बसचालकाला मारहाण करणार्‍यास तीन वर्ष सक्तमजूरीची शिक्षा

जळगाव जिल्हा न्यायालयात निकाल
बसचालकाला मारहाण करणार्‍यास तीन वर्ष सक्तमजूरीची शिक्षा

जळगाव (jalgaon) -

पाचोरा बस आगाराच्या वाल्मिक सोमा जाधव या बस चालकाला बेदम मारहाण व शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी देणार्‍या ललित उर्फ छन्नू प्रकाश पाटील (वय-४५) रा. नेरी ता. जामनेर यास तीन वर्षांची सक्तमजुरी शिक्षा ठोठावली आहे. जिल्हा न्यायालयाचे न्या.एस.जी.ठुबे यांनी बुधवारी हा निकाल दिला.

पाचोरा बस आगाराचे बसचालक वाल्मिक सोमा जाधव हे (एमएच १४ बीटी ४५४) क्रमांकाची बस ३१ डिसेंबर २०१५ रोजी पाचोराहून चाळीसगाव येथे जात असतांना पाचोरा तालुक्यातील आखतवाडे गावाजवळ ललित उर्फ छन्नू प्रकाश पाटील (वय-४५) रा. नेरी ता. जामनेर याने बससमोर स्कॉर्पिओ गाडी आडवी लावली. तसेच बस चालक वाल्मिक जाधव यांना एकेरी भाषा वापरुन तु नेरीला चल, तुला दाखवतो अशी धमकी दिली.

बस चालक वाल्मिक जाधव हे बस घेवून नेरी येथे आले असता ललितने बस चालकाला बेदम मारहाण करून जीवेठार मारण्याची धमकी दिली. त्यावेळी वाहक तुषार साखरे आणि इतर प्रवाश्यांनी सोडवासोडव केली. जखमील बस चालक यांनी नगरदेवळा ग्रामीण रूग्णालयात उपाचार घेतले. याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात ललित पाटील याच्या विरोधात शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता.

तपासअधिकारी सहाय्यक फौजदार प्रकाश पाटील यांनी जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. न्या. एस.जी. ठुबे यांच्या न्यायालयात हा खटला चालला. यात सहाय्यक सरकारी वकील ॲड. सुरेंद्र काबरा यांनी ९ साक्षीदार तपासले. यात चालक व वाहक यांच्यासह वैद्यकीय अधिकार्‍यांची साक्ष महत्वाची ठरली. साक्षीदार व ॲड. सुरेंद्र काबरा यांच्या प्रभावी युक्तीवादा अंती न्या. ठुबे यांनी आरोपी ललीत पाटील यास दोषी धरत तीन वर्ष सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. पैरवी अधिकारी म्हणून तुषार मिस्तरी यांनी काम पाहिले.

Related Stories

No stories found.