून समरसता महाकुंभाचे उद्घाटन  करतांना संत महंत
केळीच्या खांबापासून तयार करण्यात आलेल्या दीपस्तंभातील ज्योती पेटवून समरसता महाकुंभाचे उद्घाटन करतांना संत महंतकेळीच्या खांबापासून तयार करण्यात आलेल्या दीपस्तंभातील ज्योती पेटवून समरसता महाकुंभाचे उद्घाटन करतांना संत महंत

समरसता महाकुंभाच्या शुभारंभ कार्यक्रमाच्या व्यासपीठावर श्रीमद् जगद्गुरु शंकराचार्य स्वामी वासुदेवानंद सरस्वती महाराज, निर्मल पिठाधीश्वर श्री महंत ज्ञानदेवसिंहजी महाराज, ज्ञानपीठाधीश्वर अविचलदासजी महाराज, स्वामी परमानंदजी महाराज जगद्गुरु रामानंदाचार्य रामराजेश्वराचार्यजी महाराज, महंत रवींद्रपुरीजी महाराज, जगद्गुरु शंकराचार्य स्वामी श्री ज्ञानानंदतीर्थजी महाराज, महामंडलेश्वर आचार्य श्री धर्मदेवजी महाराज, राजेंद्रदासजी महाराज, जितेंद्रदासजी महाराज, ईश्वरदासजी महाराज, गोपाल चैतन्यजी महाराज, रामकिशोरदासजी महाराज, आनंद देवगिरीजी महाराज, देवेंद्र नाथजी महाराज, हरिवंशदासजी महाराज, मुरारीदासजी महाराज, भक्तीदासजी महाराज यांच्यासह सुमारे 100 संत महंत व्यासपीठावर उपस्थित होते. प्रारंभी उपस्थित संत महंतांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. केळीच्या खांबापासून तयार करण्यात आलेल्या दीपस्तंभातील ज्योती पेटवून समरसता महाकुंभाचे उद्घाटन करण्यात आले. महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांनी धर्मध्वजेचे पुजन केले.

महाकुंभ शुभारंभाचे प्रास्ताविक महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांनी केले. ते आपल्या प्रास्ताविकात म्हणाले की, संपूर्ण भारतवर्षातून आलेल्या संत महंत आणि भाविकांची उपस्थिती हाच माझ्यासाठी मोठा आशीर्वाद आहे. असे म्हणून त्यांनी व्यासपीठावरील कोणाचाच नाम उल्लेख न करता व्यासपीठाला डोके टेकून नमन केले. त्यांच्या या कृतीने उपस्थित हजारो भाविकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. पुढे ते म्हणाले की, समरसता महाकुंभ आयोजित करण्यामागे अनेक कारणे आहेत. सतपंथ मंदिर संस्थान फैजपूरचा चतु:शताब्दी रौप्य महोत्सव, अखिल भारतीय संत संमेलन फैजपूरचा दशाब्दी महोत्सव, परमपूज्य गुरूदेव जगन्नाथजी महाराज यांची 21 वी पुण्यतिथी, महामंडलेश्वर श्री जनार्दन हरीजी महाराज साधू दीक्षा रौप्य महोत्सव, श्री जनार्दन हरीजी महाराज, महामंडलेश्वर यांचा पट्टाभिषेक महोत्सव आणि तुलसी हेल्थ केअर सेंटर लोकार्पण समारंभ व श्री जगन्नाथ गौशाला भूमिपूजन समारंभ आदी सात कारणांसाठी तसेच तसेच वढोदे येथे उभारण्यात आलेल्या निष्कलंक धामचे लोकार्पण अशा पद्धतीने या समरसता महाकुंभाचे आयोजन करण्यात आले आहे.

