पक्षनिष्ठा साफ झूठ, राजकीय ‘सोय’च वरचढ!

पक्षनिष्ठा साफ झूठ, राजकीय ‘सोय’च वरचढ!

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर वेगवान राजकीय घडामोडी घडत असून विधिमंडळ पातळीवरील जळगाव जिल्ह्यातील शिवसेना अक्षरशः गुंडाळली गेली आहे. शिवसेनेचा ढाण्या वाघ म्हणून ओळखले जाणारे जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पक्षनिष्ठेनेही सत्तालालसेपुढे दम तोडला आहे.

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आमदार चंद्रकांत पाटील यांनी समर्थांचा आशीर्वाद घेऊन शिवसेनेला जय महाराष्ट्र करत गुवाहाटीची वाट धरली आहे. ज्यांच्यामुळे शिवसेना सोडली त्यांच्याच नेतृत्वाखाली आता पुन्हा काम करावे लागणार असल्याने सोमवारी रात्री सुरत गाठणार्‍या जिल्ह्यातील ‘त्या’ दोघा आमदारांवर आता मनस्तापाची वेळ आली आहे.

विधान परिषदेचे निकाल जाहीर होण्यापूर्वीच एकनाथ शिंदे यांनी काही आमदार गळाला लावून मुंबई सोडली. पहिल्या टप्प्यात शिंदेंची सोबत करणार्‍यांत जळगाव जिल्ह्यातून चिमणराव पाटील व किशोरआप्पा पाटील यांचा समावेश होता. जातपडताळणीचे आश्वासन मिळाल्यानंतर आ. सौ. लताताई सोनवणे थेट दिल्लीतून चार्टर्ड विमानाने सुरतला दाखल झाल्या. बंड शमविण्यासाठी प्रयत्न करणार्‍यांत मंत्री गुलाबराव पाटील आघाडीवर होते. गुलाबरावांच्या मुंबईतील निवासस्थानी बैठका झाल्या. बंडखोर आमदारांना स्वगृही आणण्यासाठी ते प्रयत्न करीत होते. सोबत पक्षनिष्ठेची माळही जपत होते. मात्र, मंगळवारी रात्रीतून काय साम, दंड, भेदाचे प्रयोग झाले; की शिवसेनेची निष्ठा झुगारून अगतिक गुलाबरावांना बुधवारी शिंदेंच्या गोटात जावे लागले याची चर्चा आता होत आहे.

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आ. चंद्रकांत पाटील हेदेखील कट्टर शिवसैनिक आहेत. सोमवारी शिंदेंचे बंड जगजाहीर झाल्यानंतर मूळ शिवसेनेबरोबर राहण्याच्या आणाभाका घेत आ. चंद्रकांत पाटलांनी मुक्ताईनगर गाठले होते. पाटील-खडसे यांच्यातील राजकीय सवतासुभा सर्वश्रुत आहे. असे असले तरी उद्धव ठाकरेंनी आदेश दिल्यास खडसे यांनाही मतदान करू, असा एकनिष्ठेचा सूर चंद्रकांत पाटलांनी तीन-चार दिवसांपूर्वी लावला होता. मात्र, शिवसेनेच्या फांदीवरून सर्वच पक्षी गुवाहाटीच्या दिशेने उडत असल्याचे पाहून भविष्यातील राजकीय आराखड्यांसाठी आमदार चंद्रकांत पाटील यांनाही गुवाहाटी जाण्याची घाई झाली. मुक्ताईनगरात स्वामी समर्थांचा आशीर्वाद घेऊन तेदेखील गुवाहाटीच्या दिशेने उडाले.

सुरुवातीला सुरत गाठणारे चिमणराव आबा घ्या की किशोरआप्पा दोघांनीही भविष्यातील सोयीचे राजकारण पाहूनच वेगळा निर्णय घेतला. मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून सन्मान होत नसल्याची या दोन्ही आमदारांची भावना होती. भविष्यातदेखील मंत्रिपद मिळेल, याबाबत अनिश्चितता होती. त्यामुळे सोईचा मार्ग म्हणून आबा आणि आप्पांनी ठाकरेंपासून दूर होण्याचा निर्णय घेतला असावा. तसे कदाचित घडलेही असते, मात्र आता खुद्द गुलाबरावच नाराज गटात सामील झाल्याने भविष्यात मंत्रिपद देण्याची वेळ येईल तेव्हा शिवसेनेतील विद्यमान मंत्र्यांचाच विचार प्राधान्याने होऊ शकतो, म्हणजे नव्या समीकरणात चिमणराव आबा आणि किशोरआप्पा यांना मंत्रिपदाबाबत वेटिंगवरच राहावे लागू शकते. चोपडाच्या आमदार सौ. लताताई सोनवणे यांचे जातप्रमाणपत्र अवैध ठरवले गेले आहे. या प्रकरणात मदत करण्याचे आश्वासन मिळाल्याने सौ. सोनवणे यांनीही नाराज गटात जाणे पसंत केले आहे. सौ. सोनवणे यांनी पक्षनिष्ठेपेक्षा स्वतःचा लाभच अधिक महत्त्वाचा मानल्याचे दिसत आहे. साक्रीच्या अपक्ष आमदार सौ. मंजुळा गावित यांनीही भविष्याचा वेध घेत शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आहे.

राजकारणात काहीही होऊ शकते. एकूणच राजकीय निष्ठा वगैरे याबाबी साफ झूट असतात, भविष्यातील सोयीचे राजकारण पक्षनिष्ठेपेक्षा महत्त्वाचे असते, हे शिंदेंच्या बंडामुळे अधोरेखित केले आहे.

शिवसेना वाचवण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदा बरोबरच पक्ष प्रमुख पद सोडण्याची तयारी दर्शवली आहे. सांगितल्याप्रमाणे उध्दव यांनी बुधवारी रात्री मुख्यमंत्र्याचे शासकीय निवासस्थान वर्षा सोडून मातोश्रीकडे कूच केले. त्यावेळी हजारो शिवसैनिकांनी उत्स्फूर्तपणे उद्धव यांचे स्वागत केले. अतिशय भावनिक असा हा प्रसंग होता. सौ लता सोनवणे, मंजुळा गावित यांचे शिवसेनेशी फार जिव्हाळ्याचे ऋणानुबंध नाहीत मात्र गुलाबराव पाटील, चिमणराव पाटील, किशोरआप्पा पाटील व चंद्रकांत पाटील या चौघा आमदारांची जडणघडण शिवसेनेत व ठाकरे कुटुंबीयांसोबत झाली आहे. मुंबईतील बुधवारी रात्रीचे चित्र पाहून हे चौघे आमदार त्यांच्या निर्णयाचा पुनर्विचार करतील?

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com