पांढरे सोने चोरणारी टोळी गजाआड

चाळीसगाव : तांत्रिक विश्‍लेषणावरुन ग्रामीण पोलिसांची कामगिरी, ५० हजारांच्या कापसासह मुद्देमाल हस्तगत
पांढरे सोने चोरणारी टोळी गजाआड

चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी

तालुक्यातील रांजणगाव (Ranjangaon) येथे एक शेतकर्‍यांच्या शेतातून जवळपास ५० हजारांचा कापूस चोरणारी पाच जणांची टोळी चाळीसगाव ग्रामीण पोलिसांंनी (police) गुप्त माहिती आधारे व तांत्रिक विश्‍लेषणावरुन गजाआड केली आहे. पोलिसांनी चोरी गेलेला कापूस व वाहन असा एकूण १ लाख ४९ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. ग्रामीण पोलिसांच्या या कारवाईमुळे पांढरे सोने चोरणार्‍यांचे धाबे दणाणले आहे.

चाळीसगांव ग्रामीण पोलीस स्टेशनला दिनांक १९/१२/२०२२ रोजी फिर्यादी मनोहर माधव पाटे (वाणी), वय ६८, धंदा-शेती, रा. रांजणगांव, ता. चाळीसगांव यांनी पोलीस स्टेशनला येऊन फिर्याद दिली की, दिनांक १८/१२ /२०२२ रोजीचे सांयकाळी ६ ते दिनांक १९ / १२ / २०२२ रोजीचे सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास वाजेच्या दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या रांजणगांव शिवारातील शेतातील घराचा कडी कोयंडा तोडून घरात ठेवलेला ४९ हजार रुपये किमतीचा ७ क्विंटल कापूस चोरुन नेला म्हणून चाळीसगांव ग्रामीण पोस्टेला गुरनं. ५६० / २०२२ भादंवि कलम ३८०, ४५७, ४५४ प्रमाणे दिनांक १९ / १२ / २०२२ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.

सदर गुन्ह्यात तपासात आरोपींचा कोणताही मागमूस नसतांना चाळीसगाव ग्रामीण पोलिसांच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे यातील आरोपी अजय जयवंत पाटील (वय-२५), प्रकाश उर्फ मुन्ना लक्ष्मण पाटील (२१), चंद्रकांत उर्फ बंटी गोकूळ मोरे (२५), शालीक अरुण पाटील (२५), सुरेश उर्फ पप्पू राजेंद्र कोष्ठी, वय २६, अ.नं. १, २ व ४, ५ रा. रांजणगांव, ता चाळीसगांव व आ.नं. ३ रा. जुना कोळीवाडा पिलखोड, ता चाळीसगांव आदिना सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली. त्यांची पोलीस कस्टडी रिमांड मिळून त्यांचेकडून त्यांनी गुन्ह्यात वापरलेले वाहन १ लाख रुपये किमतीचे महिंद्रा पिकअप (क्र. एमएच ०४ - डीके - ४६१०) ही जप्त करण्यात आली.

त्याचप्रमाणे सदर आरोपी चंद्रकांत उर्फ बंटी गोकूळ मोरे याने चोरलेला कापूस पिलखोड येथील व्यापारी पवन दशरथ महाले याचेकडे त्यांच्या मालकीचा कापूस आहे, असे सांगून माल आता तुमच्याकडे कापूस ठेवा पैसे नंतर घेऊन जाऊ असे सांगून ठेवलेला होता. सदरचा चोरलेला ४९ हजार रुपये किमतीचा ७ क्विंटल कापूस सुध्दा जप्त करण्यात आले आहे. ही कार्यवाही पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, सहा. पोलीस अधीक्षक अभयसिंह देशमुख, निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक लोकेश पवार, सफौ. राजेंद्र साळुंखे, पोहेकॉ. नंदलाल परदेशी, पोना. शंकर जंजाळे, पोना. मनोज पाटील, पोना. संदिप माने, पोना . भूपेश वंजारी आदिच्यया पथकाने केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांचे मार्गदर्शनाखाली सफौ. राजेंद्र साळुंखे हे करीत आहेत.

चाळीसगाव तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना चाळीसगांव ग्रामीण पोलीसांकडून आवाहन करण्यात येते की, आपल्या शेतातील कापूस तसेच इतर शेतमाल हा शेतात न ठेवता आपल्या घरात सुरक्षीत ठिकाणी ठेवावा तसेच शेतात ठेवल्यास त्याच्या राखणसाठी राखणदार ठेवावेत जेणेकरुन आपल्या माल सुरक्षीत राहील.

-संजय ठेंगे, पोलीस निरिक्षक

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com