
धरणगाव - प्रतिनिधी dharangaon
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या (State Excise Department) भरारी पथकाने शहरातील साई गजानन पार्क परिसरात छापा टाकून बनावट देशी दारूचा कारखाना उध्वस्त केला आहे. पथकाने यावेळी चार जणाना अटक केली असून अकरा लाखाचा मुद्देमाल देखील जप्त केला आहे.
यासंदर्भात सविस्तर वृत्त असे की, शनिवार रोजी कांतिलाल उमाप, आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, म.रा.मुंबई, मा. संचालक उषा वर्मा राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई, अर्जुन ओहोळ विभागीय उपआयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, नाशिक विभाग, नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, जळगाव सिमा झावरे, यांच्या नेतृत्वाखाली सी.एच.पाटील निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक, जळगाव, ए.एस.पाटील, दुय्यम निरीक्षक, भरारी पथक, जळगाव, एस.एफ.ठेंगडे दु. निरीक्षक यावल, जवान एन.व्हि.पाटील, ए.व्ही.गावंडे, एम.डी.पाटील, के.पी.सोनवणे, राहुल सोनवणे यांनी भास्कर पांडुरंग मराठे याचे राहते घर, साई गजानन पार्क, धरणगाव, ता.धरणगाव, जि.जळगाव येथे बनावट मद्य निर्मिती गुन्ह्याबाबत छापा टाकला. यावेळी मुद्देमालासह चार संशयित आरोपींना अटक करण्यात आली.
गौतम नरेंद्र माळी, वय ३२ वर्षे, रा. थवा, ता. नेत्रंग, जि. भरुच, (गुजरात) ह.मु. साईगजानन पार्क, धरणगाव, भुपेंद्र गोकुळ पाटील, वय २९ वर्षे, रा. मराठे गल्ली, धरणगाव, कडु राजाराम मराठे, वय ४० वर्षे, रा.मराठे गल्ली, धरणगाव, भास्कर पांडुरंग मराठे, वय ६३ वर्षे, रा.साई गजानन पार्क, धरणगाव अशी संशयितांची नावे आहेत.
याप्रसंगी बनावट देशी दारु तयार करण्याकरीता लागणारे साहीत्य स्पीरीट, बनावट देशी दारु टँगो पंचच्या १८० मिली च्या सिलबंद बाटल्याचे ११७ बॉक्स (५६१६ बाटल्या), बनावट देशी दारु टँगो पंचच्या ९० मिली च्या सिलबंद बाटल्यांचे ८६ बॉक्स (८६०० बाटल्या), देशीमद्याचा तयार ब्लेंड, ४ सिलींग मशिन, १ ब्लेंडिंग मशिन, बुचे, रिकाम्या बाटल्या, खोके, कागदी लेबल तसेच दोन दुचाकी असा एकुण अकरा लाखाचा मुददेमाल हस्तगत करण्यात आला आहे.
सर्व संशयित आरोपींना रविवारी धरणगाव न्यायालयात हजर केले असता, चौघांना २५ तारखेपर्यंत तीन दिवसांची पोलिस कस्टडी सुनावण्यात आली आहे. या संदर्भात अनेक धागेदोरे सापडतील असा पोलिसांचा कयास आहे.
सदर गुन्हयाचा पुढील तपास श्रीमती सिमा झावरे, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, जळगाव यांचे मार्गदर्शनाखाली सी.एच.पाटील निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक, जळगाव हे करीत आहे.