
जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :
कंपनीकडून जीएसटी न भरल्याने नाशिक विभागाच्या जीएसटी पथकाने पहूर कसबे येथे धाड टाकून चौकशी केली.
दरम्यान, दोन तरुणांच्या नावे बनावट कंपनीची नोंदणी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी दोन जणांना ताब्यात घेतले आहे.
पहूर कसबे येथील रहिवासी प्रवीण कुमावत आणि अशोक सुरवाडे हे जळगावातील रॉयल गोल्ड फायनान्स या कंपनीत नोकरी मागायला गेले होते.
कंपनीचे व्यवस्थापक पिंटू इटकरे यांनी नोकरी देतो. त्यासाठी काही कागदपत्रे लागतील असे सांगितले. त्यानंतर प्रवीण कुमावत आणि अशोक सुरवाडे यांच्याकडून इटकरे यांनी बँकेचे पासबुक, चेक आणि अन्य कागदपत्रे घेवून त्यांच्या नावे कंपनीची नोंदणी केली.
प्रवीण कुमावत यांच्या नावाने कृष्णा स्टील कंपनी तर अशोक सुरवाडे यांच्या नावाने ए.एस.स्टील कंपनीची नोंदणी केली.
दरम्यान जीएसटी चुकविल्यामुळे जीएसटी महासंचालनालय, केंद्रीय विभाग नाशिक विभागाचे अधिकारी ब्रीजभूषण त्रिपाठी यांच्यासह पथकाने पहूर कसबे येथे दि. 3 मार्च रोजी धाड टाकली.
यावेळी कृष्णा कंपनीचा जो पत्ता दिला होता. त्या कंपनीच्या जागेवर सध्या मेडिकल सुरु असल्याचे समोर आले आहे.
कृष्णा स्टील कंपनीचे मालक म्हणून प्रवीण कुमावत आणि ए.एस.स्टील कंपनीचे मालक म्हणून अशोक सुरवाडे यांची चौकशी केली असता, फसवणूक झाल्याचा प्रकार पुढे आला आहे.
याप्रकरणी रॉयल गोल्ड फायनान्सचे व्यवस्थापक पिंटू इटकरे आणि कैलास भारुडे या दोघांना पथकाने चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.