पारोळा रथोत्सवाला ३८२ वर्षांची परंपरा

महाराष्ट्रातील सर्वात उंच रथ
पारोळा रथोत्सवाला ३८२ वर्षांची परंपरा

योगेश पाटील

पारोळा- parola

तालुक्याचे ग्रामदैवत प्रति तिरूपती म्हणून ओळख असलेल्या श्री बालाजी महाराजांचा ब्रह्मोत्सव दि.२६ पासून सुरू आहे. आज दि.६ ऑक्टोंबर गुरुवार रोजी एकादशीच्या दिवशी रथाची मिरवणूक निघत असून दु.१-५ वाजता मुख्य विश्वस्त श्रीकांत शिंपी याच्या हस्ते रथाचे पुजन होवून रथ मार्गक्रमण होणार आहे.

३८२ वर्षाची परंपरा असलेला बालाजी रथोत्सव कोरोनाच्या परिस्थितीमुळे गेल्या दोन वर्षापासून रद्द होवून साधेपणाने साजरा होत होता. मात्र यावर्षी रथोत्सव मिरवणूक मोठ्या धुमधडाक्याने निघाणार आहे. हा उत्सव पाहण्यासाठी राज्यातील विविध भागातून शेकडो भाविक भक्त येतात व श्रींचे दर्शन घेतात. महाराष्ट्रातील सर्वात उंच ४१ फुट व जवळपास दिड टनांपर्यंत वजन असलेला हा रथ भाविक मोठ्या उत्साहात कोणत्याही यंत्रसामग्री शिवाय ओढतात हे विशेष.... रथाच्या पुढील भागात शहरातील सर्व व्यायाम शाळांचे लेझीम पथक ढोल ताशे बँड असतात तर पारंपारिक वेशभूषेत असलेले चोपदार मशाल धारी असा नेत्रदिपक देखाव्यात दिमाखात हा श्रींचा रथ, रथाच्या चोहोबाजूंनी विद्युत रोषणाई केली जाते याप्रसंगी संपूर्ण मंदिर परिसरात लक्ष्मी रमणा गोविंद बालाजी महाराज कि जय च्या घोषणेत संपूर्ण परिसर रममाण होतो दुपारच्या १२ ते १ च्या दरम्यान निघालेला रथ शहराच्या मुख्य भागातून निघून रात्री ८ ते ८.३० च्या सुमाराम राम मंदिर येथे येतात येथे श्री राम मंदिर संस्थानतर्फे आरती होऊन रात्री १२ ते १ च्या दरम्यान हा श्रींचा रथ आपल्या नियोजित स्थळी

परत येतो. यादिवशी तिरूपती येथिल प्रथेप्रमाणे पारोळा येथील मंदिर परिसरात कल्याण कट्ट्याचे आयोजन करण्यात येते इथे अनेक भाविक आपले नवस फेडण्यासाठी येतात व आपले केशदान करतात.

मंदिरा विषयी थोडे

पारोळा येथील बालाजी मंदिराचा जिर्णोद्वार दोन वर्षापूर्वी झाला असून ९ ते १० वर्षे चाललेल्या या कामाला राज्यासह देशभरातून भाविकांनी भरभरून दान दिले. हे मंदिर राजस्थान येथील बन्सी पहाड दगडात सुबक असे आखीव रेखीव सर्व कलाकुसर व उत्कृष्ठ नक्षीकामातून लोकवर्गणीतून सव्वाचार ते पाच कोटीतून उत्तर महाराष्ट्रात कुठेच नाही असे एकमेव दगडातून हे उभारले गेले आहे. दि. १४ मार्च २००७ साली जुने मंदीर पाडून नव्या मंदीराच्या जिर्णोद्धाराच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली तब्बल १० वर्ष मंदीराच्या कामाला पुर्ण होण्यास लागले. या मंदीराच्या उभारणीच्या वेळी एकमत प्रवाह असा होता की मंदिराचे काम आर.सी.सी. मध्ये करण्यात यावे तर दुसरा राजस्थानी पहाडी दगडातच काम व्हावे असा होता संस्थानचे अध्यक्ष कै. रघुनाथ शिंपी यांनी मंदीराचे काम राजस्थानी दगडात व्हावे असा आग्रह विश्वस्त वसंतराव शेंडे यांचेसह लोकांनी धरला आणि दगड कामाला सुरुवात झाली होती.

