बॉम्ब सद़ृष्य वस्तुच्या भितीने पोलिस यंत्रणेची दमछाक

भुसावळ रेल्वे स्थानकातील थरार... , तपासात आढळली प्रवाशी बॅग
बॉम्ब सद़ृष्य वस्तुच्या भितीने पोलिस यंत्रणेची दमछाक

भुसावळ Bhusawal । प्रतिनिधी

येथील रेल्वे स्थानकाच्या (Railway station) उत्तर भागातील प्रवेश द्वारावर दुपारपासून एक बॅग बेवारस (empty bag) पडून होती. या बॅगेबद्दल संशय वाढत गेल्याने उपविभागीय पोलिस अधिकारी (Subdivisional Police Officer) सोमनाथ वाघचौरे यांच्या नेतृत्वाखाली शहर पोलिस स्टेशन, रेल्वे सुरक्षा दल व रेल्वे पोलिस यांनी संयुक्त मोहिम राबवून सदर बॅगची तज्ञ पथकाकडून (expert team·) तपासणी (Inspection of the bag) केली. सुमारे चार तास चाललेल्या या मोहिमेनंतर रात्री आठ वाजता नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला.

याबाबत पोलिसांनी एका संशयितास ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून देण्यात आली.

भुसावळ रेल्वे स्थानकावर दाखल झालेले डॉग स्काँड.
भुसावळ रेल्वे स्थानकावर दाखल झालेले डॉग स्काँड.

याबाबत माहिती अशी की, रेल्वे ग्राऊंड भागातील रेल्वेचे उत्तर भागातील प्रवेशद्वारासमोर शाभेचे इंजिन आहे. या ठिकाणी दुपारी 1 वाजेच्या सुमारास एक बॅग पडून होती, अशी माहिती रिक्षा युनियनचे भिमराव तायडे यांनी कर्तव्यावर असलेले हवलदारांना दिली. त्यांनी आपल्या वरिष्ठांना या संदर्भात सुचना केली.

दुपारी 4.30 च्या सुमारास सर्व सीसीटिव्ही फुटेज तपासल्यानंतर कुठलाही धोका पत्करून प्रवाशांचा जीव धोक्यात न घालता डिवायएसपी श्री.वाघचौरे यांनी बॉम्ब शोधक पथक जळगाव यांना पाचारण केले. दरम्यान रेल्वे पोलिस, आरपीएफ व शहर पोलिसांचा मोठा ताफा मागवून परिसर काही वेळात निर्मनुष्य करून बुकींग आदी सर्व बंद करून प्रवाशी पश्चिम दिशेनेच वळविले.

बॉम्ब शोधक पथकातील टायसन व विरू या दोघांनी बॉम्ब/स्फोटक नाहीत याची खातरजमा करून ही बॅग गाडीत ठेवून ती रेल्वे मैदानावर मोकळ्या जागी हलविण्यात आली. तेथे अन्य यंत्रांच्या सहाय्याने तपासणी व खातरजमा केली असता या बॅगेत संशयास्पद काहीही आढळून आले नाही. ही बॅग रेल्वे पोलिसांच्या स्वाधीन केल्यावर नागरिकंसाठी रस्ता खुला करण्यात आला. पोलिस यंत्रणेच्या दक्षतेबद्दल नागरिकांमध्ये कौतुक होत होते.

डिवायएसपी सोमनाथ वाघचौरे, शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक गजानन पडघन, रेल्वे जीआरपी चे विजय घेरडे, रेल्वे सुरक्षा दलाचे पोलिस निरिक्षक आर.के. मीना, एपीआय बी.एस. मगरे, पोलिस उपनिरिक्षक कवाडे, एसआयटीचे आसिफ शेख, एएसआय प्रभाकर चौधरी, हेकाँ प्रकाश महाजन, नरेंद्र ठाकूर, अशोक, मजहर मिर्झा, शशिकांत जाधव, पिंजारी, अजय थोरे व इन्व्हेस्टीगेशन (आय बी) ब्युरोचे अधिकार कर्मचारी यांनी या कामी परिश्रम घेतले. खबरदारीचा उपाय म्हणून या निमित्ताने संपूर्ण रेल्वे स्थानकाची बारकाईने तपासणी करण्यात आली. पोलिस दलाची यात चांगलीच दमछाक झाली.

बॉम्ब शोध पथक गणवेशा विनाच

घटनेचे गांभिर्य लक्षात घेता जळगावहुन खास बॉम्ब शोध पथकाला पाचारण करण्यात आले होते. हे जवान व यांच्या अधिकार्‍यांच्या अंगावर विशेष सुरक्षा गणवेश असतो, परंतु हे पथक आपल्या साध्या वेशातच आले होते. प्रवाश्यांच्या जिवाच्या सुरक्षेसाठी स्वताःचा जिव धोक्यात घालणार्‍या या जवानांनी आज स्वताःचा जिव धोक्यात घातल्याचे दिसुन आले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com