लांब लांब हुन आलेल्या हजारो भाविकांची मंदियाळी (छाया- कालु शहा भुसावळ)
लांब लांब हुन आलेल्या हजारो भाविकांची मंदियाळी (छाया- कालु शहा भुसावळ)लांब लांब हुन आलेल्या हजारो भाविकांची मंदियाळी (छाया- कालु शहा भुसावळ)

सध्या सगळीकडे जात, समाज, संप्रदाय, परंपरा यांच्यात छोट्या छोट्या कारणांवरून वाद होत असलेले आपण ऐकत आहोत. आपल्या भारतवर्षाचा इतिहास पाहिला असता संतांनी आपल्याला जोडण्याचे काम केले होते. एवढेच नाही तर त्यापूर्वी सुद्धा देवदेवतांनी म्हणजेच श्रीराम व श्रीकृष्णांनी समरसता दाखवून दिली होती. तसेच आपल्या वेद, उपनिषद आदी ग्रंथांमध्ये तसेच संतपरंपरेमध्ये समरसता दिसून येते. या सर्वांचे अमृतमंथन करून आपल्याला समरसता घडवून आणायची आहे. निष्कलंक धामची वास्तुशांती भाविकांच्या क्षुधाशांतीतूनच होत आहे, याचा आनंद आहे.

आज शहरातून गावाकडे आपण महाकुंभात सहभागी होण्यासाठी आला आहात. माणसाने माणसाशी माणसासारखे वागावे, आपल्यामध्ये संवाद निर्माण व्हावा, त्यातून देश मजबूत व्हावा, हा उद्देश समरसता महाकुंभाचा असून सर्वांचा देव एकच आहे, याची अनुभूती घेण्यासाठी आपण याठिकाणी जमलो आहोत. गुरूदेव जगन्नाथजी महाराज यांना हृदयरोग असल्याने ते त्यांच्यावर उपचार करण्यासाठी भाविकांनी वर्गणी गोळा केली होती, असे सांगत त्यांचे अनुभव कथन करून ते भुसावळ येथील डॉ. व्ही. एन. चौधरी यांच्याकडे रक्त तपासणी करण्यासाठी येत असत असे सांगितले. त्यामुळे गुरूदेवांच्या नावाने हॉस्पिटल उभारण्याचा संकल्प करून त्या संकल्पाची आज पूर्ती होत असल्याने गुरूदेवांच्या चरणांमध्ये हे आरोग्यधाम समर्पित करत असल्याचेही महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांनी सांगितले. यावेळी ते भावूक आणि हळवे झाल्याने त्यांचे डोळे भरून आले होते.

त्यानंतर परमपूज्य महामंडलेश्वर आचार्य धर्मदेवजी महाराज आपल्या मनोगतात म्हणाले की, महाराष्ट्र व मध्यप्रदेश यांच्या सीमावर्ती भागात या भव्यदिव्य महाकुंभाचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या चार वर्षात जंगलात मंगल करण्याचा अद्भुत चमत्कार महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांनी केला आहे. राजमहालापेक्षा कमी नसलेले हे निष्कलंक धाम आहे. त्यामुळे एक तर जनार्दन हरीजी महाराज यांचे विश्वकर्मा यांच्याशी संबंध असावे अथवा साक्षात ते विश्वकर्मा यांचे अवतार असावे. गुरूदेव जगन्नाथ महाराज आज नाहीत अशी आठवण जनार्दन हरीजी महाराज यांनी सांगितली. परंतु उपस्थित संत महंत आणि भाविकांच्या हजारो डोळ्यांमधून ते हा सोहळा पाहत आहेत आणि प्रसन्न होऊन आशीर्वाद देत आहेत. जनार्दन हरीजी महाराज यांचा विनम्र स्वभाव आम्हा सर्वांना प्रेरणा देतो. मार्गशीर्ष महिन्यात भगवंताने गीतेचा उपदेश दिला आहे. त्यामुळ आपल्या जीवनात समरसता महाकुंभापेक्षा मोठा उपदेश नाही. सतपंथाचे कार्य करणारे हे देव लोकांकडून आलेले प्रत्यक्ष देवीदेवताच असल्याचे प्रतिपादन धर्मदेवसिंहजी महाराज यांनी केले.

