
चाळीसगाव | प्रतिनिधी | chalisgaon
तालुक्यात नव्हे तर जिल्ह्यात सर्वात मोठी असलेल्या राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाची निवडणुक अंतिम टप्प्यात आली आहे. अनेक दिवसांपासून सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची पत्रकबाजी संपूर्ण तालुक्याला पाहवयास मिळत आहे. आता तर आरोप-प्रत्यारोप हा वैयक्तीक पातळीवर पोहचला असून खालच्या पातळीवर जावून प्रचार केला जावू लागला आहे. परंतू आतापर्यंत पत्रकबाजीत संस्थेत कोणत्या संचालकाचे किती? नातेवाई नोकरीस वशिल्याने लावले आहेत? मर्जीतील शिक्षक एकाच शाळेवर गेल्या अनेक वर्षापासून का?. याबाबत दोन्हीही पॅनलमधून मात्र आरोप-प्रत्यारोप करताना दिसत नाही.
यामागचे कारण म्हणजे ‘ तेरी भी चूप, मेरी भी चूप ’ दोन्ही पॅनल मधील सदस्यांचेच मर्जीतील नातेवाईक मोठ्या प्रमाणात संस्थेत नोकरीस आसल्याची चर्चा गेल्या अनेक वर्षांपासून आहे. सर्वसमान्य पात्र उमेदवाराला यामुळे संस्थेत नोकरीसाठी डावल्यात आले आहे. याचा देखील मतदार सभासदानी विचार करुन, योग्य उमेदवारालाच संस्थेच्या कामकाजाची संधी द्यावी. अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तर पत्रकबाजीतून संस्थेची मोठ्या प्रमाणात बदनामी होत असून भविष्यात याची झळ संस्थेच्या विकासाला नक्कीच बसणार आहे, यात दुमात्र शंका नाही.
राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाची निवडणूक संस्थेच्या इतिहासात यावेळी आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीमुळे चांगलीच चर्चेत आली आहे. सोशल मीडियासह पत्रकातून संस्थेच्या कारभाराचे वाभाडे काढले जात असून यातून आरोप प्रत्यारोप हा वैयक्तीक पातळीवर पोहचला आहे. निवडणुकीत होत असलेल्या आरोप-प्रत्यारोपामुळे ही निवडणूक संस्थेला भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी लढविली जात आहे की, राजकीय सोईसाठी? असा सवालही सुज्ञ सभासदांकडून व्यक्त होत आहे.
दुसरीकडे संस्थेच्या निवडणूकीत उभे असलेल्या मातब्बर उमेदवार पाहता संस्थेत सर्वसामान्य सभासदांना वाव नाही काय ? असा सवालही केला जात आहे. शिक्षण प्रसारक मंडळाची निवडणूक चार दिवसांवर येवून ठेपली असून निवडणुक वातावरण अक्षरशा ढवळून निघाले आहे. यंदाची निवडणुक संस्थेच्या विक्री झालेल्या जागेच्या मुद्या भोवती फिरत असून संस्थेच्या विकासाचा मुद्दा हा गौण ठरला आहे.
आरोप प्रत्यारोपाने कळस गाठला असून निवडणुकीच्या निमीत्ताने होणारे आरोप-प्रत्यारोप संस्थेच्या सभासदांना कितपत भावतात आणि सभासद कुणाच्या पारड्यात कौल देतो, याबाबत सभासदांची खरी कसोटी लागणार आहे. सत्ताधारी गटाकडून संस्थेचा कसा कायपालट झाला हे पटवून दिले जात असून विरोधक केविलवाणा कांगावा करीत असल्याचा सत्ताधार्यांचा दावा आहे. तर सत्ताधार्यांनी जागा विक्रीत कशा पद्धतीने हित साधले असा निशाणा साधून हे जागा विक्री प्रकरण न्यायाला धरून नसल्याचे व संस्थेचे नुकसान करणारे ठरले असल्याचा दावा तिसर्या पॅनलकडून केला जात आहे.
संस्थेत कोणाची किती नातेवाई नोकरी?-
तालुक्यातील सर्वात मोठी व तीन तालुक्याचे कार्यक्षेत्र असलेली आणि राज्यातील शिक्षण क्षेत्रात नावाजलेली शैक्षणिक संस्था म्हणून राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेचा प्रचंड नावलौकीक आहे. या संस्थेत दर वर्षी मोठ्या प्रमाणात शिक्षकांच्या व इतर जागा रिक्त होतात. आशा रिक्त जागावर गेल्या अनेक वर्षांपासून जो सत्तेत आहे, त्यांच्याच मर्जीतील नातेवाईकांची भर्ती मोठ्या प्रमाणात झाल्याची चर्चा आहे. याबाबत आतापर्यंत एकही पॅनलमधून आरोप-प्रत्यारोप करण्यात आल्याचे दिसून येत नाही.
तर गेल्या अनेक वर्षांपासून काही शिक्षक एकाच शाळेवर शिकवत आहेत. तर विरोधात गेलेल्या शिक्षकांच्या बदल्या वारंवार केल्या जातात. याबाबत देखील दोन्ही पॅनलमधून चुप्पी साधण्यात आली आहे. कोणाचे किती नातेवाई आतापर्यंत संस्थेत भरती करण्यात आले, त्यांची नावे का ? पत्रकातून देण्यात येत नाहीत ? यामागील कारण म्हणजे दोन्ही पॅनलमधील उमेदवरांच्या बरेच नातेवाईक सध्या संस्थेत नोकरीस आहे. अनेकाची पात्रता नसताना देखील संस्थेत नोकरी करीत आहेत. तर बोटावर मोजक्या सभासदाच्या मुलांना नोकरीस लावण्यात आले आहे.
नोकर भरतीबाबत गंभीर आरोप-
एकीकडे संस्थेतील भ्रष्टाचार हद्दपार करण्यासाठी, संस्थेचा कारभार स्वच्छ करण्याची ग्वाही दिली जात असतांना दुसरीकडे यापूर्वी या संस्थेत गेल्या काही वर्षापासून जे संचालक निवडून येत आहेत, त्यांनी इतक्या वर्षात संस्थेला भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी का प्रयत्न केले नाहीत? अशाही चर्चा यानिमीत्ताने होत आहे. नोकरभरती प्रकार हा गेल्या अनेक वर्षांपासून कळीचा मुद्दा ठरला आहे. आता बाळासाहेब पंडितराव चव्हाण यांनी एका पत्रकातून याबाबत गंभीर आरोप केला आहे. त्यामुळे नोकरभरतीत वारेमाप पैसा गेल्या अनेक वर्षांपासून संस्थेवर कारभार करणार्यानी घेतल्याचे प्रथमदर्शी दिसत आहे. भविष्यात यामागील सत्यता बाहेर येणारच आहे. गेल्या अनेक वषार्ंपासून प्रत्येक निवडणूकीत हा मुद्दा प्रचाराला येतो. त्यात वेगळेपण काही नाही. पण निवडणुकीसाठी इतक्या मोठ्या प्रमाणावर मातब्बर रिंगणात उतरलेले पाहता, राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळ ही संस्था सोन्याची कोंबडी असल्याची चर्चा आहे.