भक्ती ग्रंथाच्या माध्यमातून अध्यात्माचा पाया होईल मजबूत - महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज

डॉ.जगदीश पाटील लिखित श्री संत एकनाथांच्या अभंगातील भक्ती ग्रंथाचे प्रकाशन
भक्ती ग्रंथाच्या माध्यमातून अध्यात्माचा पाया होईल मजबूत - महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज

भुसावळ - Bhusaval

समाजात समरसता तयार करून सकारात्मक समाजनिर्मिती करण्याचे काम संतांचे वाङ्मय (Saint literature) करत असते. संत एकनाथांनी (Sant Eknath) परिणामकारक औषधी अत्यंत सोप्या पद्धतीने आईस्वरूप बनून बालरूपी समाजाला दिली. हेच ज्ञान अजून सोपे करून डॉ.जगदीश पाटील यांनी (Bhakti Granth) भक्ती ग्रंथाची निर्मिती केली. त्यामुळे आध्यात्मिक पाया मजबुतीसाठी हा ग्रंथ महत्त्वपूर्ण योगदान देऊन लाभदायी ठरेल, असे प्रतिपादन (Mahamandleshwar Janardan Hariji Maharaj) महामंडलेश्‍वर जनार्दन हरीजी महाराज यांनी केले.

डॉ.जगदीश पाटील (Dr. Jagdish Patil) लिखित श्री संत एकनाथांच्या अभंगातील भक्ती या ग्रंथाचे प्रकाशन नाथषष्ठीच्या मुहूर्तावर फैजपूर येथील सतपंथ मंदिरात महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांच्या हस्ते पार पडले. अध्यक्षस्थानी प्रा.डॉ.सौ. आशालता अशोक महाजन तर प्रमुख पाहुणे म्हणून योगीराज महाराज गोसावी पैठणकर, प्रा.डॉ.पृथ्वीराज तौर नांदेड, डायट प्राचार्य डॉ. अनिल झोपे, अधिव्याख्याता डॉ.चंद्रकांत साळुंखे, नरेंद्र नारखेडे, प्रा.व.पु होले, बी.आर. पाटील, प्रा.डॉ.दिलीप ललवाणी, लक्ष्मण महाराज उपस्थित होते.

प्रारंभी दीपप्रज्वलन झाल्यावर सौ.निशा पाटील यांच्या प्रतिमेस डॉ.महाजन यांनी पुष्पहार अर्पण केला. मान्यवरांचा परिचय प्रा. उमाकांत पाटील यांनी करून दिला. लेखकाची भूमिका डॉ. जगदीश पाटील यांनी प्रास्ताविकातून मांडली. प्रकाशकाच्या भूमिकेतून हभप लक्ष्मण महाराज यांनी संत साहित्यातून आध्यात्मिक मन:शांती मिळते असे सांगितले.

डॉ.पृथ्वीराज तौर यांनी डॉ.पाटील यांचा शोधप्रबंध हा आदर्श वस्तुपाठ असून एका शिक्षकाने लोकशिक्षक संत एकनाथांच्या पायवाटेवर चालण्याचे काम केले असल्याचे सांगितले.

योगीराज महाराज गोसावी यांनी आदर्शभूत अभ्यासपूर्ण मांडणी असलेला व परमार्थ साधक आणि लोकोपयोगी भावना हा उदात्त हेतू ठेवून भक्ती हा ग्रंथ तयार केला असल्याचे सांगितले. महामंडलेश्‍वर जनार्दन हरीजी महाराज म्हणाले की, अध्यात्माची ताकद दुःखातून सावरते. आध्यात्मिकतेचा वारसा बनणे भाग्यशाली असते. संतांचे वाङ्मय तथा अध्यात्म हे मनोबल व आत्मबल वाढवणारे असते असे सांगून हाच वारसा डॉ. पाटील यांनी स्वीकारला असल्याचे त्यांनी सांगितले.

डायट प्राचार्य डॉ. अनिल झोपे यांनी डॉ.पाटील हे अध्यात्माच्या खोलात शिरलेले व तंत्रज्ञानाची उंची गाठलेले तसेच पीएचडीचा विषय स्वतः जगून इतरांनाही जगवणारे शिक्षक असल्याचे सांगितले.

अध्यक्षीय मनोगतात डॉ.आशालता महाजन म्हणाल्या की, भक्ती ही मनाला प्रसन्नता देऊन जीवनाला संजीवनी देणारी असते. लोकनाथ लोकशिक्षक संत एकनाथांनी प्रपंच व परमार्थाची उत्तम सांगड घातली.

डॉ.पाटील यांनी अत्यंत जिद्द, चिकाटी व कठोर परिश्रमातून संशोधन पूर्ण केले आणि या संशोधनाचा ग्रंथ त्यांच्या जीवनाला परीसस्पर्श करणारा ठरेल असेही त्यांनी सांगितले. राजेंद्र जावळे यांनी स्व. निशा पाटील स्मरणार्थ ओळी सादर केल्या. सूत्रसंचालन प्रा. प्रमोद आठवले यांनी तर आभार कु. भक्ती पाटील हिने मानले. डॉ.पृथ्वीराज तौर यांनी केलेल्या आवाहनानुसार प्रा. होले यांनी पाच ग्रंथ विकत घेतले. त्यानंतर भक्तीच्या हस्ते उपस्थित सर्व श्रोत्यांना भक्ती ग्रंथाचे वाटप करण्यात आले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com