
रावेर | प्रतिनिधी raver
पालिका हद्दवाढ झाल्यानंतर या विस्तारित भागातील रहिवाश्यांना कर मागणी पत्र पालिकेने (Raver Municipal Council) पाठविले आहे. यानंतर नागरिकांमध्ये मोठा रोष निर्माण होत आहे. पालिका हद्दीत सामील झालेल्या या भागात सोयी सुविधा देण्यात पालिका अपयशी ठरलेली असतांना, अन्यायकारकरित्या करांची वसुली करण्याचे प्रायोजन होत असल्याने याविरुद्ध नागरिकांनी पालिकेत निवेदन देऊन करांची मागणी करू नये अशी भूमिका घेतली आहे. या अनुषंगाने देण्यात आलेले निवेदन नगरपालिका कार्यालयीन अधीक्षक तडवी यांनी स्वीकारले.
रावेर शहराला लागून असलेल्या विस्थापित कॉलन्या ३ वर्षापासून पालिका हद्दीत सहभागी झाल्या. यामुळे तब्बल ४ नगसेवकांची संख्या वाढली.सुमारे १५ हजार लोकसंख्या असलेल्या वसाहती पालिकेत समाविष्ट झाल्या. मात्र या भागात पालीकेने अजूनही काही सुधारणा केल्या नसल्याने, नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. पावसाळ्यात तर रस्त्यावर डोह साचलेले असल्याने यातून वाट काढणे बिकट होते.
सांडपाणी व्यवस्था व दिवाबत्ती व्यवस्था नसल्याने, नागरिकांना फार अडचणी आहेत. याबाबत पालिकेला वारंवार विनंती करूनही यापैकी कोणतीही सुविधा पालिका देऊ शकली नाही. आता पालिका कर वसुली साठी नोटीसा पाठवत आहे. यास नागरिकांनी विरोध केला आहे. शुक्रवारी या संदर्भात निवेदन देण्यात आले. याप्रसंगी पद्माकर महाजन यांनी आधी सुविधा पुरवा तद्नंतर करांची वसुली करा अशी मागणी केली. यावेळी भाजप शहर अध्यक्ष दिलीप पाटील, सरचिटणीस सी.एस.पाटील, शहर उपाध्यक्ष अरुण शिंदे, भाजप शहर उपाध्यक्ष अमोल पाटील, नितीन पाटील, माजी नगरसेवक राजेंद्र महाजन, सुधीर पाटील, यशवंत दलाल, मनोज श्रावक, रवींद्र पाटील, ई जे महाजन, अमजद शेख, बाळा आमोदकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.