गर्भगृह

श्री बालाजी महाराजांची 'श्रीं' ची मुर्ती ज्या ठिकाणी विराजमान आहे. त्या भागाला गर्भ गृह असे म्हणतात ४१ फुट उंचीचा हा गर्भगृह आहे तो १५ बाय २० या आकारात आहे. या गर्भगृहाच्या घुमटावर कळस आहे. त्या कळसाला सोन्याचा मुलामा देण्यात आला आहे. यासाठी संपूर्ण गावातून कळस झोळी फिरवून सुमारे सव्वातीन लाख रुपयांतून कळसाला सोन्याचा मुलामा देण्यात आला आहे. गर्भगृहात सागवानी सिंहासन आखीवरेखीव कलात्मक यु.पी.च्या कारांगीरांनी बनविला आहे. या गर्भगृहात श्री साठी ए.सी.ची सोय आहे. श्रीं च्या मुर्तीवर समोरुन स्पॉट लाईट देण्यात आला आहे. त्याचा प्रकाश फक्त श्री बालाजी महाराजांच्या मुर्तीवरच आहे. श्रींच्या मुर्तीच्या बाजूला दोन ४ ते ५ फुटाच्या पितळी समई प्रज्वलीत आहे. गर्भगृहात फक्त "श्रीं" आणि समईचे दर्शन भाविकांना मिळते. तिरुपती प्रमाणेच श्री बालाजी महाराजांचे दर्शन भाविकांना होईल. अशी सोय या गर्भगृहात करण्यात आली आहे. या गर्भ गृहाला भव्य असा सागवानी नक्षीकामातून दरवाजा आखीव रेखीव तयार करण्यात आला आहे

अर्ध गर्भ गृह

गर्भ गृहाच्या पुढच्या टप्यात अर्ध गर्भ गृहाची उभारणी करण्यात आली आहे. त्या ठिकाणी पुरोहित महाराज हे जप तप श्री बालाजी महाराजांची पुजा अर्चा करतील अशी व्यवस्था आहे.

सभामंडप

सभामंडपात २५ फुट उंचीचा ४५ बाय ४५ अशा आकारात आहे. ३२ दगडांच्या आखीव रेखीव तयार करण्यात आलेल्या खांबांवर (पिलर) उभा करण्यात आला आहे. या सभामंडपात १३ विष्णु अवतारांच्या मुर्त्या स्वतंत्र्य भागात बसविण्यात आल्या आहेत. यात स्व. गिरीशेठ शिंपी यांची मुर्तीही बसविण्यात आली आहे. विष्णु अवतारात गणेश, कुबेर, राम सीता, मच्छ अवतार, वामन अवतार, देवी पद्मावती, मारुती, गरुड, लक्ष्मी, कच्छ अवतार, दत्त अवतार, श्रीकृष्ण राधा आणि नरसिंह अवतार अशी आहेत या सभामंडपात एक मुख्य प्रवेशद्वारासह एकूण ४ दरवाजे आहेत. सभामंडपाच्या घुमटावर सोन्याचा मुलामा असलेला कळस बसविण्यात आला आहे. या सभामंडपात श्री बालाजी भक्त पुणे येथील उद्योगपती चितोडकर यांनी खास दुबई येथून ३ लाखाचा आकर्षक असा भव्य आणि दिव्य झुंबर दिलेला आहे. त्यातील बदलणारे प्रकाश हा सर्वांचे आकर्षणाचा विषय ठरला आहे.

