पोलिसांच्या नाकाबंदित आठ लाखांचा गांजा जप्त

चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल
पोलिसांच्या नाकाबंदित आठ लाखांचा गांजा जप्त

चाळीसगाव chalsigaon प्रतिनिधी -

शहर वाहतूक शाखा पोलीसांनी धुळेरोडवरील बायपास पॉईन्टवर राबविलेल्या नाकाबंदी दरम्यान काल अडवलेल्या स्कारपीओ वाहनात गांजा (cannabis) आढळून आला आहे. यानतंर शहर वाहतूक शाखा आणि ग्रामीण पोलीसांनी केलेल्या या पुढील कारवाईत स्कारपीओ मधून ५८ किलो गांजासह (cannabis) दोघांना पोलीसांनी १३ लाख ६४ हजाराच्या मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, काल(दि,१८) सायंकाळी शहर वाहतूक शाखेचे ए. पी. आय. तुषार देवरे यांच्यासह वाहतूक शाखेचे स. फौ. बाविस्कर, पो.हे. कॉ. बोरसे, पो. हे. रावते, पो. ना. बापू पाटील, नरेंद्र पाटील, सचिन अडावदकर आदिच्या पथक नाकाबंदी मोहीम राबवित असतांना, सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारांस धुळ्याकडून चाळीसगांवकडे येणार्‍या पांढर्‍या रंगाच्या स्कार्पीओ या या गाडीला नंबर प्लेट नव्हती म्हणून हे वाहन ह्या नाकाबंदी दरम्यान अडवण्यात आले असता, ए. पी. आय. तुषार देवरे यांनी विना नंबर प्लेट प्रकरणी या स्कार्पीओवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश देताच हे वाहन चाळीसगांवच्या दिशेने पळवून नेण्याचा प्रयत्न स्कार्पीओवरील चालकाने केला. त्याच्या या कृतीने आणि वाहनातून आलेल्या वासाने वाहतूक शाखा पोलीसांचा संशय बळावला आणि त्यांनी लागलीच हे वाहन अडवून ते तपासले त्यात गांजा असल्याचे आढळ आला. पोलीसांनी या वाहनावरील चालक आणि अन्य एकाला ताब्यात घेत त्यांना ग्रामीण पोलीसांच्या स्वाधीन केले.

ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ठेंग आणि स. पो. नि. रमेश चव्हाण, पो. ना. शांतारारम पवार, गोवर्धन बोरसे, ज्ञानेश्वर बडगुजर, देविदास पाटील, दिनेश पाटील, प्रेमसिंग राठोड व अनिल आगोणे आदिंनी केलेल्या पुढील तपासात आणि चौकशीत विना नंबरच्या या स्कार्पीओमधील दोघांची नावे तुषार अरुण काटकर (वय-२८रा. दत्तवाडी चाळीसगांव ) आणि सुनिल देवीदास वेडस्कर (वय- ३८ रा. पिलखोड, ता. चाळीसगांव, मुळगांव बाळद ता. भडगांव असल्याचे निष्पन्न होवून स्कापीओ मधील गांजांची मोजणी करता तो ५८ किलो आणि त्याची किंमत ८ लाख ७३ हजार तसच स्कार्पीओची किंमत असा एकूण १३ लाख ६४ हजार रुपये किंमतीचा एैवज हस्तगत केला. या प्रकरणी ग्रामीण पोलीसांत शहर वाहतूक शाखेचे ए. पी. आय. तुषार देवरे यांच्या फिर्यादीवरुन एन. डी. पी. एस. ऍक्ट ८ सी, २० (ळळ)अन्वये तुषार काटकर आणि सुनिल बेडीस्कर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंग हे करीत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com