
जळगाव jalgaon । प्रतिनिधी
जेवण झाल्यानंतर मुलासोबत शतपावली (Shatpavali) करण्यासाठी गेलेल्या महिलेच्या गळ्यातील तीन तोळ्याची तर दुसर्या घटनेत दुचाकीवरुन जात असलेल्या महिलेच्या गळ्यातून 50 हजारांची मंगलपोत (Gold chain)लांबविल्याच्या दोन घटना शुक्रवारी रात्रीच्या सुमारास जळगावात घडल्या. दोघ घटनांमध्ये दुचाकीवरुन दोन चोरटे (thief) आले आणि त्यांनी मंगलपोत लांबविली. याप्रकरणी जिल्हापेठ व रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील जिल्हा उद्योग केंद्रा मागील बाजूस असलेल्या प्रोफेसर कॉलनीत वंदना सुभाष पवार या कुटुंबियांसह वास्तव्यास आहे. शुक्रवारी रात्री त्यांनी कुटुंबियांसोबत जेवण केले आणि त्यानंतर ते मुलगा आर्यन सोबत शतपावली करण्यासाठी निघाल्या. जिल्हा उद्योग केंद्राच्या मागील बाजूस पायी जात असतांना समोरुन दुचाकीवर दोन इसम तोंडाला काळ्या रंगाचा मास्क व डोक्यात टोपी घालून त्यांच्याजवळ आले. याचवेळी दुचाकीवर मागे बसलेल्या इसमाने वंदना पवार यांच्या गळ्यातील तीन तोळे सोन्याची पट्टीची मंगलपोत ओढून ते महामार्गाच्या दिशेने पसार झाले. पवार यांचा मुलगा आर्यन याने काही अंतरापर्यंत चोरट्यांचा पाठलाग केला. मात्र चोरटे पळून जाण्यात यशस्वी झाले. दरम्यान, घाबरलेल्या अवस्थेत असलेल्या पवार यांनी शनिवारी जिल्हापेठ पोलिसात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांची घटनास्थळी पाहणी
अवघ्या काही मिनिटांच्या अंतराने दोघ घटना घडल्याने पोलीस उपअधीक्षक संदीप गावित, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील, रामानंद नगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक शिल्पा पाटील, जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक बबन आव्हाड यांच्यासह गुन्हे शोध पथकातील कर्मचार्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज त्यांनी ताब्यात घेतले आहे.
काही मिनिटांच्या वेळाने घडल्या घटना
शतपावली करणार्या महिलेची मंगलपोत लांबविल्याची घटना घडल्यानंतर अवघ्या काही वेळाताच रुख्मिणी नगरातील समाजसेविकेच्या गळ्यातून सोन्याची चैन लांबविल्याची घटना घडली. या दोघ घटनांमध्ये साम्य असून त्यामधील चोरटे हे एकच असल्यााची माहिती समोर येत आहे. पोलिसांकडून या चोरटयांच्या मागावर असल्याच माहिती पोलिसांनी दिली.
गाडी हळूच करताच लांबविली मंगलपोत
शहरातील रुख्मिणी नगरातील वंदना भगवान पाटील या समाजसेविका आहेत. शुक्रवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास त्या (एमएच 19 डीके 8876) क्रमांकाच्या दुचाकीने मुन्सिपल कॉलनीकडे जात होत्या. ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्यालयाजवळून जात असतांना त्यांच्यादुचाकी समोर अचानक दोन दुचाकीस्वार तरुण आले. पाटील यांना ते तरुण टर्न घेत असल्याचे वाटल्याने त्यांनी त्यांची दुचाकी हळू केली.
हीच संधी साधत दुचाकीवरील मागे बसलेल्या चोरट्याने वंदना पाटील यांच्या गळ्यातील 10 ग्रॅम वजनाची सोन्याची चैन हिसकावून ते पळून गेले. दोघ चोरटे हे उंचपुर्ण आणि मजबुत बांद्याचे असून त्यातील एकाने अंगात काळ्या रंगाचे जॅकेट घातले होते. याप्रकरणी वंदना पाटील यांच्या तक्रारीवरुन रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.