
अमळनेर । Amalner । घोडगाव (ता.चोपडा)
येथील मावस भावाचा मुलगा वणीगडावर पायी जात असताना तब्येत बिघडली म्हणून त्यास डांगर येथून घेऊन वापस परत घरी येत असताना मंगरुळ-अमळनेरदरम्यान अमळनेरकडून भरधाव वेगाने येणार्या 407ने उडविले.
त्यात पाडळसरे येथील मोटारसायकलचालक काका गोरख बिभीषण कोळी (वय 35) हे जागीच ठार झाले तर कृष्णा भगवान भील (वय 38), सौरभ दीपक कोळी हे (वय 11) (रा.घोडगाव, ता.चोपडा) तर वणीगडावर पायी जाणारा विक्की राजेंद्र पारधी (वय 20) (रा.चोपडा) हे तीन जण गंभीर जखमी झाले असून हा अपघात दि.30 रोजी रात्री 11 वाजता मंगरुळ एमआयडीसीजवळ ऋषिकेश इंडस्ट्रीजजवळ झाला. अपघातग्रस्त ठिकाणी अमळनेर पोलिसांनी मालवाहतूक 407 ताब्यात घेतली असून चालक फरार झाला आहे. याबाबत अमळनेर पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत विविध सात कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वणी देवीच्या दर्शनासाठी पायी वारीत चालत घोडगाव (ता.चोपडा) येथील सौरभ हा जात असताना त्याची जानवे डांगरजवळ तब्येत बिघडली म्हणून त्याचे वडिलांनी पाडळसरे येथील मावस भाऊ गोरख कोळी यास कळविले, गोरख कोळी, कृष्णा भील यास एमएच-19- सीई-5560 या मोटारसायकलने सौरभ याला घ्यावयास गेले. येथून त्यास घेऊन परत घरी येत असताना मंगरुळ गावाच्या पुढे अमळनेरकडून भरधाव वेगाने चुकीच्या पद्धतीने येणार्या मालवाहू एमएच-18-7565 या 407ने मोटारसायकलला उडवून दिल्याने गोरख कोळी हा जागीच ठार झाला तर कृष्णा भील व सौरभ कोळी लांब फेकले गेल्याने गंभीर जखमी झाले, पुढे जाऊन विक्की पारधी यालाही धडक मारुन 407ने जखमी केले.
वणी जाणार्या भाविकांनी वाहन थांबवून जखमींना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता गोरख कोळी याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. उर्वरित जखमींवर प्रथमोपचार करुन धुळे येथे हलविले आहे. गोरख कोळीवर दि.31 रोजी शवविच्छेदन होऊन गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याचे पश्चात विधवा आई, पत्नी, तीन मुली व मुलगा असा परिवार आहे. याबाबत कृष्णा भील याच्या फिर्यादीवरुन अमळनेर पोलीस ठाण्यात 407 चालकाविरुद्ध विविध सात कलमान्वये गुन्हा दाखल झाला असून तपास पी.एस.आय.शिंदे करीत आहेत.