हे पोलीस अधिकारी करतात जादूचे प्रयोग ; अंधश्रध्दा निर्मुलनात मोलाचे कार्य

हे पोलीस अधिकारी करतात जादूचे प्रयोग ; अंधश्रध्दा निर्मुलनात मोलाचे कार्य

नगरदेवळा, ता.पाचोरा - वार्ताहर pachora

नगरदेवळा अग्नावंती नदी प्रांगणात दि.४ रोजी सकाळी ८ वाजता येथील सार्वजनिक ‘एक गाव एक गणपती’ गणेशोत्सवा निमित्त महाराष्ट्र (Maharashtra) अंधश्रद्धा निर्मुलन व वैज्ञानिक दृष्टीकोन प्रबोधन समितीचे राज्याध्यक्ष व मालेगाव (Malegaon) परिमंडळचे विशेष पोलीस अधिकारी तानाजी शिंदे यांचा जादूचे प्रयोग व त्यामागील विज्ञान ह्या प्रबोधनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

समाजातील अशिक्षीत, तसेच सुशिक्षित व्यक्तीसुद्धा हात चलाखीच्या चमत्कारांनी प्रभावित होऊन भोंदूबाबा, बंगाली बाबा यांच्याकडून फसवले जातात व आर्थिक, शारीरिक शोषण सुद्धा होते. या शोषणाला स्रिया अधिक बळी पडतात, म्हणून सामाजिक बांधिलकी म्हणून माजी सैनिक संघटनेमार्फत ह्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी तानाजी शिंदे यांनी अंधश्रद्धा निर्मूलनावर वेगवेगळे हात चलाखीचे व जादूचे प्रयोग करून उपस्थितांना हसत ठेवुन आश्चर्यचकित केले. यात फुलाचे रंग कसे बदलतात? फाशीतुन सुटका कशी होते? मंत्राने किल्ली कशी फिरते? निर्जीव वस्तू आपोआप कशी हालचाल करते? पाण्याचे रंग कसे बदलतात? रिकाम्या भांड्यातून वारंवार पाणी कसे निघते? पत्ते कसे बदलतात? नाकातून पाणी कसे निघते? असे वेगवेगळे प्रयोग दाखवून त्यामागील शास्र समजावून सांगितले.

तसेच भोंदू बाबा आपल्याला कसे फसवतात आणि आपण त्यांच्या भूलथापांना कसे बळी पडतो याबाबत स्पष्टीकरण देऊन सांगितले. शेवटी अंगात येणाऱ्या स्रीयांच्या अंगात रमाआई, जिजाआई, सावित्रीआई का येत नाहीत? असा अंतर्मुख करणारा प्रश्न विचारला.

यावेळी मोठ्या संख्येने शाळकरी विद्यार्थी, ग्रामस्थ, तरूण उपस्थित होते. पाचोरा तालुक्यातील सर्वात मोठे गांव असलेल्या नगरदेवळा सारख्या बहुजातीय बहुधर्मीय गांवामध्ये माजी सैनिक संघटनेमार्फत गेल्या २४ वर्षांपासून ‘एक गांव एक गणपती’चे यशस्वी आयोजन केले जाते.

यावेळी जादूच्या प्रयोगांच्या कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल नागरिकांनी माजी सैनिक राजेंद्र पाटील, मनोज गहिलोद, विक्रम चौधरी, दिलीप महाजन, ज्ञानेश्वर महाजन, संजय महाजन, सुनील पाटील यांचे अभिनंदन केले. ज्येष्ठ पत्रकार प्रकाश जगताप, जितेंद्र राजपूत, रावसाहेब राऊळ, विश्वनाथ निकुंभ, फारुख शेख व माजी सैनिक यांच्या हस्ते तानाजी शिंदे यांचा सत्कार करून आभार मानले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com