पहूर-पाळधीजवळ भीषण अपघातात तीन जण ठार

भीषण अपघातात दुचाकीवरील व्यवस्थापकाचे शरीराचे तुकडे
पहूर-पाळधीजवळ भीषण अपघातात तीन जण ठार

जळगाव - प्रतिनिधी/पहूर ता जामनेर - वार्ताहर :

जामनेर तालुक्यातील पाळधीजवळ सोमवारी तीन वाजेच्या सुमारास झालेला दुचाकी व चारचाकीचा अपघात इतका भिषण होता की, चारचाकीच्या धडकेत दुचाकीवरील एकाचे हात व पाय शरीरापासून वेगळे होवून रस्त्यावर तुकडे पडले होते. तर चारचाकीचाही समोरील भागाचा चक्काचूर झाला, होवून चारचाकी चालक वाहनातून बाहेर येवून रस्त्यावर पडला होता.

फॉरचून फायनान्स बँकेचे शाखा व्यवस्थापक धनंजय सपकाळे व सेल्स एक्झिक्युटिव्ह पंकज तायडे हे शेंदुर्णी येथून एम एच 19 डी आर 1419 या युनिकॉर्न दुचाकी वाहनाने बँकेचे कामकाज आटोपून जळगाव जात असताना पाळधी येथील बळीराजा हॉटेल जवळ जळगाव कडून येणारी चारचाकी एम एच 19 सी यू 7161 या वाहनाने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत अपघातात दुचाकीस्वारासह मागे बसलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला.

या अपघातातील मयतांचे दोघे हे जळगावातील शहरातील फार्च्युन फायनान्स या कंपनीचे कर्मचारी आहेत. दुचाकीवरील कंपनीचे व्यवस्थापक धनंजय सपकाळे यांचा मृतदेह शरीराचे तुकडे झाल्याने जळगावला हलविणे शक्य नसल्याने पहूर रुग्णालयात हलविण्यात आला होता. तर चारचाकीचा चालकालाही पहूर येथील रुग्णालयाल हलविण्यात आले होते.

देवावरुन विश्वास उठला, शवविच्छेदन करु नका

घटनेची माहिती मिळाल्यावर फार्च्यून फायनान्स या कंपनीच्या कर्मचार्‍यांसह पंकज तायडे याच्या कुटुंबियांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. याठिकाणी पंकजचा भाऊ सूरज याने पंकजचा मृतदेह बघताच मन हेलावणारा आक्रोश केला.

लालबागचा राजा गणपतीला पंकज खूप मानत होता. मात्र लालबागच्या राजानेही त्याला वाचविले नाही. माझा देवावरचा विश्वास उठाला, असे बडबडत सूजर मन हेलावणारा आक्रोश करत होता. त्याचे शवविच्छेदन करु नका, काचेच्या पेटीतच मी घरात त्याला माझ्या डोळयासमोर ठेवून तो एकेक मिनिटात हंबरडा फोडत होता.

मित्र परिवाराने त्याचे सात्वंन केले. तत्पूर्वी जिल्हा रुग्णालयात हलविल्यानंतर सूरजला पंकजचा मृत्यू झाला हा विश्वास बसत नव्हता. जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकार्‍यांनी मृत घोषित केल्यानंतरही सूरजने पंकजचा मृतदेह खाजगी रुग्णालयात हलविला. याठिकाणीही त्यास मृत घोषित करण्यात आल्यानंतर पंकजला पुन्हा जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. याठिकाणी पंकजच्या कुटुंबियांसह मित्र परिवाराने गर्दी केली होती.

