
जळगाव । प्रतिनिधी jalgaon
पोलीस (police) दलात एकाच ठिकाणी पाच वर्षांचा कार्यकाळ पुर्ण झालेल्या 675 पोलीस अंमलदारांच्या बदल्यांचे आदेश गुरुवारी सकाळी पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांनी काढले. यामध्ये महिला पोलीस कर्मचार्यांसह, सहाय्यक फौजदार, हवालदार, नाईक आणि शिपाई यांचा समावेश आहे. बहुतांश कर्मचार्यांना त्यांच्या पसंतीक्रमानुसार बदलीचे ठिकाण मिळाल्याने त्यांच्यामध्ये समाधानाचे वातावरण आहे.
गेल्या महिनाभरापासून जिल्हा पोलीस दलात पोलीस अंमलदारांच्या बदल्यांच्या काम सुरु होते. एका पोेलीस ठाण्यात पाच वर्षांचा कार्यकाळ पुर्ण झालेल्या कर्मचार्यांच्या बदल्यांसाठी पोलीस अधीक्षकांनी दोन आठवड्यांपुर्वी मुलाखती घेतल्या होत्या. त्यानंतर पोलिस कर्मचार्यांना नियुक्तीच्या ठिकाणाची प्रचंड उत्सुक्ता लागून होती. सोयीचे ठिकाणी बदली व्हावी यासाठी अनेकांकडून फिल्डींग देखील लावली होती. मात्र पोलीस अधीक्षकांनी बदली होणार्या कर्मचार्याची पोलीस दलातील सेवा व रिक्त असलेल्या जागा यानुसार त्या पोलीस कर्मचार्याची बदली करण्यात आली आहे. जिल्ह्यातील 675 पोलीस अंमलदारांच्या बदल्यांचे आदेश गुरुवारी सकाळी पोलीस अधीक्षकांनी काढले आहे.
कोरोनाकाळानंतर निघाला बदल्यांचा मुहूर्त
कोरोनाच्या दोन ते अडीच वर्षानंतर यावर्षी प्रशासकीय बदल्या झाल्या आहे. परंतु या बदल्यांमध्ये ज्या कर्मचार्यांना पाच वर्षांपेक्षा अधिक काळ पुर्ण झाला आहे. अशा कर्मचार्यांनी स्थगिती मागितली होती. त्यासाठी त्यांच्याकडून पोलीस दलातील अधिकारी व राजकीय नेतेमंडळींकडून देखील फिल्डींग लावली होती. अशा कर्मचार्यांच्या प्रशासकीय बदल्यांना पोलीस अधीक्षकांनी वर्षभरासाठी स्थगिती दिली आहे.
एलसीबीसीसाठी होणार परीक्षा
एलसीबीसाठी अनेक जणांनी फिल्डींग लावलेली होती. मात्र विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी स्थानिक गुन्हे शाखेत बदली होण्यासाठी परीक्षा घेण्याच्या सूचना दिल्या असून याबाबतचे परिपत्रक देखील काढले आहे. त्यामुळे गुन्हे अन्वेषन प्रशिक्षण पुर्ण करुन प्रत्येक कामात परिपुर्ण झालेल्या कर्मचार्याला स्थानिक गुन्हे विभागात बदलीसाठी प्राधान्य दिले जाणार आहे.
पसंतीक्रमानुसारच बदल्या
प्रशासकीय बदल्यांमध्ये अनेक पोलीस कर्मचार्यांना पोलीस अधीक्षकांनी पसंतीक्रम आणि कर्मचार्यांची प्रत्यक्ष मुलाखत घेवून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेत त्यांना नियुक्ती करुन त्यांची बदली केली आहे. त्यामुळे पोलीस कर्मचार्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. तर काही जणांना पसंती शिवाय त्यांची बदली झाल्याने त्यांना अन्य पोलीस ठाण्यात जावे लागणार आहे.