शोभायात्रेत दशावतार कथेतील अवतारांच्या सजीव देखाव्यांसह सहभागी भाविक
शोभायात्रेत दशावतार कथेतील अवतारांच्या सजीव देखाव्यांसह सहभागी भाविकशोभायात्रेत दशावतार कथेतील अवतारांच्या सजीव देखाव्यांसह सहभागी भाविक

आपल्या अध्यक्षीय मनोगतात बोलताना परमपूज्य अनंत श्री विभूषित जगद्गुरु सतपंथाचार्य श्री ज्ञानेश्वरदासजी महाराज म्हणाले की, समरसता महाकुंभाच्या पहिल्याच दिवशी 60 ते 70 हजार भाविक जमले आहेत. गुरूदेव जगन्नाथ महाराज हे ज्ञानी पुरूष व चित्रकार होते. त्यांनी फक्त कागदावर चित्र रेखाटले नाही तर जनार्दन हरीजी महाराज यांच्या रूपात सजीव चित्र रेखाटले आहेत, सतपंथरत्न तयार केले आहे. जनार्दन महाराज यांनी आरोग्यधाम व पंचकर्म चिकित्सा केंद्र तयार केले आहे. विविध भागांमध्ये विभागलेल्या लोकांना साधुसंतच जोडू शकतील असा शुभ संकेत या समरसता महाकुंभाने दिला आहे. सनातन हिंदू जागृत करून देशाला जोडण्याची गरज आहे. धर्म मजबूत करून एकत्र व्हायला हवे. त्यासाठी एकमेकांमधील वाद सोडून देण्याची गरज आहे. आपल्या सनातन हिंदू धर्मावर प्रहार करणार्‍यांशी आपल्याला लढायचे आहे. त्यासाठी एकत्रित येऊन कार्य करण्याची गरज आहे. जनार्दन महाराज यांनी पुढे व्हावे आणि आम्ही तुमच्यासोबत आहोत. तुमच्यासोबत युवा आणि सात्विकता असून भविष्यात तुमच्या हातून असे अनेक चांगले कार्य होत राहो, अशा शुभेच्छा देखील ज्ञानेश्वरदासजी महाराज यांनी आपल्या मनोगतातून दिल्या.

शोभायात्रेच्या माध्यमातून घडले दशावतार

कथेतील अवतारांच्या सजीव देखाव्याचे दर्शन - येथून जवळच असलेल्या वढोदे येथील निष्कलंकधाम येथे आयोजित समरसता महाकुंभाच्या शुभारंभप्रसंगी पिंपरूड फाटा ते वढोदे येथील निष्कलंक धामपर्यंत काढण्यात आलेल्या शोभायात्रेच्या माध्यमातून श्री विष्णू परमात्म्याच्या दशावतार कथेतील असलेल्या विविध अवतारांचे सजीव देखाव्याचे दर्शन घडविण्यात आले. तब्बल तीन किलोमीटर ही शोभायात्रा काढण्यात आली.

फैजपुर येथील सतपंथ चॅरिटेबल ट्रस्ट व अखिल भारतीय सनातन सतपंथ परिवार यांच्यातर्फे आयोजित समरसता महाकुंभाचा शुभारंभ दि. 29 डिसेंबर 2022 रोजी झाला. या शुभारंभाच्याप्रसंगी पिंपरूड फाटा येथून भव्य अशी शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत सुरूवातीला कलशधारी बालिका व महिला यांचा समावेश होता. त्यानंतर विविध भजनी मंडळ संतांचे अभंग गात आणि पावली खेळत शोभायात्रेत चालत होते. समरसता महाकुंभासाठी संपूर्ण भारतभरातून आलेले संतमहंत यांची अश्वारूढ रथातून मिरवणूक काढण्यात आली. प्रत्येक रथात चार ते पाच संत उपस्थित होते. अशा पद्धतीने सुमारे 25 रथ एका मागोमाग शोभायात्रेत सहभागी झाले होते. त्याचप्रमाणे महाराष्ट्रीसह गुजरात व भारतभरातील इतर राज्यातून आलेले भाविक शोभायात्रेत हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते. शोभायात्रेत सतपंथाचा ध्वज धरण्यात आला होता. या शोभायात्रेत ज्ञानदेवसिंहजी महाराज, ज्ञानेश्वरदासजी महाराज, अविचलदासजी महाराज, स्वामी परमानंदजी महाराज, रामानंदाचार्य रामराजेश्वराचार्यजी महाराज, रवींद्रपुरीजी महाराज, जगद्गुरु शंकराचार्य स्वामी श्री ज्ञानातीर्थजी महाराज, महामंडलेश्वर धर्मदेवजी महाराज यांच्यासह शेकडो संतमहंत सहभागी झाले होते. एवढेच नव्हे तर या धर्माचार्य आणि संत महापुरुषांसह महानुभाव, स्वामीनारायण, वारकरी संप्रदाय यासह विविध संप्रदायातील संत महंत उपस्थित होते. पिंपरूड फाट्यापासून निघालेली ही शोभायात्रा वढोदे येथील निष्कलंक धामपर्यंत आली असता सुमारे दीड किलोमीटरपर्यंत ही शोभायात्रा चालत असल्याचे निदर्शनास आले सुमारे 30 ते 40 भाविक या शोभायात्रेत सहभागी झाले होते. महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या समरसता महाकुंभाचा शुभारंभ भव्यदिव्य शोभा यात्रेने पार पडला.