नगसेवक कैलास सोनवणे यांनीही जिल्हा रुग्णालयात येवून माहिती जाणून घेतली. तसेच कुटुंबियांचे सांत्वन केले. पंकजच्या पश्चात आई प्रमिला, वडील मोहन तायडे, पत्नी हेमांगी, भाऊ सूरज, वहिणी अर्चना व अडीच वर्षांचा मुलगा जयवीर असा परिवार आहे. पंकजचे वडील मोहन तायडे हे पंचायत समितीतून सेवानिवृत्त झाले आहेत. तर सूरज हा येवू स्माल फायनान्स कंपनीत नोकरीला होता. मू.जे. महाविद्यालयात कार्यरत प्राध्यापक मोहन तायडे यांचाही पंकज हा पुतण्या होत्या.

चारचाकी चालक होता शेतकरी

अपघातातील मयत चारचाकी चालक प्रविण पाटील हे शेतकरी होते, त्याच्या पश्चात पत्नी अनिता, दोन मुले व एक मुलगी असा परिवार आहे. प्रविण पाटील हे शेतकरी होते. त्याची शेती धरणात संपादीत झाली आहे. प्रविण पाटील यांच्याकडील चारचाकी ही तिसर्‍याच कुणाची तरी असल्याची माहिती मिळाली आहे.

कंपनीच्या व्हॉटस्अ‍ॅपवर ओकेचा मॅसेज टाकला अन् घडली दुर्घटना

जळगाव शहरातील गोविंदा रिक्षा स्टॉपजवळ फार्च्यून फायनान्स कंपनीची शाखा आहे. या शाखेत धनंजय गंगाराम सपकाळे रा. स्टेट बँक कॉलनी जळगाव, हे शाखा व्यवस्थापक आहेत. तर पंकज मोहन तायडे रा. कलावसंत नगर, असोदा रेल्वे गेटजवळ, हा सेल्स एक्झ्युकेटीव्ह आहे. धनंजय व पंकज हे दोन्ही नेहमीप्रमाणे सोमवारी साडेनऊ वाजता कार्यालयात आले. त्यानंतर दोन्हीही 11 वाजता कंपनीच्या कामानिमित्ताने शेंदुर्णी ग्राहकाचे स्थळ पडताळणीसाठी पंकज याच्या दुचाकीने एम.एच.19 डी.आर.1419 ने शेंदुर्णीकडे निघाले. तेथील काम आटोपल्यावर कंपनीच्या नियमाप्रमाणे पंकज याने कंपनीच्या व्हॉटस्अ‍ॅपवर गृपवर 2.52 मिनिटांनी काम पूर्ण झाल्याबाबतचा ओके असा मेसेज टाकला.

त्यानंतर दोघेही जळगावकडे निघाले. यादरम्यान पाळधी ते भवानी फाटा दरम्यान बळीराजा हॉटेलजवळ चारचाकीने दुचाकीला जोरदार धडक दिली. यात अपघात दुचाकीस्वारासह मागे बसलेले अशा दोघांना जबर दुखापत होवून ते फुटबॉलसारखे उडाले. धनंजय सपकाळे यांचा हात व पाय शरीरापासून वेगळे होवून रस्त्यावर पडले होते. तर दुचाकी चक्काचूर झाली. पंकजला जळगावला जिल्हा रुग्णालयात हलवित असतांना त्याची वाटेतच प्राणज्योत मालवली.

माजी सैनिकाचा एकुलता एक मुलगा

धनंजय सपकाळे (किनोदरक)हे दोन वर्षापासून फार्च्यून फायनान्स या कंपनीत व्यवस्थापक पदी नोकरीला होते. धनंजय सपकाळे यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी पूनम मुलगी व मुलगा असा परिवार आहे. धनंजय याचे वडील गंगाराम सपकाळे हे लष्करातून सेवानिवृत्त झाले आहेत. धनंजय हा एकुलता एक होता. घरचा कर्ता पुरूष गेल्याने सपकाळे यांच्या कुटुंबियांवर दुखाःचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान एका कंपनीत पंकज व धनंजय याच्या मृत्यूने कंपनीतील कर्मचार्‍यांनाही अश्रू अनावर झाले होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com