
जळगाव । प्रतिनिधी jalgaon
जिल्हापेठचे पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांची पाच दिवसांपुर्वी जिल्हा मुख्यालयातील नियंत्रण कक्षात उचलबांगडी करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश दि. 21 नोव्हेंबर रोजी पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी काढले आहेत. पोलीस निरीक्षक पदभार घेतल्यानंतर काही महिन्यातच उचलबांगडी झाल्यामुळे पोलिस दलात एकच खळबळ माजली आहे.
जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांची पोलीस मुख्यालयात तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. तत्कालीन पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्या कार्यकाळात त्यांची एका प्रकरणात चौकशी सुरु होती.
याच प्रकरणामुळे पोलीस निरीक्षक धनवडे यांची तडकाफडकी पोलीस मुख्यालयातील नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली असल्याची चर्चा पोलीस दलात सुरु आहे. तसेच अचानक झालेल्या या कारवाईमुळे पोलिस दलात एकच खळबळ माजली आहे. दरम्यान, त्यांच्या रिक्त झालेल्या पदाचा कारभार सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार यांच्याकडे सोपविण्यात आला असून त्यांना पोलीस मुख्यालयातील नियंत्रण कक्षात हजर होण्याचे आदेश निर्गमित केले आहे.
पाच महिन्यांपुर्वी घेतला होता पदभार
मध्यरात्रीच्या सुमारास सोने विके्रत्याकडून पैसे घेवून येणार्या कारागिराला गस्तीवर असलेल्या पथकाने पकडले होते. दरम्यान, त्याच्याकडून दहा लाखांची रोकड पोलिसांना मिळून आली होती. याप्रकरणी डॉ. मुंढेंनी तत्कालीन पोलीस निरीक्षकाला चारच महिन्यात कंट्रोल जमा करण्यात आले होते. त्यांच्या रिक्त जागी धनवडे यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र त्यांची पाच महिन्यातच पोलीस मुख्यालयातील नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे.
विनंती अर्जावरुन बदलीचे आदेश
जिल्हापेठचे तत्कालीन पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांची एका प्रकरणात चौकशी सुरु होती. त्याचा चौकशी अहवालावरुन त्यांची बदली झाल्याची चर्चा पोलीस दलात सुरु आहे. दरम्यान, पोलीस निरीक्षक धनवडे यांची विनंती अर्जावरुन नियंत्रण कक्षात बदली झाल्याचे आदेश पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी काढले आहेत.