दशावतारी कथेतील अवताराचे दर्शन -

शोभायात्रेत विविध सजीव देखावे साकारण्यात आले होते. त्यात भगवान विष्णू यांनी घेतलेल्या दहा अवतारांचे सजीव देखाव्यांचे दर्शन घडवण्यात आले होते. त्याचप्रमाणे यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद आणि ऋग्वेद अशा चार वेदांसह विविध ग्रंथांचे सजीव दर्शन ग्रंथाच्या प्रतिकृती बनवून घडवण्यात आले. भगवान विष्णूच्या सजीव देखाव्यासोबतच या अवतारात जन्म घेतलेल्या इतर देवीदेवतांचे देखील सजीव दर्शन या शोभायात्रेच्या निमित्ताने झाले. श्रीरामाचा सचिव देखावा साकारताना लक्ष्मण, सीता, हनुमान यासह विविध पात्रांचे सजीव देखावे साकारण्यात आले. श्रीकृष्ण, परशुरामाची वेशभूषा धारण केलेले सजीव देखावे शोभायात्रेचे मुख्य आकर्षण होते. या शोभायात्रेत सतपंथ परिवार मोठ्या संख्येने सहभागी झाला होता. त्यामुळे गावोगावच्या महिला मंडळ आणि पुरूष मंडळींनी आपापली वेशभूषा धारण करून शोभायात्रेत सहभागी झाले होते. संत महंतांच्या आणि भाविकांच्या एकत्रीकरणातून निघालेली ही शोभायात्रा लक्षवेधी ठरली या शोभायात्रेनंतर भव्य अशा मंडपात निष्कलंक धामचा लोकार्पण सोहळा पार पडला.

आयुर्वेदाचार्य श्री धन्वंतरी याग

महाकुंभात दि. 29 ते 31 डिसेंबर दरम्यान अखंड नामजप व नामसंकीर्तन होत आहे. तसेच जळगाव येथील श्रीकांत रत्नपारखी यांच्या नेतृत्वाखाली आयुर्वेदाचार्य श्री धन्वंतरी याग होत आहे. यात दि. 29 रोजी मंडप प्रवेश, देवता स्थापन व हवन करण्यात आले. आज शुक्रवार, दि. 30 डिसेंबर रोजी प्रातः पूजन, हवन, अर्चन, दीपोत्सव तर उद्या शनिवार दि. 31 डिसेंबर रोजी बलिपूजन व पूर्णाहुती होणार आहे.

आज शुक्रवार दि.30 रोजी होणार संतवाणी आशीर्वाद

समरसता महा कुंभाच्या दुसर्‍या दिवशी आज शुक्रवार दिनांक 30 डिसेंबर 2022 रोजी सकाळी नऊ ते बारा आणि दुपारी दोन ते साडेपाच दरम्यान संतवाणी आशीर्वाद होणार आहेत यात समरसता महाकुंभात सहभागी झालेल्या भारतभरातून आलेल्या विविध संतांचे धर्माचार्य संत महापुरुषांचे मार्गदर्शन होणार आहे आणि रात्री आठ वाजता दान दाता सन्मान समारंभ होईल.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com