गरुडस्तंभ

समामंडपाच्या पुढचा भाग गरुडस्तंभ आहे. ३१ फुट उंचीचा हा गरुड स्तंभ आहे. या स्तंभाचे वैशिष्ठ म्हणजे ब्रह्मोत्सवाची सुरुवात ही गरुडस्तंभ पुजनाने होते. ३३ फुट उंचीच्या या स्तंभात अखंड सागवानी दांडी आणि बाहेरून पितळाचे आवरण याला आहे व कै. श्रीनिवासभाऊ अग्रवाल यांनी सव्वाशे वर्षांपूर्वी या गरुड स्तंभाची उभारणी स्वखर्चाणे केली होती. त्याचा नवीन मंदीरात जिणोद्धार देखील वारसदार उद्योगपती गोपालशेठ अग्रवाल यांनी करुन दिला.

गोपुरम

गोपूरम म्हणजे श्री बालाजी महाराजांच्या मंदीराचे महाप्रवेशद्वार होय. या गोपूरमची उंची ७१ फुट आहे. सर्वात उंचावर पंचधातूचा कळस आणि भगवा ध्वज या गोपूरमला लावण्यात आला आहे. ३८ बाय १८ या आकारात हा गोपूरम आहे. या गोपूरमवर १८ द्वारपालाच्या मुर्त्या ठिकठिकाणी बसविण्यात आल्या आहे. या गोपूरममध्ये अद्ययावत असा नगारखाना आहे.तो नगारा वाजविण्याचे काम संतोष गुरव हे करतात, या महाकाय प्रवेशद्वाराच्या पायथ्याशी पाण्याची रायझिंग नळाद्वारे भाविकांची आपोआप पाय धुण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यानंतर गरुडस्तंभ आणि गोपूरम या मधल्या भागात मॅट टाकण्यात आली आहे.

रथाचा कक्ष

ज्या ठिकाणी सर्वात मोठा उंचीचा ४१ फुट उंचीचा रथासाठी ४५ फुट उंचीचा रथाचा कक्ष करण्यात आला आहे. या ४० बाय २० या आकारांच्या कक्षात रथ लावण्याची व्यवस्था आहे. भाविकांना रथ पाहता यावा आणि. रथाचे दर्शन घेता यावे यासाठी पारदर्शी पत्रा दर्शनी भाग लावण्यात आला आहे. असे सर्व सोयी सुविधा आणि संपूर्ण बन्सी पहाड राजस्थानी दगडात मंदीर उभारण्याचे काम राजस्थान येथील भरतभाई मालवीय, एम. एम. मालवीय, राकेश मालवीय, रवि शिल्पी, रवि बेल पाठक, सिताराम भाई या वास्तु निर्मित्यांनी हे मंदीर उभारले आहे. या मंदीराच्या उभारणीसाठी सर्वाधिक निधी पुणे, औरंगाबाद, मुंबई, नाशिक व पारोळा शहरासह तालुक्याच्या नागरिकांनी भरभरुन देणगी दिल्यात.

त्याचप्रमाणे तत्कालिन खा.ए. टी. पाटील यांनी आपल्या निधीसह शासनाच्या तत्कालिन पर्यटन मंत्री यांच्या निधीतून ५ कोटी रुपये तर विविध निधी मिळविण्यासाठी प्रयत्न केले आणि त्यांनी तो मिळवलाही. त्या निधीतून देखील येथे विविध कामे पूर्णत्वास आली काही येत आहेत. विशेष म्हणजे बालाजी मंदिराने मागील दोन वर्षापासून प्रसादालय सुरु केले असून दुपारी ११ पासून हे प्रसादालय ३० रुपयाचे कुपन घेवून येथे पोटभर जेवन मिळत असते.

या योजनेचा देखील अनेक भक्तं व गोर गरीब नागरिक लाभ घेत असतात. त्याचप्रमाणे मंदिर संस्थानतर्फे भविष्यात मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आदी उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे सांगितले जाते. संस्थेचे मुख्य विश्वस श्रीकांत शिंपी, माजी खा. ओ.टी.पाटील पारोळ्याचे सुपुत्र आणि पुण्यातील उद्योगपती वसंतराव शेंडे, रावसाहेब भोसले यांच्यासह सर्वच विश्वस्त मंडळाने या जिर्णोद्वारासाठी अमूल्य वेळ तन-मन-धनाने प्रयत्न केलेत हे विशेष.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com